घरदेश-विदेशखासदारकी गेल्याने बेघर झालेले राहुल गांधी पंतप्रधान निवासस्थानापेक्षाही मोठ्या बंगल्यात राहाणार

खासदारकी गेल्याने बेघर झालेले राहुल गांधी पंतप्रधान निवासस्थानापेक्षाही मोठ्या बंगल्यात राहाणार

Subscribe

राहुल गांधी यांना त्यांचा तुघलक लेन येथील बंगला खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनीही त्याला मान्यता दिली असून लवकरच बंगला सोडणार असल्याचे लोकसभा सचिवालयाला लेखी उत्तरात कळवले आहे. यानंतर राहुल गांधी हे आई सोनिया गांधी यांच्यासोबत १० जनपथ येथे राहाणार आहेत.

Rahul Gandhi’s new bungalow : नवी दिल्ली – काँग्रेस माजी उपाध्यक्ष राहुल गांधी सरकारी बंगला सोडण्याची तयारी करत आहेत. खासदार निवास सोडून ते आता आई सोनिया गांधी यांच्या घरी १०, जनपथ येथे स्थलांतरित होत आहेत. राहुल गांधी यांनी त्यांचे बरेच सामान शिफ्ट देखील केले असून लवकरच त्यांचा नवा पत्ता हा १० जनपथ असणार आहे.

२३ मार्च रोजी सूरत कोर्टाने मोदी सरनेम मानहानी प्रकरणी (Modi Surname Case) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला. त्यानंतर दोन दिवसांनी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचे निर्देश लोकसभा सचिवालयाने जारी केले. २७ मार्च रोजी त्यांना शासकीय निवासस्थान खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली. राहुल यांच्या या सरकारी बंगल्यासोबत अनेक चांगल्या आठवणी आहेत. बंगला खाली करण्याची नोटीस मिळाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची आई सोनिया यांनी आपल्यासोबत राहाण्याचा त्यांना आग्रह केला होता. राहुल यांनी आईसोबत १० जनपथ येथे राहाण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

पंतप्रधान निवास्थानापेक्षा मोठे आहे सोनियांचे निवासस्थान
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या रायबरेली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. तेव्हा त्यांना राहाण्यासाठी शासकीय बंगला देण्यात आला. सोनिया गांधी यांचा बंगला हा पंतप्रधानांच्या निवासस्थानापेक्षाही मोठा असल्याची माहिती आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार, पंतप्रधानांचे ७ आरसीआर या सरकारी बंगल्याचे क्षेत्रफळ १४,१०१ वर्ग मीटर आहे. तर सोनिया गांधी राहातात त्या १०, जनपथचे क्षेत्रफळ १५,१८१ वर्ग मीटर आहे.
लाल बहादूर शास्त्री जेव्हा पंतप्रधान झाले होते तेव्हा ते १० जनपथ येथे राहात होते. इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ला हत्या करण्यात आली. त्यानतंर राजीव गांधी यांचे कुटुंब येथे शिफ्ट झाले होते. या बंगल्याच्या मागेच काँग्रेसचे मुख्यालय आहे.

राहुल गांधी यांचे १२ तुघलक लेन येथील सध्याचे निवासस्थान
राहुल गांधी यांचे १२ तुघलक लेन येथील सध्याचे निवासस्थान

राहुल गांधी सोडणार १२ तुघलक रोड
राहुल गांधी २००४ मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर त्यांना राहाण्यासाठी हा बंगला देण्यात आला होता. राहुल गांधी यांना २७ मार्च रोजी लोकसभा हाऊसिंग कमिटीने १२ तुघलक रोड येथील शासकीय निवासस्थान खाली करण्याची नोटीस बजावली आहे. २४ एप्रिल पर्यंत त्यांना बंगला खाली करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांनी लोकसभा सचिवालयाचे उप सचिव डॉ. मोहित रंजन यांना लिखित उत्तर दिले आहे.
लिखित उत्तरात राहुल गांधी म्हणाले, मी चारवेळा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो आहे. हा लोकांचा जनादेश होता. त्यांचा मी आभारी आहे. या घरासोबत माझ्या अनेक चांगल्या आठवणी आहेत. मात्र मला मिळालेल्या नोटीसचे मी पालन करणार आहे. राहुल गांधी २००४ मध्ये अमेठी मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले होते. २००५ मध्ये त्यांना हा बंगला देण्यात आला होता.

- Advertisement -

काय आहे मोदी सरनेम मानहानी प्रकरण
काँग्रेस माजी उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्नाटकमधील जाहीर सभेत मोदी सरनेमवरुन टिप्पणी केली होती. ते म्हणाले होते, नीरव मोदी, ललित मोदी यांनी देशाचा पैसा घेऊन पोबारा केला आहे. आणि एक प्रश्न, नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे सर्व चोर हे मोदीच कसे असतात? यानंतर गुजरात भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात सूरत सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यात त्यांना २३ मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -