घरसंपादकीयअग्रलेखघड्याळाचे काटे उलटे फिरले!

घड्याळाचे काटे उलटे फिरले!

Subscribe

 

 

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकांना धक्के दिले आणि अनेक धक्के पचवले, पण पवारांना रविवारी जो काही धक्का बसला आहे, तो मात्र खूपच मोठा आहे. पवारांचे वय आणि शारीरिक आरोग्याची स्थिती पाहता आता हा धक्का त्यांना पचवता येणे अवघड आहे. कारण याच गोष्टीचा विचार करून शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला होता, पण राज्यभरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकार्‍यांच्या आत्यंतिक आग्रहामुळे पवारांना तो राजीनामा मागे घ्यावा लागला होता. त्यानंतर काही दिवसांनी पवारांनी पक्षाच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली होती. त्यातून त्यांनी आपला राजकीय वारसदार ठरवला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांचे स्थान काय, अशी चर्चा सुरू झालेली होती. त्यांची अस्वस्थताही दिसून येत होती. त्यातून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या वर्धापन दिनी आपण विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी राहण्यात इच्छुक नाही, आपल्याला संघटनेेत काम करायचे आहे, असे स्पष्ट करून आपल्याला प्रदेशाध्यक्ष होण्यात रुची आहे, असे सूचित केले होते, पण त्याकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी फार गांभीर्याने पाहिलेले नाही.

त्याच काळात अमेरिकेतील जयजयकाराची नवी ऊर्जा घेऊन आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात पाटण्यात एकत्र झालेल्या विरोधकांंवर भ्रष्टाचाराचा बॉम्बगोळा टाकला होता. त्यात त्यांचे विशेष लक्ष्य होते शरद पवार. कारण सध्या तेच सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला, असा आरोप मोदींनी केला होता. पंतप्रधानांनी असे आरोप केल्यामुळे ही बला आपल्यावर येऊ शकते, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात निर्माण झालेली होती. त्यामुळे पुढे जर का आपल्यामागे ईडी लागली तर काय करणार, अशी भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये निर्माण झाली असावी. कारण सध्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मागे इतकेच नव्हे तर प्रशासनातील अधिकार्‍यांच्या मागे ईडी लागलेली आहे.

- Advertisement -

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झालेल्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांचाच फॉर्म्युला वापरला आहे. ते पक्षातून बाहेर पडलेले नाहीत. त्यांनी आम्ही जे सरकारमध्ये सहभागी झालो आहेत, तो खरा राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे यांनीही खरी शिवसेना आमचीच असा दावा केल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि त्यांच्यामध्ये चाललेली न्यायालयीन लढाई अतिशय गुंंतागुतीची होती. ती वर्षभर सतत सुरू होती. अजूनही त्याचा शेवट झालेला नाही. त्यामुळे पुढील काळात शरद पवार हेही काही शांत बसणार नाहीत. कारण त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कारवाईचे संकेत दिले आहेत. कारण त्यांचे जरी वय झाले असले तरी त्यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात जाण्याची दाट शक्यता आहे. कारण आता अजित पवार आणि शरद पवार असे दोन तट उभे राहिल्यामुळे निवडणुका लढवताना पंचाईत होईल. त्यामुळे घड्याळ हे निवडणूक चिन्ह कुणाला जाणार हे निश्चित करावे लागेल.

जे एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे झाले तेच अजित पवारांच्या बंडामुळे होणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांची नाराजी ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पहाटेच्या वेळी राजभवनावर नेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती. त्यानंतर शरद पवारांनी त्यांचे ते बंड मोडून काढले होते. आताही शरद पवारांनी तसाच पवित्रा घेतलेला आहे. अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. पण अजितदादांच्या मागील बंडात आणि आताच्या बंडात फरक आहे. यावेळी त्यांच्यासोबत शरद पवारांचे मानसपुत्र मानले जाणारे प्रफुल्ल पटेल आहेत. ते राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत. तसेच नुकतेच पवारांनी त्यांना कार्याध्यक्ष हे शीर्षस्थ पद दिले होते. छगन भुजबळ हे पवारांचे खास निकटवर्तीय मानले जातात. दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ असे राष्ट्रवादीतील खंदे नेते आणि शरद पवारांचे निकटवर्तीय अजित पवारांसोबत गेले आहेत. त्यामुळेच अजितदादांच्या या बंडाला विशेष महत्व आहे.

जी वेळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आली होती. तीच वेळ शरद पवारांवर आलेली आहे. पुतण्या राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे शिवसेनेत उभी फूट फडली होती. आता तीच वेळ शरद पवारांवर आली आहे. आपला वारसदार हा आपला मुलगा किंवा मुलगीच असायला हवी, याच अट्टाहासातून या दोघांवर ही परिस्थिती आली. अर्थात, त्यामागे कौटुंबिक आणि आर्थिक कारणे असतात. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे हे समीकरण शिवसैनिकांच्या मनात ठसलेले होते. तसेच शरद पवार यांच्यानंतर अजित पवार हे समीकरण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात होते. पण बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी आपल्या रक्ताच्या नात्यासाठी समीकरणे बदलली त्याचे परिणाम त्यांच्या डोळ्यादेखत त्यांना पहावे लागले. आज गुरुपौर्णिमा आहे. शरद पवार आज आपले राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत, पण घड्याळाचे काटे उलटे फिरले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -