घरसंपादकीयदिन विशेषप्रतिभावान नाट्य अभिनेते दीनानाथ मंगेशकर

प्रतिभावान नाट्य अभिनेते दीनानाथ मंगेशकर

Subscribe

दीनानाथ गणेश मंगेशकर हे मराठी गायक, नाट्य अभिनेते, संगीतकार होते. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०० रोजी गोव्यातील मंगेशी येथे झाला. तेथील निसर्गसम्य परिसरात दीनानाथांचे बालपण गेले. त्यांना उपजतच उंच, खणखणीत, सुरेल व भिंगरीसारखा फिरत असलेला असामान्य आवाज व अस्खलित वाणी लाभली होती. बालपणीच त्यांचा नावलौकिक ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’ सारख्या श्रेष्ठ नाट्यसंस्थेच्या चालकांच्या कानावर गेला आणि केवळ चौदा वर्षांच्या दीनानाथांना बालगंधर्वांसारख्या अलौकिक गायकनटाची जागा भरून काढण्यासाठी पाचारण करण्यात आले.

किर्लोस्कर मंडळीच्या ‘ताजे वफा’, ‘काँटोंमें फूल’ इत्यादी हिंदी-उर्दू नाटकांतील दीनानाथांच्या संगीत भूमिका विलक्षण लोकप्रिय ठरल्या. आपल्या विशाल, पाणीदार नेत्रांच्या, देखण्या व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने व निर्भर अशा मुक्त गायनाने त्यांनी रंगभूमी गाजवून सोडली.

- Advertisement -

दीनानाथ हे ‘बलवंत संगीत मंडळी’ चे (स्थापना १९१८) प्रमुख मालक-भागीदार होते. या नाटक मंडळीने मनोरंजनाबरोबरच बोध, देशभक्ती, समाजसुधारणा यांचे दर्शन घडवणारी अग्रगण्य नाटककारांची नवनवीन नाटके रंगूभूमीवर आणली. दीनानाथांच्या सुरुवातीच्या ‘किंकिणी’ आणि पुढे ‘कालिंदी’ (पुण्यप्रभाव), ‘लतिका’ (भावबंधन), ‘पद्मावती’ (उग्रमंगल), ‘तेजस्विनी’ (रणदुंदुभी),‘सुलोचना’ (संन्यस्त खड्ग), ‘गोतम’ (ब्रह्मकुमारी), ‘शिवांगी’ (राजसंन्यास) इत्यादी स्त्री-पुरूष भूमिका व त्यांची वेगळ्या शैलाची तडफदार गाणी नाट्यरसिकांना वेड लावून गेली.

दीनानाथांच्या गाण्यांतून व अभिनयातून वीर, शृंगार, शांत हे रस प्रामुख्याने प्रत्ययास येत. कुणाचेही अनुकरण न करता, स्वत:चे स्वतंत्र आणि चमत्कृतीपूर्ण, पण अत्यंत भावमधुर व काळजाला भिडणारे गाणे गाऊन गेले, यातच दीनानाथांचे महत्त्व व मोठेपण सामावले आहे. अशा या प्रतिभावान नाट्यअभिनेत्याचे २४ एप्रिल १९४२ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -