घरसंपादकीयअग्रलेखसोमय्यांनी केले भाजपचे वस्त्रहरण!

सोमय्यांनी केले भाजपचे वस्त्रहरण!

Subscribe

महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकण्यासोबतच राज्यात सरकार स्थापन करणे आणि लोकसभेत महाराष्ट्रातून अधिकाधिक खासदार निवडून देण्यासाठी भाजपने केलेली रणनीती अखेर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या मुखातून बाहेर पडली आहे. एका खासगी मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत किरीट सोमय्या यांनी अनेक धक्कादायक खुलासे करत भाजपच्या ऑपरेशन लोटसची माहिती उघड केली.

सत्तेसाठी पक्ष कोणत्या थरावर जाऊ शकतो, कोणकोणते कॉम्प्रोमाईज केले जातात, यासह अनेक डावपेच सोमय्या यांच्या मुलाखतीतून उजेडात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत किरीट सोमय्या यांची ही स्फोटक मुलाखत दुर्लक्षित असली तरी भाजपच्या रणनीतीमागील नग्न सत्य सोमय्यांनी उघड केले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकण्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे घोटाळे उजेडात आणण्याचे काम केले. त्यानंतरचे काम केंद्रीय तपास यंत्रणांनी पार पाडले.

- Advertisement -

सोमय्या यांनी उघड केलेल्या घोटाळ्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमधील महाराष्ट्रातील कित्येक वजनदार नेते अडकले. काहींना तुरुंगातही जावे लागले. पुढे यातील बर्‍याच नेत्यांनी लोटांगण घातले. परिणामी महाविकास आघाडीची सत्ता जाऊन भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेवर आले. काही काळानंतर घोटाळ्यांचा आरोप झालेल्यांना घेऊन अजित पवार सत्तेत सामील झाले. किरीट सोमय्या यांनी ज्यांचे-ज्यांचे घोटाळे उजेडात आणले, ते भाजपसोबत गेले. सत्तेत सहभागी झाले. मंत्री झाले. ज्या पक्षाने मोठे केले, तोच पक्ष फोडण्याचे, ताब्यात घेण्याचे काम केले गेले.

भाजपच्या रणनीतीमुळे महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कमकुमत झाली. राजकीय उलथापालथीने सर्वसामान्य नागरिक चक्रावून गेले होते. फुटीर नेते जनतेच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागल्याचे सांगत आहेत. ज्या मतदारांनी निवडून दिले, त्यांचीच फसवणूक केल्याची भावना राजकीय नेत्यांमध्ये दिसून येत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल. खरे तर २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासूनच भाजपने ऑपरेशन लोटस हाती घेतले होते. त्यात किरीट सोमय्या यांची भूमिका निर्णायक ठरली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे घोटाळे किरीट सोमय्या बाहेर काढत होते. त्यावेळी सोमय्या हेच मीडियाच्याही केंद्रस्थानी असायचे.

- Advertisement -

त्याच सोमय्यांनी अखेर यामागील नग्न सत्य उघड केले आहे. त्यात पुन्हा भाजपसाठी इतके केले, पण हाती काही नाही आले, अशी सोमय्या यांची सध्या अवस्था झालेली असावी. भाजपने त्यांना कुठले पद दिले नाही किंवा लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले नाही, त्या वैफल्यातूनही त्यांनी भाजपचे पितळ उघडे केले असावे. हसन मुश्रीफ असो की मातोश्रीचा भ्रष्टाचार काढायचा असो, पक्षाने मला जेजे करायला सांगितले तेते मी केले, अशी स्पष्ट कबुलीच सोमय्या यांनी दिली. कुणाचाही भ्रष्टाचार काढायच्या अगोदर पहिल्यांदा आम्ही राजकीय चर्चा करतो. त्यात मला गो अहेड सांगितले गेले की मी थांबत नाही.

२०१९ साली ठाकरेंशिवाय सरकार बनवूया असा सल्ला आपण दिला होता, पण देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठांचा आदेश असल्याचे सांगितल्याने तसे घडले नाही, असेही सोमय्या यांचे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच ठाकरेंवर थेट हल्लाबोल करायचा सांगितले होते. ज्यांच्यावर आरोप केले, घोटाळे उजेडात आणले, त्या प्रकरणांचे पुढे काय झाले, असे प्रश्न उपस्थित करून सोमय्या यांनी उघडकीस आणलेल्या घोटाळेबाज नेत्यांची नावे वाचून दाखवण्यात आली. या प्रकरणांचे पुढे काय झाले. तुमच्याकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आरोप करून घ्यायचे आणि त्या नेत्यांना थेट भाजपमध्ये प्रवेश द्यायचा, असे पक्षाने तुमच्यासोबत डिल केले होते का, या थेट प्रश्नाने सोमय्या यांची थोडी अडचण झाली होती.

त्यातच घोटाळेबाजांना पक्षात घेतले जात आहे, त्यांना क्लीन चिट मिळत आहे, यावर कोर्टात का गेला नाहीत, या प्रश्नाने सोमय्या नक्कीच अडचणीत सापडले. फारच गंभीर प्रश्न विचारला आहे, अशी कबुली देणारे सोमय्या काही वेळ बुचकळ्यात सापडलेले दिसले. या प्रश्नावर सोमय्या काहीच उत्तर देऊ शकले नाहीत. परिणामी पुढच्या प्रश्नाने सोमय्या यांना सत्य सांगावेच लागले. सोमय्या यांनी सांगितलेले सत्य, उघड केलेली गुपिते याची चर्चा महाराष्ट्रात आधीपासूनच होती. त्यावर भाजपचे मौन असायचे. किरीट सोमय्या यांनी नेमक्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच गुपित उघड केले आहे. सत्तेसाठी कॉम्प्रोमाईज केले.

हे बरोबर नाही, आवडत नाही, बरे वाटत नाही, पण शेवटी हेच करावे लागले. त्याबद्दल आम्हाला आनंद झालेला नाही. भाजपचा शिस्तबद्ध कार्यकर्ता असल्याने पक्षाने सांगितले म्हणून करावे लागले, असे सोमय्या यांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने अशापद्धतीने फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशात विविध राज्यातही कॉम्प्रोमाईज केलेले आहे. हरियाणात लोकसभेच्या दहा जागा असून त्यातील सहा जागांवर भाजपने आयात केलेले उमेदवार उभे केले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी काय काय केले, कुणा कुणाचे आदेश पाळले या सर्व गोष्टी सांगून किरीट सोमय्या यांनी पार्टी वुईथ डिफरन्स म्हणजेच सोवळेपणाचा दावा करणार्‍या भाजपचे वस्त्रहरण केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -