घरदेश-विदेशमणिपूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच बोलले; म्हणाले, 'महिला अत्याचारातील आरोपींना...'

मणिपूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच बोलले; म्हणाले, ‘महिला अत्याचारातील आरोपींना…’

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मणिपूरमधील घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. या घटनेतील आरोपींना माफ केले जाणार नाही, असे त्यांच्याकडून संसदेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सांगण्यात आले आहे.

मणिपूर : मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचाराच्या घटना घडत असून यामुळे मणिपूर जळत आहे. मणिपूरमधील या घटनेचे पडसाद देशातील अनेक भागांत उमटताना पाहायला मिळत आहे. महिलांसोबत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण देशाला शरमेने मान खाली घालायला लागत असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. या घटनेतील आरोपींना माफ केले जाणार नाही, असे त्यांच्याकडून संसदेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सांगण्यात आले आहे. (PM Narendra Modi expressed his anger over oppression of women in Manipur)

हेही वाचा – Manipur Violence: मणिपूरच्या घटनेवरून शरद पवारांनी तीव्र संताप व्यक्त करत केले ‘हे’ ट्वीट

- Advertisement -

या घटनेबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मणिपूरमधील घटनेमुळे माझे हृदय दु:खाने भरले आहे. ही घटना लज्जास्पद आहे. हे पाप करणारे किती लोक आहेत, ते नेमके कोण आहेतते आपापल्या जागी, पण संपूर्ण देशाचा अपमान होत आहे. 140 कोटी देशवासियांना या प्रकारणाची लाज वाटत आहे. मी मुख्यमंत्र्यांना माता-भगिनींच्या रक्षणासाठी पावले उचलण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांच्याकडून करण्यात आले आहे.

यावेळी पंतप्रधानांनी राजस्थान, छत्तीसगढ येथील घटनांचा देखील त्यांनी उल्लेख करत म्हटले की, घटना कोणत्याही राज्यातील असो, सरकार कोणतेही असो, महिलांच्या सन्मानासाठी राजकारणाला दूर ठेवून काम केले पाहिजे. मी देशवासियांना हा विश्वास देऊ इच्छितो की कोणालाही सोडले जाणार नाही. मणिपूरच्या मुलींसोबत जे काही झाले त्याबद्दल कुणालाही माफ केले जाणार नाही. याबाबतचे ट्वीट केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून शेअर करण्यात आले आहे.

- Advertisement -

 या प्रकरणी आयोग देखील आक्रमक झाले असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी मणिपूरची घटना हृदय पिळवटून टाकणारी असल्याचे सांगत म्हटले आहे की, यासंदर्भात आम्ही डीजीपी, सीएस आणि मणिपूर प्रशासनासोबत बातचीत केली आहे. या प्रकरणातील मु्ख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. यावरील रिपोर्ट 24 तासात मागवला आहे. तसेच, आम्ही ट्विटरला ही नोटीस धाडली आहे. कारण त्यांनी अशा प्रकारचा एका महिलेचा विवस्र व्हिडिओ प्रसारित केल्याने ब्लॉक का केला नाही, असा प्रश्न रेखा शर्मा यांच्याकडून करण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देखील या प्रकरणावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. हिंसाचार सुरु असणाऱ्या क्षेत्रामध्ये महिलांचा वापर एखाद्या वस्तूसारखा केला जात आहे. त्यामुळे या घटनेतील दोषींवर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली आहे, याबाबतची माहिती देखील न्यायालयाकडून मागविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणावरील पुढील सुनावणी ही पुढील आठवड्यात शुक्रवारी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -