घरदेश-विदेशभाजपाचे ‘सत्यवादी’ अद्याप मणिपूरमध्ये का गेले नाहीत? ठाकरे गटाचा थेट सवाल

भाजपाचे ‘सत्यवादी’ अद्याप मणिपूरमध्ये का गेले नाहीत? ठाकरे गटाचा थेट सवाल

Subscribe

मुंबई : पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीत मतदान केंद्रांवर हिंसाचार, रक्तपात, जाळपोळ, बुथ लुटण्यासारखे प्रकार घडले. आता भाजपाचे रविशंकर प्रसाद हिंसाचार का घडला याचे सत्यशोधन करण्यासाठी तिथे गेले आहेत. पश्चिम बंगालमधील हा हिंसाचार निषेधार्ह आहे, मग मणिपुरातील हिंसाचारामागचे सत्यशोधन करण्यासाठी भाजपाचे ‘सत्यवादी’ अद्याप का गेले नाहीत? मणिपूरला कोणत्याही निवडणुका नाहीत तरी, संपूर्ण राज्य पेटले आहे. त्यावर पंतप्रधान मोदी सोडाच, तर भाजपाचे एकही राष्ट्रीय पोपटलाल बोलायला तयार नाहीत, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे.

पश्चिम बंगालमधील निवडणुकांत हिंसाचार होईल, अशी भीती भाजपा नेत्यांनी आधीच व्यक्त केली व त्यानुसार केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या मोठ्या प्रमाणात तैनात केल्या. तरीही हिंसाचार थांबला नाही व 40च्या आसपास मृत्यू झाले असतील तर ते केंद्राचे अपयश आहे. मुळात ग्रामपंचायत निवडणुकांत केंद्राने नाक खुपसण्याची गरज नव्हती. आता भाजपाचे रविशंकर प्रसाद वगैरे लोक हिंसाचार का घडला याचे सत्यशोधन करण्यासाठी बंगालात पोहोचले. हासुद्धा एक घोटाळाच आहे, अशी टीका सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.

- Advertisement -

देशात लोकशाही उरली आहे काय?
रविशंकर प्रसाद यांचे म्हणणे असे की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकशाहीला कलंक लावला आहे. मुळात आपल्या देशात लोकशाही उरली आहे काय? या प्रश्नाचे उत्तर कोणी देऊ शकत नाही. प्रसाद यांनी लोकशाहीच्या नावाने गळा काढला, हे ढोंग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तर जागोजाग लोकशाहीस वधस्तंभावर चढवले आहे, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

हिंसाचारात तृणमूल कार्यकर्त्यांचाही मृत्यू
पश्चिम बंगालातील पंचायत निवडणुकांत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याची बोंब भाजपाने ठोकली. ममता बॅनर्जी यांनी कंबरड्यात लाथ घातल्यानंतरचे हे केकाटणे आहे. पश्चिम बंगालात हिंसाचार घडला म्हणून भाजप छाती पिटून घेत आहे. पश्चिम बंगालातील हिंसाचारात तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्तेही मरण पावले. यावर भाजपा काय बोलणार? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

भाजपा दुसऱ्या क्रमांकावर
पश्चिम बंगालमध्ये साधारण 74 हजार पंचायतींसाठी निवडणुका झाल्या. भाजपा, तृणमूलमध्ये लढत झाली व या निवडणुका एखाद्या युद्धाप्रमाणे लढल्या गेल्या. या युद्धात 40 जणांचा मृत्यू झाला. पण ग्रामपंचायतींच्या 35 हजार जागा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने जिंकल्या. भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपाने 9,722 ग्रामपंचायती जिंकल्या. तथापि, एकाही जिल्हा परिषदेत ‘कमळ’ फुलले नाही, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

ममतांची झुंज वाघिणीसारखी
या पंचायत निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. भाजपाने या निवडणुका जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला. केंद्रीय सुरक्षा दलाच्या फौजा पाठवून निवडणुकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण ममता बॅनर्जी यांनी तोडीस तोड मुकाबला केला. ममता बॅनर्जी यांनी एखाद्या वाघिणीसारखी झुंज दिली, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -