घरसंपादकीयअग्रलेखशिवसेनामुक्त महाराष्ट्र हाच अजेंडा

शिवसेनामुक्त महाराष्ट्र हाच अजेंडा

Subscribe

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठीच एकनाथ शिंदेंमार्फत शिवसेनेत बंड घडवून आणलं गेलं. त्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा असल्याचा गौप्यस्फोट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडाचं गुपित अखेर उघड केलं. खरंतर हे गुपित सर्वसामान्यांना आधीपासूनच माहीत होतं. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटामुळे त्याला दुजोरा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठीच एकनाथ शिंदेंमार्फत शिवसेनेत बंड घडवून आणलं गेलं. त्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा असल्याचा गौप्यस्फोट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडाचं गुपित अखेर उघड केलं. खरंतर हे गुपित सर्वसामान्यांना आधीपासूनच माहीत होतं. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटामुळे त्याला दुजोरा मिळाला आहे. यामागे शिवसेनामुक्त महाराष्ट्र करण्याचा भाजपचा छुपा अजेंडा असून त्याचा पहिला डाव बंडाच्या निमित्ताने भाजपनं टाकला आहे. आणि त्यात भाजपला यशही मिळालं आहे. गेल्या दीड महिन्यांपासून महाराष्ट्रात राजकीय उलथापालथी सुरू आहेत. त्यामुळे सध्यातरी राज्याला स्थिर सरकार मिळू शकलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे ४२ आमदार आणि आता बाराहून अधिक खासदार फोडत शिवसेनेला मोठा सुरुंग लावला आहे. बंडखोरीची बक्षिशी म्हणून अवघ्या ४२ आमदारांच्या बळावर शिंदे मुख्यमंत्री झाले.

बंडखोर दररोज वेगवेगळ्या कहाण्या सांगत बंडखोरी का केली, असे सांगून आपली बाजू पटवून देण्याचा खटाटोप करत आहेत. पण, बंडखोरी नेमकी का केली हे मुख्यमंत्री शिंदेंसह त्यांचे समर्थक आमदार, खासदार सांगू शकलेले नाहीत. त्यातच पनवेलमधील भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडामागचं खरं गुपित उघड केलं आहे. शिंदेंचं बंड अचानक घडलं नव्हतं. सर्व काही ठरवून घडलं होतं. शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं हेही आधीच ठरलं होतं. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा होती आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे हे सर्व घडलं, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या कबुलीनं महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार भाजपनेच ठरवून पाडलं हे आता उजेडात आलं आहे. खरं तर हे आमजनतेला आधीपासूनच माहीत होतं. पण, शिंदे आणि त्यांच्या समर्थकांसह बंडाला उठाव आणि नाराजीचा मुलामा देण्याचं काम करून सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचं काम सुरू होतं. ते सर्वजण आता उघडे पडले आहेत.

- Advertisement -

काँग्रेसमुक्त भारत करण्याचा मुख्य अजेंडा असलेल्या भाजपने ते करूनही दाखवलं. त्याचबरोबर देशातील प्रादेशिक पक्ष नेस्तानाबूत करत पाय रोवण्याचाही भाजपचा अजेंडा आहे. महाराष्ट्रात एकहाती सत्ता घ्यायची असेल तर शिवसेना संपली पाहिजे, हे भाजपच्या नेत्यांचं ठाम मत होतं. त्यामुळे शिवसेनामुक्त महाराष्ट्र हा तर भाजपचा छुपा अजेंडा असल्याचं बंडखोरीचं गुपित उघड झाल्यामुळे आता समोर यायला लागलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेची अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी फेटाळून लावत भाजपनं ताणून धरलं होतं. शिवसेना भाजपशिवाय राज्यात सरकार बनवूच शकत नाही, असा ठाम विश्वास भाजपच्या नेत्यांना होता. पण, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्याला छेद देण्याचं काम केलं. पवार यांनी राजकीय परिस्थितीचा नेमका फायदा उचलला. त्यांनी उध्दव ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनण्याचा प्रस्ताव दिला.

सोबत काँग्रेसला घेतलं आणि राज्यात उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं. खरं तर हा भाजपसाठी मोठा धक्का होता. एकतर शिवसेनेला बाजूला सारून भाजपने पहाटेच्यावेळी राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांना सोबत घेत सरकार बनवलं होते. पण, शरद पवारांनी हा गेम उलटवून उध्दव ठाकरेंना सोबत घेत महाविकास आघाडी सरकार आणलं. महाराष्ट्रात नुसत्या हिंदुत्वाच्या मुद्यावर एकहाती सत्ता मिळवणं तशी सोपी गोष्ट नाही, हे भाजपच्या नेत्यांना चांगलंच ठाऊक आहे. महत्वाचं म्हणजे देशात पर्यायी हिंदुत्ववादी पक्ष तयार होऊ न देण्याची काळजीही भाजपकडून घेतली जात आहे.

- Advertisement -

शिवसेना तळागाळात पोचलेला पक्ष आहे. उध्दव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत सत्तेत भागिदारी केली होती. पण, हिंदुत्वाचा विचार न सोडता राजकीय वाटचाल सुरुच ठेवली होती. शिवसेना हिंदुत्वापासून दुरावत असल्याचा भाजपचा प्रचार म्हणूनच महाराष्ट्रात फारसा प्रभाव टाकू शकत नव्हता. शिवसेना राज्यात पाच वर्षे सत्तेत राहिली तर भाजपला पुढची निवडणूक कठीण जाणार याची भीती वाटत होती. त्यासाठी भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा पहिल्यापासूनचा प्रयत्न होता. एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा नेमका फायदा फडणवीसांनी उचलला आणि उध्दव ठाकरेंचं सरकार पाडण्याचा खेळ सुरू झाला.

नंतरच्या घडामोडी गेले दीड महिना संपूर्ण देश पहात आहे. बंडाखोरीमागे संबंध नसल्याचं भाजप म्हणत होतं. बहुमत जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातच या बंडामागचे कलाकार देवेंद्र फडणवीसच असल्याचं सांगत अनेक गौप्यस्फोट केले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केलं आहे. भाजपने शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर बसवल्यानंतर शिवसेना पक्षातच दुही माजवण्यासाठी शिंदे गटाकडून अनेक उपद्वाप सुरू झाले आहेत. शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करण्यात येत आहे. आमदारांनंतर खासदार, पदाधिकारी फोडण्यात आले. आमचीच खरी शिवसेना असा नारा बंडखोरांकडून वारंवार केला जात आहे. शिवसेना नक्की कुणाची हा वाद आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. एकीकडे, फडवणीसांनी महाविकास आघाडी सरकार पाडल्याची कबुली दिली.

तर दुसरीकडे त्याच बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचं सरकार आलं, पण मुख्यमंत्री मात्र भाजपचा होऊ शकला नाही, याचं शल्य बोलून दाखवलं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला. त्याचं दुःख झालं. आम्ही सर्वांनी मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं आहे, अशा शब्दात आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली आहे. फडणवीस यांनीही हा निर्णय मान्य केला. त्यामुळे काही जण रडले. फडणवीस रडल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. खरंतर चंद्रकांतदादांना फडणवीस रडल्याचंही यातून जाहीर करायचं होतं. आपल्याला दुःख झालं. पण, आपण दुःख पचवून पुढे गेलो, असंही पाटील यांनी सांगत भाजपचं शल्य बोलून दाखवलं.

उपमुख्यमंत्रीपदाचंही ठरल्याचं भाजपकडून आता सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याच्या प्रारंभी राज्यपालांसोबत फक्त एकच खुर्ची लावण्यात आली होती. त्यामुळे फक्त शिंदेंच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असंच सांगण्यात येत होते. पण, आयत्यावेळी प्रत्यक्षात शपथविधी सुरू होण्यापूर्वी काही मिनिटं आधी दुसरी खुर्ची लावण्यात आली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने भाजपच्या गोटात शांतता पसरली होती. नवं सरकार आलं खरं, पण मुख्यमंत्रीपद न मिळाल्याचं शल्य राज्यातील भाजप नेत्यांना आहे. पण, शिवसेनामुक्त महाराष्ट्र अजेंडा राबवण्याचा निर्णय घेतलेल्या केंद्रीय नेतृत्वामुळे हे दुःख मनावर दगड ठेऊन पचवावं लागलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -