घरदेश-विदेशचीनच्या दाव्याला चाप; अरुणाचलबाबत पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची नवी खेळी

चीनच्या दाव्याला चाप; अरुणाचलबाबत पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची नवी खेळी

Subscribe

नवी दिल्ली : चीनने अरुणाचल प्रदेशच्या काही ठिकाणांवर आपला दावा सांगण्यासाठी त्यांची नावे चिनी, तिबेटी आणि पिनयिन लिपीत प्रसिद्ध केली होती. त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवाय केंद्र सरकारने देखील त्यावरच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोनच दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी तेथील नैसर्गिक सौंदर्याचे व्हिडीओ शूटिंगही केले होते. तो व्हिडीओ अमित शाह यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शेअर केला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे जाहीर केली. यामध्ये दोन भूभागांची नावे, दोन निवासी क्षेत्रांची नावे, पाच पर्वतीय प्रदेशांची नावे आणि दोन नद्यांची नावे समाविष्ट आहेत. चीन सरकारच्या प्रांतीय परिषदेने या परिसराला जंगनन असे नाव ठेवून तो तिबेटच्या दक्षिणेकडील भाग असल्याचे म्हटले आहे. चीनचा हा दावा भारताने लगेचच फेटाळला.

- Advertisement -

त्यापाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशाचा दौरा केला आणि सुईच्या अग्राइतक्या जमिनीवरील परकियांचा ताबा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी येथे दिला. अरुणाचल प्रदेशातील भारतातील पहिले गाव किबिथू येथे जाण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नागरिकांना केले. तसे पाहिले तर, किबिथू हे शेवटचे गाव असले तरी सूर्याची किरणे येथे प्रथम पडतात, त्यामुळे याला पहिले गाव म्हटले पाहिजे. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी लोकांनी येथे यावे आणि इतिहासापासून प्रेरणा घ्यावी, असे गृहमंत्री म्हणाले.

- Advertisement -

गावातील बर्फाच्छादित पर्वतरांगा, धबधबे, नदी आणि दऱ्या दाखवणारा व्हिडीओही अमित शाह यांनी ट्विटरवर शेअर केला. त्याच्याबरोबर, “भारतातील पहिले गाव किबिथूच्या दौऱ्यादरम्यान सुंदर दृश्ये मी टिपली. अरुणाचल प्रदेशला अफाट नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. मी सर्वांना विनंती करतो की अरुणाचल प्रदेशला, विशेषत: किबिथूला भेट द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचे हे ट्वीट रीट्वीट करत, ‘शांत आणि वैशिष्ट्यपूर्ण अरुणाचल प्रदेश’ असे म्हटले आहे. एकूणच चीनच्या कुरापतीनंतर केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -