घरसंपादकीयअग्रलेखराजकीय व्यभिचार चिंताजनक

राजकीय व्यभिचार चिंताजनक

Subscribe

‘मतदारांनो माझे तुम्हाला आवाहन आहे की, राजकीय व्यभिचाराला कृपा करून राजमान्यता देऊ नका, अन्यथा राजकारणात चुकीचा पायंडा पडेल,’ मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात हात जोडून मतदारांना केलेले हे आवाहन विचार करायला भाग पाडणारे आहे, पण त्यांचा रोख ज्या राजकीय व्यभिचाराकडे होता त्याच व्यभिचारी लोकांना पाठिंबा देऊन त्यांनी व्यभिचाराच्या डोहात जणू उडीच घेतली. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे करून आपली पोळी भाजणार्‍या राजकीय पक्षाकडे विशेषत: भारतीय जनता पक्षाकडे त्यांचा रोख होता.

या गोष्टी राजकारणात सतत होत राहिल्या तर पुढे त्या सवयीच्या होतील. रोजच्या व्यवहारातील त्या एक भाग बनून जातील. त्यातून मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास उडून जाईल. त्याचा परिणाम मतदानाची संख्या घटण्यातही होऊ शकतो. नीतिमत्ता पाळून राजकारण करावे, असा चांगला संदेश राज ठाकरे यांनी यानिमित्ताने दिला खरा, परंतु पक्ष फोडणार्‍या व्यभिचार्‍यांना त्यांनी साथ का दिली, याचे उत्तर मात्र अनुत्तरित राहिले. त्यांच्या अनुयायांनाही याचे उत्तर मिळेनासे झाले आहे. जेथे विचारधारा जुळते तेथे विविध पक्ष एकत्र येत असतात. असे असताना व्यभिचारी वर्तन करणार्‍या पक्षाशी जुळवून घेताना राज यांना काहीच वाटू नये याचे नवल वाटते.

- Advertisement -

अर्थात राज यांनाच नव्हे तर बहुतांश पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना राजकीय व्यभिचार करण्यात काहीही गैर वाटत नाही. पक्ष फोडणे हा असल्या व्यभिचाराचा एक भाग आहेच, शिवाय निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने प्रतिस्पर्ध्यांच्या कंबरेखाली वार करण्याचा जो व्यभिचार सध्या रोज ऐकू येत आहे तोदेखील राजकीय संस्कृतीचे अध:पतन करणारा आहे. म्हणायला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री पण त्यांच्या मुखातून निघालेल्या विधानामुळे राजकीय संस्कृतीही लाजली असेल.

चंद्रपूर मतदारसंघातील निवडणूक त्यांच्यासाठी एकतर्फी असेल असा त्यांचा कयास होता. या जागेवर काँग्रेसच्या उमेदवार आणि गेल्या वेळी पक्षाला महाराष्ट्रातील ही एकमेव जागा जिंकून देणारे दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा यांच्याशी मुनगंटीवार यांचा सामना होत आहे. दिवंगत खासदारांच्या पत्नी म्हणून प्रतिभा धानोरकर यांच्याप्रति मतदारांमध्ये मोठी सहानुभूती आहे. त्यातच शेतकरीवर्ग भाजपच्या धोरणांवर नाराज असल्याने त्याचाही फटका बसण्याची भीती मुनगंटीवार यांना आहे. या भीतीपोटीच आता ते काहीबाही बरळू लागले आहेत.

- Advertisement -

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभर विशेषत: राजधानी दिल्लीत उसळलेल्या शीख दंगलीचा मुद्दा मुनगंटीवारांनी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरला झालेल्या सभेत उचलला. त्या दंगलीतील हिंसाचाराचे वर्णन करताना त्यांची जीभ घसरली आणि बहीण-भावाच्या पवित्र नात्याबद्दल इतके घाणेरडे, बीभत्स वाक्य त्यांनी उच्चारले की असभ्य वगैरे असांस्कृतिक दूषणेही तोकडी पडतील.

ते विधान अजाणतेपणे निघाले असावे, असे म्हणायलाही वाव नाही. कारण मुनगंटीवारांच्या भाजपकडून त्याचे समर्थन केले जात आहे. केवळ ते वाक्य ऐकू नका, संपूर्ण भाषण व त्यातील संदर्भ समजून घ्या, अशा पद्धतीने समर्थन केले जात असल्याने संतापात भर पडत आहे. अशाच प्रकारे कोल्हापूरमधील राजकारणातही राजकीय नैतिकता वेशीला टांगली आहे.

येथे करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आजवरची घराण्याची परंपरा आणि पुरोगामी वसा लक्षात घेत शाहू महाराजांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला, परंतु महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्याकडून मात्र त्यांच्यावर पातळी सोडून टीका सुरू झाली आहे. ‘आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. तेसुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे,’ असा केवीलवाणा प्रचार करण्यात मंडलिक व्यग्र आहेत.

खरेतर मंडलिक यांचे विधान केवळ शाहू महाराजांचा नव्हे तर समस्त छत्रपती घराण्याचा अपमान करणारे आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीराजेंना भाजपने राज्यसभा दिली, त्यावेळी मंडलिकांना दत्तक जाण्याबाबत आक्षेप नव्हता हे विशेष. अर्थात असे वाचाळवीर केवळ महायुतीतच आहेत असेही नाही. त्यांचा वावर सर्वत्र असतो. अभिनेत्री कंगणा रणौतला भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी दिली तेव्हा काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते यांनी केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे समस्त महिलावर्गाची मान खाली गेली.

एका महिलेनेच दुसर्‍या महिलेवर इतक्या खालच्या पातळीवर टीका करणे हे अशोभनीय आहे. एखाद्याने कमरेचे सोडले तर चार लोकांचे लक्ष जरूर वेधले जाते, पण त्यातून काढला जाणारा निष्कर्ष निश्चितच हवासा नसतो. वाचाळवीरांच्या सवंगपणाला त्यांनी गोळा केलेल्या तरुणाईकडून टाळ्या मिळतीलही, पण त्यातून देशाच्या राजकीय व्यवस्थेतील विकृती दूर करण्यासाठी आवश्यक ती शहाणी सजगता निश्चितच निर्माण होणार नाही. खरेतर राजकारण हे समाजकारणाचे एक माध्यम आहे, ही बाबच वाचाळवीर विसरून जातात.

देशात, राज्यात राजकारणात प्रचंड मोठी उलथापालथ होऊन लोकशाही मूल्यांची घसरण होत असताना आपणही त्यात मागे नाही याची पुरेपूर काळजी ही राजकारणी मंडळी घेत असतात. असे वाचाळवीर लोकप्रतिनिधी निवडून दिल्याचा मतदारांना नक्कीच पश्चाताप होतो. यंदाच्या निवडणुकीची सुरुवात राज ठाकरे यांनी राजकीय व्यभिचाराचा उल्लेख करून केली. यापुढील काळात तरी अशा व्यभिचार्‍यांच्या मुसक्या त्यांचाच पक्ष आवळेल इतकी अपेक्षा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -