घरसंपादकीयअग्रलेखधोकादायक धुसफूस!

धोकादायक धुसफूस!

Subscribe

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता एक महिनाही शिल्लक उरलेला नाही. अशा अटीतटीच्या वेळी महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटपाचे घोडे अजूनही अडलेले आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या कित्येक महिने आधीपासूनच महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकत्रित निवडणुका लढण्यावर एकमत झाले होते. त्यानुसार मागच्या तीन ते चार महिन्यांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी असंख्य वेळा खलबते झाली.

बैठकांवर बैठका घेतल्या गेल्या, काही बैठका राज्यपातळीवर तर काही बैठका थेट दिल्लीवारी करून पक्षश्रेष्ठींसोबत झाल्या. तरीही राज्यातील 48पैकी 48 जागांचा तिढा सोडवण्यात दोन्ही बाजूकडचे नेते पूर्णपणे अपयशी ठरलेत. युती-आघाडी ठरतेवेळी उमेदवारांच्या याद्या एकत्रितपणे जाहीर करून आपली एकी आणि ताकद दाखवून द्यायची असेही मविआ, महायुतीच्या नेत्यांनी ठरवले होते, परंतु जागावाटपाच्या खेचाखेचीत या घटक पक्षांतील एकीची पुरती बेकी झाल्याने या महत्वाच्या अजेंड्यालाही तडा गेला. आपापल्या उमेदवारांची यादी परस्पर जाहीर करून आपल्याच युती-आघाडीतील मित्रपक्षाला वेठीस धरण्याचा किंबहुना दबावाखाली आणण्याचा जोरकसपणे प्रयत्न दोन्ही बाजूकडे अजूनही सुरू आहे. जे चित्र महाविकास आघाडीत, तेच चित्र महायुतीत आहे. ज्यांची नावे पहिल्या, दुसर्‍या यादीत आली, ते उमेदवार खूश, तर ज्यांची नावे वेटिंग लिस्टवर गेलीत त्या उमदेवारांचे प्राणही कंठाशी आलेत.

- Advertisement -

महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या बोलणीत काँग्रेस-पवार गट-ठाकरे गटात सुरुवातीच्या टप्प्यात 10 ते 15 जागांवरून मतभेद असल्याचे म्हटले जात होते. जसजशी बोलणी पुढे सरकत गेली, तसतसा हा गुंता सुटत गेला. तरी कोल्हापूर, सांगली, हातकणंगले, मध्य मुंबई, भिवंडी अशा काही जागांवर मविआचे घोडे अडले होते. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी आपल्या 17 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करताच मविआतील अंतर्गत धुसफूस उफाळून आली. काँग्रेसच्या नेत्यांनी सांगली आणि मुंबईच्या जागेवर हरकत घेत ठाकरे गटाविरुद्ध नाराजी दर्शवली आणि दिल्लीत जाऊन दाद मागितली. सांगली ही काँग्रेसची परंपरागत जागा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. सध्या या मतदारसंघात भाजपचे संजयकाका पाटील विद्यमान खासदार आहेत. तरी ठाकरे गटाच्या तुलनेत येथे काँग्रेसची संघटना बांधणी मजबूत आहे. त्यामुळेच काँग्रेस या जागेसाठी अडून बसली आहे.

कोल्हापूर हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ होता. येथे संजय मंडलिक हे शिवसेनेच्या शिंदे गटातील विद्यमान खासदार आहेत. काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपतींसाठी हा मतदारसंघ कुठलीही खळखळ न करता सोडल्याने पश्चिम महाराष्ट्रात एक तरी जागा हवीच म्हणून ठाकरे गट ही जागा सोडण्यास तयार नाही. या जागेवर ठाकरे गटाने कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. चंद्रहार पाटलांना ठाकरे गटाकडे पाठवण्यामागे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची छुपी भूमिका असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. काँग्रेसने सांगलीच्या जागेच्या बदल्यात हातकणंगलेची जागा ठाकरे गटासाठी सोडण्याची तयारी दाखवली आहे. येथेही शिंदे गटाच्या शिवसेनेचे धैर्यशील माने विद्यमान खासदार आहेत, परंतु ही जागा शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासाठी सोडण्याचा मविआचा आधी विचार होता. त्यावर ठाकरे गट नेमका काय निर्णय घेतो, हे दिल्लीत 31 मार्चला होणार्‍या बैठकीनंतर कळेल. याचप्रमाणे काँग्रेस मध्य मुंबईची जागाही लढवण्यास इच्छुक होती, परंतु येथे ठाकरे गटाने अनिल देसाई यांचे नाव जाहीर केले.

- Advertisement -

उत्तर पश्चिमच्या जागेवर निवडणूक लढवण्यास इच्छुक काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यावर आरोप करत त्यांचा प्रचार करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. कधी काळी राष्ट्रवादीत असलेले संजय दीना पाटील यांच्या ईशान्य मुंबईच्या उमेदवारीवरून शरद पवार गट ठाकरे गटावर नाराज असल्याचे कळते. भिवंडीच्या जागेवर शरद पवार गट आणि काँग्रेस दोन्ही पक्ष दावा करत आहेत. या सर्व तिढ्यावर दिल्लीतच अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे शिंदे गटानेही आपल्या 8 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेले ठाणे, श्रीकांत शिंदे यांचा कल्याण, हेमंत गोडसेंचा नाशिक, भावना गवळींचा यवतमाळ-वाशिम, गजानन कीर्तिकरांचा उत्तर-पश्चिम मुंबई आणि राजेंद्र गावित यांच्या पालघर मतदारसंघांचा समावेश नाही.

यातील बहुतांश मतदारसंघांवर भाजपने दावा ठोकल्यामुळे या विद्यमान खासदारांना तिकीट मिळेल की नाही, अशी घालमेल सुरू आहे. अभिनेता गोविंदाच्या पक्षप्रवेशामुळे कीर्तिकरांचा पत्ता कट झाल्याचे म्हटले जात आहे. अमरावतीत नवनीत राणांना भाजपने तिकीट दिल्यामुळे स्थानिक आमदार आनंदराव अडसूळांना मोठा धक्का बसला आहे. बारामतीत विजय शिवतारेंचे बंड थंडावले असले, तरी बुलढाण्यात शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी उमेदवारी अर्ज भरत मुख्यमंत्र्यांना नवी डोकेदुखी केली आहे. भाजप आमच्या जागा का हिसकावतेय, लोकसभेला ही परिस्थिती असेल, तर पुढे विधानसभेचे काय? असे म्हणत दोन्ही बाजूंनी युतीधर्म मोडल्याचे आरोप-प्रत्यारोप होऊ लागलेत. युती-आघाडीतील नेत्यांमधील ही वाढती धुसफूस त्या त्या पक्षांसाठी किंवा मित्रपक्षांसाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -