घरदेश-विदेशअखेरचा निरोप ,सुषमा स्वराज अनंतात विलीन

अखेरचा निरोप ,सुषमा स्वराज अनंतात विलीन

Subscribe

वृत्तसंस्था माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर दिल्लीतील लोधी रोड येथील स्मशानभूमीत बुधवारी सायंकाळी शासकीय इतमामाने अंत्यसस्कार करण्यात आले. लोकसभेच्या माजी विरोधी पक्ष नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री राहिलेल्या सुषमा यांच्या तिरंग्यात लपेटलेल्या पार्थिवाला अखेरचा निरोप देताना स्मशानात उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. सुषमा यांची मुलगी बांसुरी यांनी अंत्यविधी केल्यानंतर त्यांचा देह विद्युतदाहिनीत विसावला.

सुषमा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, भाजप कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, भूतानचे पंतप्रधान टोबगे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, बसपच्या अध्यक्षा मायावती, काँग्रेस नेते राहुल गांधी, गुलाम नबी आझाद आणि यांच्यासह भाजपाच्या सगळ्याच दिग्गजांची उपस्थिती होती.

- Advertisement -

मंगळवारी रात्री छातीत दुखू लागल्याने स्वराज यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान हृदय बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुषमा स्वराज यांचे जाणे चटका लावून जाणारे आणि अविश्वसनीय आहे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे. तर देशातल्या प्रत्येक नेत्याने त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. विरोधी पक्षातील नेते सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी सुषमा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.त्यापूर्वी सुषमा यांचे पार्थिव दिल्ली येथील भाजपा मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

त्यांच्या अंत्यदर्शनावेळी जेव्हा पंतप्रधान मोदी भाजपा मुख्यालयात आले तेव्हा त्यांनाही अश्रू अनावर झाले. केंद्र सरकारने काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला याबाबत सुषमा यांनी अखेरचा ट्विट करुन अभिनंदन केले होते. या दिवसाची आपण वाट पाहिली होती असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते आणि दुर्दैवाने तेच त्यांचे अखेरचे ट्विट ठरले. सुषमा मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री होत्या. एक ते दीड वर्षापूर्वी त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. प्रकृतीचे कारण देत त्यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णयजाहीर केला होता. तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही महिन्यांपासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या.

- Advertisement -

दिल्ली सरकारकडून दोन दिवसांचा दुखवटा
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांना आदरांजली म्हणून दिल्ली सरकारकडून दोन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार असल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट करून, भारताने एक महान नेता गमावला. सुषमाजी या आदरणीय व्यक्ती होत्या. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली आहे.

सुषमा स्वराज यांच्या निधनाने प्रचंड दु:ख झाले. देशाने आपली लाडकी लेक गमावली आहे. धाडस आणि निष्ठेचे त्या मूर्तीमंत उदाहरण होत्या. लोकांच्या मदतीसाठी त्या नेहमीच तत्पर असायच्या. त्यांची सेवा आणि योगदान देश कदापी विसरणार नाही.
– रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील तेजस्वी अध्यायाचा अस्त झाला आहे. त्यांनी जनहितासाठी आणि गरिबांसाठी आयुष्यभर काम केले. त्या उत्तम वक्ता, उत्तम प्रशासक होत्या. प्रकृती ठिक नसतानाही त्यांनी गेल्या पाच वर्षात माझ्या मंत्रिमंडळात अविश्रांत काम केले.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असे संबोधायच्या, संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सुषमा स्वराज यांच्या आकस्मिक निधनाने धक्का बसला. त्या नैसर्गिक प्रतिभाशाली महिला होत्या. ज्या ज्या पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली, त्या त्या वेळी त्यांनी साहस, समर्पण आणि योग्यतेचा परिचय करून दिला. मनमिळावू आणि समाजातील सर्व घटकांप्रती संवेदनशील होत्या.
– सोनिया गांधी, काँग्रेस नेत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -