येर अवष्टंभु जो आघवा । तो आरूढोनि मद्भावा । मजचि आंतु पांडवा । पैठा जाहला ॥
हे पांडवा, जो अभिमान म्हणून आहे, ती सर्व माझी भक्ती पाहून माझ्या स्वरूपातच मिळाला.
ऐसें भजतेनि प्रेमभावें । जयां शरीरही पाठीं न पवे । तेणें भलतया व्हावें । जातीचिया ॥
अशा प्रेमभावाने जे मला भजतात व ज्यांना हे शरीर पुनः प्राप्त होत नाही, ते हव्या त्या जातीचे असले तरी असोत.
आणि आचरण पाहातां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वांटा । परि जीवित वेंचिलें चोहटां । भक्तीचिया कीं ॥
आणि हे महावीरा, त्यांचे आचरण जरी पाप करणार्यात पहिल्या प्रतीचे असले, तरी ज्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट भक्तिमार्गात केला आहे.
अगा अंतींचिया मती । साचपण पुढिले गती । म्हणौनि जीवित जेणें भक्ती । दिधलें शेखीं ॥
अरे अंतकाली जी मनाला बुद्धी होते, तीच गती खरोखर पुढील जन्मी प्राप्त होते, म्हणून आपल्या आयुष्याच्या शेवटाचा काळ जो माझ्या भक्तीत घालवितो.
तो आधीं जरी दुराचारी । तरी सर्वोत्तमुचि अवधारीं । जैसा बुडाला महापुरीं । न मरतु निघाला ॥
तो पूर्वायुष्यात जरी दुराचरण करणारा असला, तरी तो सर्वोत्तमच आहे, असे समज. एखाद्या मनुष्याने महापुरात उडी घातली व सर्व मनुष्यास तो मेला असे वाटले, परंतु तो न मरता निघाला.
तयाचें जीवित ऐलथडिये आलें । म्हणौनि बुडालेपण जेवीं वायां गेलें । तेवीं नुरेचि पाप केलें । शेवटलिये भक्ती ॥
तो जगून अलीकडच्या काठावर आला, त्यामुळे त्याचे बुडणे व्यर्थ गेले, त्याचप्रमाणे पूर्वायुष्यात केलेले पाप उत्तरायुष्यातील ज्ञानोत्तर भक्तीने नाहीसे होते.
यालागीं दुष्कृती जर्ही जाहला । तरी अनुतापतीर्थीं न्हाला । न्हाऊनि मजआंतु आला । सर्वभावें ॥
याकरिता पापाचरण करणारा जरी असला तरी तो पश्चात्तापरूप तीर्थात न्हाऊन जर सर्वभावाने मला शरण आला.
वाणी ज्ञानेश्वरांची
written By My Mahanagar Team
MUMBAI
मागील लेख
पुढील लेख
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -