घरदेश-विदेशसंसद अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस; सत्ताधारी-विरोधकांमधील कोंडी फुटणार?

संसद अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस; सत्ताधारी-विरोधकांमधील कोंडी फुटणार?

Subscribe

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज, गुरुवारी शेवटचा दिवस आहे. अधिवेशन हा दुसरा टप्पा 13 मार्च 2023 रोजी सुरू झाला. सभागृहातील गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेत आतापर्यंत अल्पकाळच कामकाज चालले. उद्योगपती अदानी यांची चौकशी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यावरून गेल्या 14 बैठकांमध्ये बराच गदारोळ झाला होता. तर, आज, गुरुवारी सर्व विरोधी पक्षांचे नेते तिरंगा घेऊन संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढणार आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे गुरुवारी सूप वाजणार असले तरी, दोन्ही सभागृहांमधील कोंडी फुटण्याचे नाव घेत नाही. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गेल्या काही दिवसांपासून आपापल्या मागण्या लावून धरत संसदेचा आखाडा बनवला आहे. परिणामी कोणत्याही विषयावर सांगोपांग चर्चा झालेली नाही. बुधवारीही राहुल गांधींनी माफी मागावी ही सत्ताधाऱ्यांची मागणी तर, अदानी प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी व्हावी या विरोधकांच्या मागणीमुळे संसदेचे कामकाज ठप्प झाले होते. गदारोळ आणि घोषणाबाजीमुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते

- Advertisement -

संसदेबाहेरही सत्ताधारी आणि विरोधक, विशेषत: भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. बुधवारी लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि द्रमुकचे सदस्य सभागृहाच्या मध्यभागी आले. जेपीसी स्थापन करून अदानी प्रकरणाची चौकशी करावी, अशी आग्रही मागणी करत त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. तर, तृणमूल काँग्रेस, जनता दल युनायटेड, आम आदमी पार्टीसह इतर विरोधी सदस्यांनीही आपापल्या जागेवर उभे राहून घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब करावे लागले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी कोस्टल एक्वाकल्चर अथॉरिटी (सुधारणा) विधेयक, 2023 सादर केले. पण गदारोळ सुरूच राहिल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

राज्यसभेतही हीच परिस्थिती होती. तिथे काँग्रेस आणि इतर विरोधी सदस्यांनी जेपीसीच्या मागणीवरून गदारोळ केला. तर, परदेशात भारतीय लोकशाहीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी करत भाजपा सदस्यांनी घोषणाबाजीही केली. गोंधळ थांबत नसल्याचे पाहून सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज तहकूब केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -