घरसंपादकीयदिन विशेषपहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ

पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ

Subscribe

बाळाजी विश्वनाथ देशमुख किंवा पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते. त्यांनी पेशवेपदाचे महत्व वाढविले व ते पुढे त्यांच्या वंशजांकडे गेले. या अर्थाने बाळाजींना पेशवाईचे संस्थापक म्हटले जाते. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1662 रोजी कोकणातील महाल दंडा राजपुरी येथे झाला. श्रीवर्धन येथील देशमुखीचे वतन या घराण्यात चालू होते. हा मुलूख जंजिर्‍याच्या सिद्दीच्या अंमलाखाली होता. त्याच्या जुलमास कंटाळून बाळाजी व त्यांच्या समवेत नाना फडणीसांचे पूर्वज भानु १६९० च्या सुमारास सातार्‍याकडे आले. पुढे धनाजी जाधव यांच्याकडे बाळाजी नोकरीस राहिले. स्वकर्तृत्वाने धनाजीकडे पुणे, दौलताबाद या प्रदेशांवर सुभेदार, सर सुभेदार इत्यादी पदावर त्यांनी काम केले.

१६९०-१७०७ दरम्यान मराठी कारभार आणि राजकारण यांचा अनुभव घेतलेल्या बाळाजीपंताला शाहू महाराजांनी राज्याभिषेकसमयी सेनाकर्ते ही पदवी बहाल केली. त्याच वेळी काही मोगल अधिकार्‍यांनी शाहूंना विरोध केला. अशा प्रकारे शाहूंना शत्रूने वेढले होते. बाळाजींनी कर्जे काढून फौजा उभारल्या आणि कृष्णराव खटावकर, दमाजी थोरात, उदाजी चव्हाण यांसारख्या पुंडांचा आणि छत्रपतींच्या इतर शत्रूंचा उपशम केला. सेनाकर्ते ही पदवी त्यांनी सार्थ केली. कान्होजी आंग्रे हे त्या वेळी ताराबाईला मिळाले आणि लोहगड घेऊन पुण्यावर त्यांनी स्वारी केली. शाहूंनी त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता पेशवा बहिरोपंत पिंगळे यास पाठविले; पण पेशव्याचा पराभव होऊन तोच कान्होजींच्या कैदेत पडला. अशा बिकट परिस्थितीत बाळाजींनी मुत्सद्देगिरीने कान्होजीस शाहूंच्या पक्षात ओढले आणि त्यास सरखेलपद बहाल करविले. शाहूंनी बाळाजींना पेशवेपद दिले. (१७१३). अशा या महापराक्रमी पेशव्यांचे 12 एप्रिल 1720 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -