एक वेडी आशा…

Subscribe

‘महाराष्ट्राच्या राजकारणाचा आता चिखल झाला आहे. राजसाहेब…उद्धवसाहेब…आता तरी एकत्र या. संपूर्ण महाराष्ट्र आपली वाट पाहत आहे…महाराष्ट्र सैनिकाची हात जोडून कळकळीची विनंती!’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी शिवसेना आणि मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरसह संपूर्ण महाराष्ट्रात हा संदेश असलेले बॅनर्स लावले आहेत. या माध्यमातून पुन्हा एकदा दोन भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तत्पूर्वी मनसेच्या अंतर्गत बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याच्या ब्रेकिंग न्यूज देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात यात तथ्यच नसल्याची बाब दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनीच माध्यमांसमोर स्पष्ट केली. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळणे गरजेचे होते, परंतु सध्याच्या अस्थिर राजकीय परिस्थितीत कोणत्याही बाजार गप्पांना महत्त्व येत असल्यामुळे या ‘कथित बातमी’चेही मूल्य वाढले.

अर्थात उद्धव ठाकरेंच्या सेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणे, शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह मोठा गट फुटून सत्तांतर करणे आणि राष्ट्रवादीतील काका-पुतण्यातील वादाची परिणती पक्षात उभी फूट पडण्यात होणे या सर्व घडामोडी बघता कधीही काहीही होऊ शकते असे दिसून येत आहे. राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांनाही यामुळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच राज ठाकरे यांचे विश्वासू अभिजित पानसे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर मनसे-ठाकरे गटाची युती होण्याच्या चर्चांना अधिक जोर आला, पण अभिजित पानसे यांनी आपण वैयक्तिक कामासाठी सामना कार्यालयात गेलो होतो, असे सांगितले, मात्र त्यानंतरही चर्चा थांबलेली नाही. उद्या आणखी एखादा मनसेचा नेता शिवसेना कार्यालयाच्या आसपास जरी फिरकला तरी युतीच्या बाजार गप्पांना सुरुवात होईल. यासंदर्भात सुषमा अंधारे यांनीही राज-उद्धव एकत्र यावे, अशी इच्छा प्रदर्शित केली आहे.

- Advertisement -

मुळात प्रश्न राज-उद्धव एकत्र आले तर राज्याच्या राजकारणातील समीकरणे किती मोठ्या प्रमाणात बदलतील असा असा आहे. आजघडीला उद्धव ठाकरे यांच्याकडे अवघे १६ आमदार आहेत. त्यांच्या बहुतांश दबंग आमदारांनी एकनाथ शिंदेंचे बोट पकडले. त्यामुळे उद्धव सेना आता पुरती रिती आहे. दुसरीकडे राज यांच्या मनसेची त्याहून वाईट अवस्था आहे. मनसेचा अवघा एक आमदार आहे. त्यामुळे राज-उद्धव एकत्र आले तरी दोघांच्या मिळून आमदारांचा आकडा वीसच्या वर जात नाही. त्यामुळे हे दोघे एकत्र आले तरी त्यातून काही चमत्कार होईल असे सध्या तरी वाटत नाही, पण काहीतरी मोठे होऊ शकेल अशी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची वेडी आशा आहे. सध्याची परिस्थिती पाहता जर दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर राज्यातील जनतेची पसंती त्यांना अजिबातच मिळणार नाही असेही होणार नाही.

राज्यातील राजकारणात वेगळेपण, नवीन संधी आणि ठाकरे यांच्याविषयीचा असलेला भावनिक बंध यामुळे ही ‘संभाव्य युती’ चर्चेत येऊ शकते, पण केवळ चर्चेला अर्थ नाही. त्यासाठी दोन्ही बाजूच्या मुख्य नेत्यांनी युतीसाठी पायाभूत गोष्टींना हात घालण्याची गरज आहे. खरेतर २७ नोव्हेंबर २००५ला राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. या घटनेला आता १८ वर्षे पूर्ण झाली आहेत, परंतु या काळात त्यांना चमकदार कामगिरी टिकवून ठेवता आलेली नाही. गेल्या १८ वर्षांत बरेच काही घडले आहे. दोघांनी एकमेकांविरोधात बोचरी टीका केली. आरोप-प्रत्यारोप केले, तर काही वेळेला राजकीय तर काही वेळा कौटुंबिक कार्यक्रमात ते एकत्र दिसले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना राज ठाकरे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते, तर राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरेंसह परिवार हजर होता. कुटुंबावर संकट आल्यावरही दोघांमधली एकी यापूर्वी दिसली आहे. दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याची मागणी होण्याची १८ वर्षांतील ही काही पहिलीच वेळ नाही.

- Advertisement -

अगदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते अनेक नेत्यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे. तसे पाहिले तर शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचे राजकारण हिंदुत्व आणि मराठी अस्मिता याभोवतीच फिरते. त्यामुळे हे दोघे एकत्र आल्यास त्याला अनैसर्गिक युती संबोधता येणार नाही. यापूर्वी दोघांनी एकमेकांना टाळी देण्याचा विषय जाहीरपणे झाला होता. प्रत्यक्षात या टाळ्या केवळ बातम्यांपुरत्याच राहिल्या. शिवाय कुणी टाळीसाठी हात पुढे केला आणि दुसर्‍याने त्याला प्रतिसाद दिला तरी त्यातून टाळीचा आवाज येईलच याची शाश्वती आजच्या घडीला कुणी देऊ शकत नाही.

दोन्ही पक्षांकडे आज व्यापक आणि सक्षम टीम नाही. शिवसेनेने वा मनसेने सभा घ्यायचे ठरवल्यास राज-उद्धव यांच्याशिवाय त्यांच्याकडे ताकदीचे नेते नाहीत. या सभांना गर्दी झाली तरी त्याचे मतदानात रूपांतर होत नाही याचा अनुभव दोन्ही भावांनी घेतला आहे. त्यामुळे आजघडीला निर्माण झालेली राजकीय पोकळी मनसे-शिवसेना युतीने भरून निघणार नाही. त्यासाठी दोन्ही नेत्यांना आपापल्या पातळीवर संघटन बळकट करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. आळस बाजूला ठेवून राज्याचे दौरे करावे लागतील. नवे नेतृत्व निर्माण करावे लागेल. त्यानंतर एकमेकांना टाळ्या देण्याचा विचार होऊ शकतो, अन्यथा टाळ्यांचे प्रस्ताव फुसकेच ठरतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -