घरसंपादकीयदिन विशेषसमाजसुधारक संत गाडगे बाबा

समाजसुधारक संत गाडगे बाबा

Subscribe

संत गाडगे बाबा यांचा आज जन्मदिन. गाडगे बाबा हे कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावतीमधील शेंडगाव येथे झाला. त्यांचे वडील झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे दारूच्या व्यसनामुळे निधन झाले. मूर्तिजापूरमधील दापुरे येथे मामाकडे त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती.

लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या, पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरिती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले.

- Advertisement -

लहानपणापासूनच त्यांना भजन-कीर्तनांची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले, तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती. महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगावी कीर्तने करून लोकजागृती केली.

त्यांचा नैतिक उपदेश साधा व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरावा असाच होता. ‘चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत. स्वच्छता, प्रामाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. जातिभेद नष्ट करून एकजिनसी समाज निर्माण व्हावा, असे त्यांना मनापासून वाटे. अशा या थोर समाजसुधारकाचे २० डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -