घरसंपादकीयअग्रलेखपोकळ शक्तिप्रदर्शन!

पोकळ शक्तिप्रदर्शन!

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपच्या सरकारला खाली खेचण्यासाठी नवी दिल्ली येथील रामलीला मैदानात रविवारी इंडिया आघाडीच्या ‘लोकतंत्र बचावो’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी इंडिया आघाडीच्या म्हणवल्या जाणार्‍या नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर नेहमीप्रमाणे सडकून टीका केली. अब की बार चारसो पार, असे मोदी आणि त्यांचे समर्थक म्हणत आहेत, तर अब की बार भाजप तडीपार, अशी घोषणा इंडिया आघाडीतील उद्धव ठाकरे देत आहेत. आपल्याला या देशातील लोकशाही आणि संविधान वाचवायचे आहे, मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर या देशातील लोकशाही आणि संविधान शिल्लक राहणार नाही, त्यामुळे आपल्याला मोदींच्या विरोधात एकजूट होऊन त्यांना पाडायला हवे, अशी जोरदार भूमिका इंडिया आघाडीच्या मेळाव्यांमध्ये मांडण्यात येते.

अर्थात, हे काही नवीन नाही. कारण जेव्हा इंडिया आघाडीचे मेळावे होतात, तेव्हा काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचे अनेक पक्षांचे नेते दाटीवाटीने एका व्यासपीठावर बसलेले दिसतात. त्यातील काही जणांना भाषणासाठी पाच मिनिटांची वेळ दिली जाते. त्यात त्यांना फारसे बोलताही येत नाही. फक्त मोदींना आपल्याला हटवायचे आहे, अशी भूमिका ते मांडतात. मोदी सरकार हे तपास यंत्रणांचा कसा दुरुपयोग करत आहे. त्यांच्या मार्गात अडथळे ठरू शकणार्‍यांना तुरुंगात टाकत आहे. त्यांच्यावर ईडीच्या धाडी टाकून त्यांना नामोहरम करत आहे. जेव्हा ते भाजपमध्ये जातात, तेव्हा त्यांच्यामागील चौकशीचा ससेमिरा थांबविला जात आहे. काँग्रेसचे मुख्य नेते राहुल गांधी हे देशभरात विविध संपर्क यात्रा काढून केंद्रातील मोदी सरकारकडून कसा गैरव्यवहार चालवला जात आहे, हे लोकांना सांगत आहे. मोदी हे केवळ काही ठरावीक उद्योगपतींच्या सोयीसाठी काम करत आहेत, असे सांगत आहे. काँग्रेसच्या न्याय यात्रेचा समारोप त्यांनी शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या मेळाव्यात केला. त्यावेळीदेखील आघाडीतील नेत्यांनी मोदींवर जोरदार टीका केली.

- Advertisement -

इंडिया आघाडीतील नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार खाली खेचण्याबाबत एकमत आहे, पण जेव्हा जागावाटपाचा मुद्दा येतो, तेव्हा मात्र त्याबाबत एकमत होत नाही, त्याबाबत प्रचंड मतभिन्नता दिसून येते. कारण मोदीविरोध करताना प्रत्येकाला इंडिया आघाडीत आपला प्रभाव वाढवायचा आहे. राहुल गांधी यांच्यासोबत अनेक नेते व्यासपीठावर बसत असले तरी त्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी कितीजण मनापासून तयार आहेत, हेही गुलदस्त्यात आहे. कारण काँग्रेससोबत बसणार्‍या नेत्यांना मोदी सरकार पाडायचे तर आहेच, पण त्याच वेळी त्यांना काँग्रेसला मोठे होऊ द्यायचे नाही. त्यांना काँग्रेसच्या पालखीचे भोई व्हायचे नाही. इथेच सगळा घोळ सुरू आहे. खरे तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विविध पक्षांची संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) होती, पण काँग्रेसचे मित्र पक्ष म्हणवल्या जाणार्‍यांना ही युपीए मान्य नव्हती. त्यामुळे इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली.

मोदी सरकार आपल्या विरोधकांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावत आहे, ते नेते भाजपमध्ये गेल्यावर मग त्यांच्यामागील चौकशी थांबते. इतकेच नव्हे तर भाजपमध्ये गेल्यावर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांचे खटले चालवले जात होते, त्यांना क्लीन चिट मिळत आहे. प्रफुल्ल पटेल हे अगदी आताचे उदाहरण आहे. अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन हे दोन आजी माजी मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. अर्थात, त्यांच्या या अटकेमागे त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचे कारण आहे. पण हे सगळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत आहे. त्यामुळे लोकांच्या मनातही शंका निर्माण होत आहे. काँग्रेसमुक्त भारताचा नारा देऊन मोदी केंद्रीय सत्तेत आले, पण लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज असते, त्याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने काँग्रेसची बँक खाती सिल केली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे प्रचार करायलाही पैसे नाहीत, अशी स्थिती आहे. एखाद्या विरोधी पक्षाची इतकी कोंडी करणे लोकशाहीत अपेक्षित नाही. एका बाजूला या कारवायांना कायदेशीर बाजू असल्याचे दाखविले जात आहे, पण विरोधात असलेल्या काँग्रेसची गळचेपी केली जात आहे.

- Advertisement -

मोदी हैं तो मुमकिन हैं, या विश्वासावर भाजप लोकसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. त्याच वेळी मोदींना विरोध करणारी इंडिया आघाडी मोदींची मनमानी लोकांसमोर मांडत आहे. लोकांना ते पटतही असेल, पण मोदींना विरोध करणार्‍या इंडिया आघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांचा आपापला स्वार्थ साधण्याची वृत्ती हीदेखील काही लपून राहिलेली नाही. कारण प्रत्येकजण आपल्या पक्षाला जास्त जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. इंडिया आघाडीचे नेते मोठे मेळावे घेऊन मोदींविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करतात. मोदी आणि शहांवर घणाघाती आरोप करतात, पण या सगळ्या बाहेरून दिसणार्‍या गोष्टी आहेत. कारण त्यांना खरोखर लोकशाही आणि संविधानाची इतकी चिंता असेल तर त्यांनी आपल्याला किती जागा मिळतील, याची तमा न बाळगता मोदींना खाली खेचण्यासाठी एकत्र यायला हवे. जसे इंदिरा गांधींच्या विरोधात अनेक पक्ष एकत्र येऊन त्यांचे सरकार पाडले होते. इंडिया आघाडीचे हे दाखवले जाणारे शक्तिप्रदर्शन आहे, आतून मात्र ते पोकळ आहे. कारण त्यात प्रत्येक पक्षाचा वैयक्तिक स्वार्थ दडलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -