घरसंपादकीयअग्रलेखदोन दिग्गजांची एक्झिट!

दोन दिग्गजांची एक्झिट!

Subscribe

गेल्या दोन दिवसांत दोन दिग्गजांनी या जगातून कायमची एक्झिट घेतली. एक सुप्रसिद्ध निवेदक अमिन सयानी आणि दुसरी विभुती म्हणजे अनेक ऐतिहासिक खटल्यांत वकिली केलेले ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ फली सॅम नरिमन! यापैकी सयानी यांचे नाव जुन्या पिढीतील आणि अगदी अलीकडच्या संगीतप्रेेमींना परिचयाचे आहे. ५० ते ७० च्या दशकात रेडिओ सिलोनवरून अमीन सयानी यांनी श्रोत्यांना अक्षरशः भुरळ घातली होती. ‘बिनाका गीतमाला’ हा त्यांचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी पर्वणी होता. १९८६ मध्ये या कार्यक्रमाचे नाव ‘सिबाका गीतमाला’ असे झाले, तर १९८९ मध्ये तो विविध भारतीवरूनही ऐकवला जाऊ लागला.

आपल्याकडे दूरदर्शनचा बोलबाला झाला नव्हता तेव्हा रेडिओ हेच एकमेव करमणुकीचे साधन होते. संगीत, नाट्य, सिनेमा याबाबतचे कार्यक्रम रेडिओवरून प्रसारित होत असत. त्यामुळे रेडिओची प्रचंड क्रेझ होती. याच रेडिओवरून दर बुधवारी रात्री ८ वाजता ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रम व्हायचा. तंत्रज्ञानातील त्रुटींमुळे रेडिओचा बँड बदलल्यानंतर तो कार्यक्रम शक्यतो घराबाहेर जाऊन ऐकावा लागत असे. तेथे मोकळ्या हवेत ध्वनीलहरी रेडिओने पकडल्यानंतर कार्यक्रम ऐकता येई. हा कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी पर्वणी असे.

- Advertisement -

तो काळ लता मंगेशकर, आशा भोसले, मुकेश, तलत महमूद, किशोरकुमार, महम्मद रफी, मन्ना डे, महेंद्र कपूर अशा दिग्गज गायक-गायिकांचा होता. त्यांनी सिनेमासाठी गायलेल्या गाण्यांचा क्रम ठरवून अमीन सयानी तो कार्यक्रम सादर करीत त्याला तोड नसे. अनेकदा ‘बिनाका गीतमाला’ च्या वेळेत रस्तेही ओस पडत असत. आज ‘भाई और बहिनो’ हे शब्द टवाळीचे झालेत, तर त्यावेळी अमीन सयानींचे ‘मेरे प्यारे बहनो और भाईओ’ हे शब्द ऐकण्यासाठी करोडो कान आतुर असायचे.

गाण्यांचा क्रम ठरविताना अनेकवेळा ऐकणार्‍यांच्याही पैजा लागत इतके त्या कार्यक्रमाने श्रोत्यांच्या मनावर गारूड केले होते. ‘पायदान पर’ जसे की ‘अब छटे पायदानपर है&’ अशासारखे वाक्य ऐकताना उत्सुकता ताणली गेलेली असायची. अमीनजींचा आवाज ऐकणे म्हणजे एक पर्वणी होती. ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम कधी संपूच नये असे वाटायचे. आजही मोबाईलच्या माध्यमातून अमीन सयानींचा तो कार्यक्रम ऐकायला मिळाला की त्यांचे चाहते काही क्षण भान हरपून जातात, ही वस्तुस्थिती आहे.

- Advertisement -

अमीन सयानींचा जन्म मुंबईत एका गुजराती कुटुंबात झाला. रेडिओ निवेदनाची त्यांना आवड निर्माण झाली ती चुलत्यामुळे! एका इंग्रजी कार्यक्रमात त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी निवेदन करण्याचे काम केले. कोणत्याही दिग्गज कलाकाराच्या कारकिर्दीची सुरुवात सहजसुलभ झालेली नसते. अमीन सयानींच्या बाबतीतही तसे झाले. ग्वाल्हेर येथे अल्पकाळ स्थलांतरानंतर ते मुंबईत परतले आणि आकाशवाणीकडे निवेदक पदासाठी चाचणी दिली. परंतु पुढे ‘रेडिओचा आवाज’ असे बिरूदावली मिळालेले अमीन सयानी त्या चाचणीत चक्क नापास झाले होते.

परंतु हाडाचा कलाकार जिद्द सोडत नसतो त्याप्रमाणे त्यांनी हार न मानता प्रसारण सेवेतील बारकावे महाविद्यालयातील प्रशिक्षणात समजावून घेतले. याचा योग्य तो परिणाम झाल्याने अमीन सयानींना वेगवेगळ्या कार्यक्रमात निवेदन करण्याची संधी मिळाली आणि नंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम त्यांच्या कारकिर्दीच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक जाहीर कार्यक्रमांतून निवेदकाची भूमिका पार पाडली. त्यातही बोलण्यातील लकब कुठे बदलली नसल्याने संपूर्ण कार्यक्रमावर ‘अमीन सयानी’ नावाची जादू राहत होती. ‘बिनाका गीतमाला’ हा त्यांचा कार्यक्रम पहिल्यांदा ३ डिसेंबर १९५२ रोजी प्रसारित झाला. या पहिल्याच कार्यक्रमाने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले, नव्हे तर त्यावेळी आलेली हजारो पत्रं त्याची साक्ष होती.

रेडिओचा सुवर्णकाळ सुरू असताना अमीन सयानी त्याचे हिरो होते. ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानंतर पंतप्रधानांपासून अनेक कलावंतांनी आपल्या संवेदना प्रकट केल्या. यातील अभिनेते अनुपम खेर यांची प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. ते म्हणतात, अमीनजींच्या जाण्याने बालपणी संगीताशी जोडलेला एक धागा तुटला आहे. गेल्या काही वर्षांत अमीन सयानींच्या शैलीत निवेदन करण्याचा प्रयत्न अनेकांकडून केला गेला, परंतु अमीन सयानी ते शेवटी अमीन सयानीच होते.

सयानींचे निधन होऊन काही तास उलटत नाही तोच ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ तथा विधीज्ञ फली सॅम नरिमन यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक महत्त्वपूर्ण खटले ते लढले. भारतीय न्यायव्यवस्थेतील नरिमन यांचे योगदान दुर्लक्षून चालणार नाही. केशवानंद भारती खटल्यात त्यांनी तडफेने दिलेले योगदान विसरता येणार नाही. स्पष्टवक्ता अशी त्यांची ख्याती होती. जे तर्कसंगत वाटले नाही तेथे कायम विरोधाची भूमिका घेतली.

म्हणूनच आणीबाणी लागू होताच अतिरिक्त महान्याय अभिकर्ता हे पद त्यांनी क्षणात सोडले. सडेतोड स्वभावामुळे महाधिवक्ता पद त्यांच्यापासून दूर राहिले. १९८४ च्या भोपाळ दुर्घटनेनंतर युनियन कार्बाईडची आपण न्यायालयात मांडलेली बाजू ही आपली चूकच होती असे सांगण्याचे धाडस आणि प्रामाणिकपणा नरिमन यांनी दाखवला होता. नरिमन यांची एक्झिट चटका लावणारी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -