घरताज्या घडामोडी..तर मी गप्प बसणाऱ्यांमधला नाही, राजीनामा दिला असता - उदयनराजे भोसले

..तर मी गप्प बसणाऱ्यांमधला नाही, राजीनामा दिला असता – उदयनराजे भोसले

Subscribe

राज्यसभेत बुधवारी ६२ नव्या खासदारांचा शपथविधी झाला. यावेळी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा दिली. यावेळी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत हे राज्यघटनेला धरून नाही, तुम्ही फक्त शपथ घ्या, अशी भूमिका मांडली. त्यावरून हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे अशी आरोळी देत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. त्यावर खुद्द उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन हा शिवाजी महाराजांचा अपमान नाही, राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होण्यासारखं काहीही घडलेलं नाही, त्यामुळे नसलेल्या मुद्द्यावरून गोंधळ घालू नये, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले उदयनराजे भोसले?

‘जो तो त्या त्या भाषेत शपथ घेईल. ज्याने आक्षेप घेतला, त्याने सांगितलं की हे राज्यघटनेला धरून नाही. त्यावर वाद झाले. माझी प्रामाणिकपणे सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती. याआधी शिवाजी महाराजांच्या नावाने भरपूर राजकारण झालं. अनेकांनी मी महाराजांच्या कुटुंबातला नाही असंही सांगितलं. जर महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसणाऱ्यांमधला नाही. तिथेच राजीनामा देऊन टाकला असता. पण जे घडलंच नाही, त्याला राजकारणाचा मुलामा देऊन लोकं म्हणत असतील की असं काही झालं, तर ते तसं झालेलं नाही. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे. महाराष्ट्रात देखील अनेकांनी आपापल्या पद्धतीने शपथ घेतली. त्यामुळे यावरून राजकारण करू नये अशी विनंती आहे’, असं ते म्हणाले.

मी उदयनराजेंच्या भावनांशी सहमत आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने कुणीही राजकारण करू नये, महाराजांचा अपमान कुणी सहन करू नये. जय भवानी, जय शिवाजी या घोषणा याआधीही आंदोलनादरम्यान सभागृहात देखील आम्ही दिलेल्या आहेत. नायडू उपराष्ट्रपती आहेत. राज्यसभेचे सभापती आहेत. त्यामुळे ते नियमांचं काटेकोर पालन करतात. हा वाद वाढू नये, असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. शिवाजी महाराजांबद्दलच्या घोषणा घटनाबाह्य नाहीत, एवढंच आमचं म्हणणं आहे. यावर आता इतर राजकीय पक्ष काय भूमिका मांडत आहेत, यावर मला बोलायचं नाही.

संजय राऊत, खासदार, शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -