घरसंपादकीयओपेड‘समृद्धी’ नव्हे, हा तर गैरसोयींचा महामार्ग!

‘समृद्धी’ नव्हे, हा तर गैरसोयींचा महामार्ग!

Subscribe

देशाच्या आर्थिक तसेच महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर म्हणून ओळख असणार्‍या मुंबई आणि राज्याच्या उपराजधानीचे शहर असणारे नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांमधील अंतर निम्म्या वेळेत कापता यावे या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू होऊन वर्षभराहून अधिक काळ लोटला, परंतु समृद्धी महामार्ग विकासात्मकदृष्ठ्या कमी आणि अपघातांच्या घटनांमुळे सर्वाधिक चर्चेत राहिला. कटू असले तरी हे वास्तव असून याकडे कदापि दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा ठरणारा हा महामार्ग असेल, असा दावा अनेकांकडून या महामार्गाच्या लोकार्पणाच्या वेळी करण्यात येत होता, पण तेथील गैरसोयी पाहता हा दावा किती फोल ठरला आहे हे सध्या दिसून येत आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे करण्यात आले. एकूण ५२० किमीचा हा मार्ग ५ ते ६ तासांत वेगाने पार करता येण्यासारखा असला तरी येथे सोयीसुविधांच्या अभावापायी अनेकांची मोठी गैरसोय होते. यामुळेच अपघातांना निमंत्रण मिळत असल्याची वाहनचालकांची तक्रार आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांची आकडेवारी ही महाभयंकर आहे. ११ डिसेंबर २०२२ पासून ते आतापर्यंत म्हणजेच जवळपास ४१६ दिवसांमध्ये समृद्धी महामार्गावर १ हजारांपेक्षाही अधिक अपघात झाले आहेत.

यामधील गंभीर अपघातांमध्ये आतापर्यंत ३६८ जणांनी आपला जीव गमावला आहे. जखमींची संख्याही जवळपास ५००च्या घरात आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांची आकडेवारी पाहिल्यास वाहनचालकांच्या म्हणण्यात खरेच तथ्य आहे, असेच म्हणावे लागेल. ताशी १२० किमीच्या वेगाने प्रवास करता येण्यासारखा महामार्ग असूनही केवळ निवडक सोयीसुविधा ज्या इतर महामार्गांवर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, तशाच समृद्धी महामार्गावर उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे.

- Advertisement -

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांनी मांडलेल्या कैफियतींनुसार येथे प्रमुख समस्या आहे ती म्हणजे या महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उपहारगृहे आणि विश्रांतीगृहे उपलब्ध नाहीत. रस्ते मोठे आणि गुळगुळीत असले तरी या ठिकाणी ढाबे, हॉटेल्स, रेस्तराँ, लॉजेस, फूड ज्वाईंट्स आदींची संख्या फारच कमी आहे. परिणामी ५२० किमीचे अंतर पार करताना अनेकांच्या खाण्या-पिण्याची मोठी गैरसोय होते.

सर्वसाधारणपणे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या खाण्या-पिण्याची आणि आराम करण्याची योग्य सोय व्हावी यासाठीच महामार्गांलगत उपहारगृहे, ढाबे, हॉटेल्स, लॉजेस, फूड ज्वाईंट्स आदी उभारण्यासाठी परवानगी दिली जाते, जेणेकरून महामार्गांवरून प्रवास करताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये. महामार्गालगत असणार्‍या या हॉटेल्स, लॉजेस आदी ठिकाणीच प्रसाधनगृहेदेखील गरज पडल्यास उपलब्ध असतात. याचाही लाभ प्रवाशांना या ठिकाणी घेता येतो, परंतु समृद्धी महामार्गावर अद्यापपर्यंत या सुविधा म्हणाव्या त्या प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे येथे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचा अनुभव आतापर्यंत अनेकांचा आहे.

- Advertisement -

रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल्स, ढाबे, लॉजेस आदी आवश्यक प्रमाणात उपलब्ध तर नाहीच, शिवाय प्रसाधनगृहांचीही योग्य प्रमाणात सोय नसल्यामुळे येथून प्रवास करताना नैसर्गिक विधी उरकण्यासाठी नेमके करावे तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडल्याशिवाय राहत नाही. प्रसाधनगृहे पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे स्त्रियांची तर या ठिकाणी फारच कुचंबणा होते. दूर-दूरपर्यंत प्रसाधनगृहांची सोयच नसल्याने महामार्गाशेजारी अनेकांना उघड्यावरच नैसर्गिक विधी उरकावे लागतात. लघुशंका करण्यासाठीही अनेकांना या ठिकाणी तारेवरची कसरत करावी लागते.

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून अनेक अपघात हे भटके आणि काही रानटी जनावरांच्या रस्त्यावर येण्याने होत असल्याचे निदर्शनास येताच या ठिकाणी उपाययोजना म्हणून महामार्गाच्या दुतर्फा लोखंडी बांध घालण्यात आले. हे केले ते चांगलेच केले. यामुळे महामार्गावर जनावरे येण्याचे प्रमाण कमी झाले आणि यामुळे होणार्‍या अपघातांमध्ये काही प्रमाणात घट झाली, मात्र असे असले तरी महामार्गाशेजारी असणार्‍या या लोखंडी बांधामुळे रस्त्याशेजारी असणार्‍या मोकळ्या जागेवर जाऊनही लघुशंका करणे अनेकांसाठी अशक्य होऊ लागले. काही पुरुष मंडळींना हे लोखंडी बांध पार करणे शक्य होते.

ते महामार्गाशेजारी असणार्‍या मोकळ्या जागेवर जाऊन नाईलाजास्तव आपले नैसर्गिक विधी उरकतात, परंतु स्त्रियांसाठी हे शक्य होत नाही. शेकडो किलोमीटरपर्यंत याच अडचणीचा कायम सामना करावा लागतो. अनेकदा तर स्त्रियांना महामार्गाशेजारी उभ्या असणार्‍या एखाद्या मोठ्या वाहनाच्या आडोशाने नैसर्गिक विधी घाईघाईने उरकावे लागतात. करणार तरी काय? इतर काही सुविधाच उपलब्ध नसल्याने अशी वेळ ओढवत असल्याची कैफियत अनेक स्त्रियांकडून मांडली जाते.

हजारो कोटींचा खर्च करून महामार्ग उभारला जातो, परंतु प्रवाशांसाठी आवश्यक असणार्‍या हॉटेल्स, लॉजेस, प्रसाधनगृहे आदींची सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. परिणामी अनेकांना नैसर्गिक विधी रस्त्यावर उरकण्याची वेळ येते. रस्त्यासाठी हजारो कोटी खर्च करायचे आणि त्यावर घाण करायची असा काहीसा प्रकार येथे सुरू आहे. त्यामुळे खरंच आपण समृद्धीकडे वाटचाल करीत आहोत का, याचा विचार खरेतर प्रकर्षाने आणि प्राधान्याने करायला हवा, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

केवळ हॉटेल्स, लॉजेस आणि प्रसाधनगृहेच नाही तर या ठिकाणी पेट्रोलपंप, गॅरेजेस, पंक्चर स्टेशन्स, टायर स्टोअर्स आदींची संख्याही फारच कमी प्रमाणात असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. या महामार्गावर नागपूरहून शिर्डीच्या दिशेने ७ ठिकाणी, तर शिर्डीहून नागपूरच्या दिशेने ६ ठिकाणी अशा फक्त १३ ठिकाणी इंधन भरण्यासाठी डिझेल आणि पेट्रोलपंपांची सोय करण्यात आली आहे. अनेकदा तर प्रवासादरम्यान १०० किमीचे अंतर ओलांडले तरी पेट्रोलपंप दृष्टीस पडत नसल्याची तक्रार वाहनचालक करीत आहेत. समृद्धी महामार्गावर विश्रामासाठी थांबता येत नाही.

वाहनांचा वेगच इतका असतो की कधी कुठले एखादे भरधाव वाहन आपल्या दिशेने येईल आणि अपघात घडेल सांगता येत नाही. हीच धडकी सर्वांच्या मनात असते. त्यामुळे या महामार्गावर थांबण्याचा धोका कुणीही पत्करत नाही. महामार्गावर असणार्‍या या पेट्रोलपंपांवरच काही काळ थांबून विश्रांती घेता येते. तेथेच प्रसाधनगृह उपलब्ध असल्यास प्रवाशांची काहीशी सोय होते. पेट्रोलपंपावरच किंवा शेजारी आजूबाजूला एखाद दुसरे हॉटेल्स दिसतात, परंतु तेथेही जेमतेमच पदार्थ आणि पेये उपलब्ध असतात.

इतर महामार्गांवरून प्रवास करताना तेथे असणार्‍या उपहारगृहांतील विविध पदार्थांद्वारे जसे प्रवाशांच्या जिभेचे चोचले पुरविण्याची सोय उपलब्ध असते तशी सुविधा काही येथे नाही. मोजक्या प्रमाणातच काही पदार्थ उपलब्ध असतात. प्रवाशांची गर्दी वाढल्यास तेही उपलब्ध होत नाहीत. पुन्हा ते पदार्थ तयार होईपर्यंत ताटकळतच राहावे लागते. पेट्रोलपंपाशेजारीच एखादे छोटे-मोठे गॅरेज, टायर स्टेशन किंवा एअर स्टोअर्स उपलब्ध असले तर असले. हमखास असेलच याचीही शाश्वती नाही. गॅरेज उपलब्ध असल्यास मॅकेनिक्सची संख्या कमी असते. त्यामुळे वाहन दुरुस्तीसाठीही मोठी प्रतीक्षा करावी लागते.

समृद्धी महामार्गाचा बराचसा भाग हा सिमेंट काँक्रिटचा आहे. या ठिकाणी टायर फुटीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. टायर फुटूनच अपघात घडल्याची संख्या आतापर्यंत या महामार्गावर मोठी आहे. त्यामुळे येथे गॅरेज, एअर स्टेशन्स, टायर स्टोअर्स आदींची सुविधाही अधिक संख्येने उपलब्ध असायला हवी, अशी वाहनचालकांची मागणी आहे. या सुविधा आवश्यक प्रमाणात उपलब्ध असल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास अनेकांना वाटत आहे. अनेकदा तर अपघात घडल्यानंतर येथे प्राथमिक वैद्यकीय सुविधा बराच वेळपर्यंत उपलब्धच न झाल्याने काही जणांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

दुर्दैवाने गाडीला अपघात झाला तर तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणारी साधनेच या ठिकाणी उपलब्ध नाहीत. प्रवासादरम्यान अपघात झाल्यास नजीक रुग्णालये, प्रथमोपचार केंद्रे, रुग्णवाहिका आदींची सोय प्रवाशांसाठी उपलब्ध असावी, अशीही मागणी होत आहे, जेणेकरून अपघात घडल्यास प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी किमान प्रयत्न तरी करता येतील. तसेच या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनेही काही ठोस उपाययोजना करण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. अनेकदा तर येथून जाताना निर्जनस्थळी काही समाजकंटकांकडून विविध शस्त्रांचा धाक दाखवून प्रवाशांना लुटण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुळे किमान ५ ते १० किमीच्या अंतरावर पोलिसांची मदत केेंद्रे उभारून या ठिकाणी सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यात आवश्यक अशा सोयीसुविधा उपलब्ध न झाल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. समृद्धी महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याचे काम झपाट्याने सुरू आहे. हे काम सुरू असतानाच या ठिकाणी जर पहिल्या टप्प्यात अपुर्‍या असणार्‍या सोयीसुविधा उभारण्याकडे लक्ष केंद्रित केले गेले तर दुसर्‍या टप्प्यातील प्रवास हा अधिक सुखकर असेल. प्रशासनाने आधीच्या टप्प्यातून धडा घेत दुसर्‍या टप्प्यात तरी किमान प्रवाशांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा वाहनचालक आणि प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

रामचंद्र नाईक
रामचंद्र नाईकhttps://www.mymahanagar.com/author/ramchandra/
गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लिखाण. नियमितपणे वृत्तपत्र वाचनाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -