घरमहाराष्ट्रसांगली, कोल्हापूर, कोकणात महापूर

सांगली, कोल्हापूर, कोकणात महापूर

Subscribe

१६ जणांचे बळी, १ लाख ३२ हजार जण सुरक्षितस्थळी

राज्यातील कोकण किनारपट्टीसह, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मागील तीन दिवस सलग मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या भागातील धरणे भरली असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. परिणामी पंचगंगा, वारणा, कृष्णा या नद्यांना पूर आल्याने सांगली, कोल्हापुरात महापुरासारखी स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अखेरीस हवाई दल, नौदलाला पाचारण करण्यात आले. या पुरात आतापर्यंत १६ जणांचे बळी गेले आहेत. शिवाय १लाख ३२ हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

गोकुळचे १० लाख लिटर दूध रखडले
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख मार्ग बंद आहेत. यामुळे गोकूळ दूध संघाचे दुधाचे टँकर भरून जागेवरच थांबले आहेत. याचा जिल्हा दूध संघ गोकुळला मोठा फटका बसला आहे. किमान दहा लाख लिटर दुध रखडले आहे.

- Advertisement -

सांगलीत शहरे पाण्याखाली
सांगली जिल्ह्यात सांगली, पलूस, वाळवा तालुक्यात पुराचा जबरदस्त फटका बसला. सुमारे 53 हजार नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस तालुक्यातील नागरिकांना पुरपरिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. पंढरपूर येथील सुमारे 2000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

पुण्यात ६४ जावे प्रभावित, पंढरपूरची नाकेबंदी
पुणे जिल्ह्यात शहरासह 64 गावे पूराने प्रभावित झाली असून सुमारे 3 हजार 343 लोकांना मदत करण्यात आली आहे. पुरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये गहू आणि तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली आहेत. पंढरपूरची अक्षरश: नाकेबंदी केली आहे. मराठवाडा, बार्शी, सोलापूरशी असलेले संपर्क रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे ठप्प झाले आहेत. त्याचबरोबर तालुक्याच्या ग्रामीण भागातील ४० पेक्षा जास्त गावांतील हजारो हेक्टर पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या आठ दिवसांपासून वीर धरणातून तर गेल्या चार दिवसांपासून उजनी धरणातून भीमा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहता-वाहता पात्राच्या बाहेर पडली आहे. पंढरपूर शहराला सोलापूर, बार्शी, मराठवाड्याशी नवे, जुने तिन्ही तर मंगळवेढ्याला जोडणारे गोपाळपूर येथील दोन्ही पूल पाण्याखाली गेल्यामुळे बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून पंढरीत करकंब, शेटफळ, मोहोळ, तिर्हे, मंगळवेढा मार्गे येणारी सर्व वाहतूक पूर्णपणे बंद झाली. येथील दगडी पूल सोमवारीच पाण्याखाली गेला आहे. तर बुधवारी सकाळी ११ वाजता टेंभुर्णीकडे जाणारा नवीन पूल आणि १ वाजण्याच्या सुमारास दगडी पुलाजवळील बांधण्यात आलेला नवीन पूलही पाण्याखाली गेला.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यात ८ तालुके बाधीत
रायगड जिल्ह्यात 8 तालुके बाधीत असून सरासरीच्या 105 टक्के पाऊस झाला. सुमारे 3000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेे. रत्नागिरी जिल्ह्यातील 38 धरणे 100 टक्केे भरली. पुरामुळे 13 गावे बाधीत झाली आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या 50 वर्षांतला सर्वाधिक विसर्ग सोडण्यात आला असून सर्व धरण 80 टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. ठाणे जिल्ह्यात 13 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

वार्षिक सरासरी पर्जन्यमान
राज्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1007 मिमी असून आतापर्यंत सरासरीच्या 685 मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत प्रत्यक्ष 714.40 मिमी पाऊस झाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या पुर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये तसेच पुरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न धान्य, पिण्याचे पाणी आदि सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिले. अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूर परिस्थिती यंत्रणांमार्फत सुरू असलेले मदतकार्य याबाबत मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेतला.

पुणे-मुंबई ट्रेन दोन दिवस बंद
पुण्यासह मुंबईमध्ये गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पाश्वर्र्भूमीवर खबरदारी म्हणून रेल्वेने पुणे-मुंबई धावणार्‍या डेक्वीन क्वीन, इंटरसिटी, सिंहगड आणि इंद्रायणी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या मनमाड मार्गे वळवण्यात आल्या आहेत. मंगळवारी पुणे आणि मुंबई दरम्यान धावणार्‍या सर्व रेल्वे पावसामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. पुणे-मुंबई दरम्यान धावणार्‍या रेल्वे गाड्या सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील असा अंदाज मध्य रेल्वेने व्यक्त केला आहे.कर्जत-लोणावळा आणि बदलापूर-कर्जत दरम्यान दरड कोसळल्या आहेत. या परिस्थितीत गाड्या सोडणे धोक्याचे ठरू शकते, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दोन्ही बाजूने गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला . याबरोबरच बुधवारी (७ ऑगस्ट) पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस आणि शुक्रवारी (९ ऑगस्ट) एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोल्हापुरात एअरलिफ्टींगने मदतकार्य
कोल्हापुराला पुराचा जोरदार फटका बसला असून तेथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) 22 पथके कार्यरत झाली आहेत. या पुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी डोनिअर विमानाच्या माध्यमातून स्थलांतर करण्याची मागणी करण्यात आली असून त्यानुसार तातडीने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. कोल्हापुरातील एकूण 204 गावांना पुराचा फटका बसला आहे.

प्रशासनामार्फत सध्या 11 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मंगळवारी नौदलाचे बचाव पथक देखील या ठिकाणी कार्यरत झाले.

कोल्हापूर शहरातून जाणार्‍या पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदी पात्रातून तब्बल चार फूट पाणी आल्याने वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे तब्बल ५ हजार ट्रक महामार्गावर अडकले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -