घरसंपादकीयओपेडगुरुजींच्या प्रेमामुळे नागूच्या जीवनाला मिळाला यू टर्न!

गुरुजींच्या प्रेमामुळे नागूच्या जीवनाला मिळाला यू टर्न!

Subscribe

‘हेडाम’ ही नागू विरकर यांची अलीकडे प्रसिद्ध झालेली पहिलीच कादंबरी. अवघ्या चारच महिन्यांत दुसरी आवृत्ती संपून तिसर्‍या आवृत्तीच्या प्रतीक्षेत असून वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कंगोरे गुरुजींच्या अनाठायी भीतीपोटी शाळेचं आणि शिक्षकांचं आयुष्यात तोंड न पाहण्याची प्रतिज्ञा घेतलेल्या नागू विरकरला जालिंदर पोल गुरुजींच्या प्रेमळ सहवासाने जीवनात यू टर्न मिळतो .अशिक्षित खानदानीत जन्मलेला मुलगा उच्च शिक्षण घेऊन शासनाच्या शिक्षण विभागातच केंद्रप्रमुख या पदावर पोहचतो. हेडाम कादंबरी लिहितो. हे एक वेगळेच रसायन आपल्याला या कादंबरीतून वाचायला मिळतं.

–प्रदीप जाधव

महाराष्ट्रात विविध जाती, धर्म, पंथ, समूहाचे लोक राहत असून आपल्या उदरनिर्वाहासाठी वेगवेगळा व्यवसाय करत असतात. प्रत्येक जात समूहाला आपलं स्वतःच अस्तित्व आणि स्वाभिमान असतोच. प्रत्येक समूह आपल्या वर्चस्वासाठी किंवा समाजासमोर आपली वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी धडपडतात. त्यासाठी विविध उपाययोजना, साधनांचा वापर करतात. समाजासमोर प्रतिबिंबित होण्यासाठी साहित्य हे प्रभावी माध्यम असल्याने आपल्या व्यथा, वेदना, संस्कृती, रुढी-परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, चालीरीती, बोलीभाषा या कथा, कविता, गझल, चारोळ्या, कादंबरीच्या रूपाने व्यक्त करत असतात. आतापर्यंत साहित्याच्या माध्यमातून दलित, आदिवासी, भटके, कष्टकरी, उपेक्षित, सोशीत समाजाचं प्रतिबिंब उमटलेलं असून व्यवस्थेने नाकारलेल्या नाही रे वर्गाच्या समाजाची एकूण सामाजिक स्थित्यंतरं त्यात मांडली आहेत. त्या त्या जात समूहाचं प्रतिनिधित्व आत्मचरित्र, आत्मकथा, आत्मनिवेदने, स्वकथन यातून ते अधिक अधोरेखित झालं आहे. अशी आत्मकथनं किंवा कादंबर्‍या त्या त्या कालखंडात प्रचंड गाजलेल्या आहेत.

- Advertisement -

गेल्या पाच-सहा दशकांपासून अशा साहित्य प्रकाराने मराठी साहित्य सातासमुद्रापार गेले, ते अधिक समृद्ध होऊन वाचकांची संख्या आणि व्याप्ती वाढलेली असून हे काम दैनंदिन सुरूच आहे. यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे साहित्याचा प्रवास शहराकडून खेड्याकडे अधिक जलद गतीने होत आहे. आपण जगताना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक चटके भोगलेले आयुष्य सर्वदूर पोहचवून इतरांनाही प्रेरणा मिळावी या उद्देशाने लिहिणार्‍यांची आता स्पर्धाच लागली आहे. उकिरड्यावरचं मनुष्यहीन जीवन जगासमोर आलंच पाहिजे, पण त्यासाठी स्पर्धा नसावी.

‘हेडाम’ ही नागू विरकर यांची अलीकडे प्रसिद्ध झालेली पहिलीच कादंबरी. अवघ्या चारच महिन्यांत दुसरी आवृत्ती संपून तिसर्‍या आवृत्तीच्या प्रतीक्षेत असून वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कंगोरे गुरुजींच्या अनाठायी भीतीपोटी शाळेचं आणि शिक्षकांचं आयुष्यात तोंड न पाहण्याची प्रतिज्ञा घेतलेल्या नागू विरकरला जालिंदर पोल गुरुजींच्या प्रेमळ सहवासाने जीवनात यू टर्न मिळाल्याने अशिक्षित खानदानीत जन्मलेला मुलगा उच्च शिक्षण घेऊन शासनाच्या शिक्षण विभागातच केंद्रप्रमुख या पदावर पोहचतो. हेडाम कादंबरी लिहितो. हे एक वेगळेच रसायन आपल्याला या कादंबरीतून वाचायला मिळतं. आपण भोगलेल्या चटक्यांची जाणीव ठेवूनच आज ते ठाणे जिल्ह्यातील मोखाडा या अतिदुर्गम आदिवासी भागात आपली सेवा करीत आहेत. शिक्षणाची गोडी निर्माण झाल्यानंतर आईवडिलांचा नकार असला तरी आजीने मात्र आशीर्वाद दिला आणि तेथूनच पुढे शिक्षणासाठीचा संघर्ष सुरू झाला.

- Advertisement -

कधी ट्रॅक्टरवर काम केलं, कधी माती भरण्याचं काम केलं, तर कधी हॉटेलमध्ये काम करून शिक्षणाची तळमळ पूर्ण केली. ही कादंबरी धनगर समाजातील हाटकर या पोट जातीच्या समूहाचे चित्रण आहे. ‘हेडाम’ धनगर समाजातील खेळ आणि नृत्याचा प्रकार आहे. त्याचं वैशिष्ठ्य असं की जिंकेपर्यंत नाचत, खेळतच राहायचं. म्हणजेच आयुष्यात जिद्द चिकाटी ठेवून संघर्ष करत करत यशस्वी होईपर्यंत लढत राहणं. नागू विरकर यांचं ‘हेडाम’प्रमाणे संपूर्ण आयुष्य हे संघर्षमय असून जिंकून यशस्वी होईपर्यंत त्यांनी मागे बघितलंच नाही. आपल्या आयुष्याचं वर्णन करताना ते म्हणतात, ‘मला बर्‍याच प्रसंगांशी हेडाम खेळावं लागलं’. विरकर यांनी या साहित्यकृतीला कादंबरी असं म्हटलं असलं तरी एक-दोन प्रकरणांतच फक्त समाजाचं चित्र मांडलं असून पुढे नायक म्हणून स्वतःभोवतीच ती फिरते. त्यामुळे ही कादंबरी नसून नागू विरकर या व्यक्तीचं आत्मचरित्र किंवा आत्मनिवेदन आहे हे स्पष्ट होतं.

धनगर समाज भटक्यांमध्ये मोडत असून पोटाची खळगी भरण्यासाठी हा समाज स्थलांतर करीत असतो. रोज नवं गाव, नवी चूल करीत मेंढरांना चारापाणी मिळेल तिकडे मेंढपाळांची जगण्याची फरपट चालूच असते. ऊन-वारा, वादळ, पाऊस-गारठा झेलत, ना रस्ता ना मार्ग, ना दिशा ना ठावठिकाणा करीत तो भटकंती करणारा समूह आजही हालअपेष्टा सहन करीत आहे. मेंढपाळन करीत भटकताना दोन फायदे होत असतात. ज्या शेतात ही मेंढरं ठेवली जातात तिथे लेंडीखत तयार होऊन सुपीक जमिनीतून शेतकर्‍याला सतत तीन वर्षे भरघोस पीक घेता येतं. त्या बदल्यात शेतकरी धनगराला मोबदला म्हणून पैसे किंवा धान्य देत असतो. तसेच मेंढी ही जातही स्थलांतर केल्याने वर्षातून दोनदा कोकरू देत असते, अन्यथा एकाच जागी मेंढरं मरतातही. त्यामुळे या समाजाला सहा महिन्यांनी स्थलांतर करावं लागतं, असं वर्णन या कादंबरीत आलेलं आहे.

या समाजामध्ये शिक्षणाविषयी फारशी आस्था नाही. सगळेच लोक शिकून साहेब होतील किंवा फार मोठे अधिकारी यावर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे शिक्षणापेक्षा मेंढीपालन व्यवसायालाच ते प्राधान्य देतात. या समाजात स्त्रियांनाही फारसं महत्त्व दिलं जात नाही. हे त्यांनी एका प्रकरणात नमूद केलं आहे. ते लिहितात, बायकांना जत्रा, बाजारहाट कधीच नसतो. धनगरणीचा काष्ठा दोन-दोन दिवस कामानं फिटत नसतो. तिचं काम चूल आणि मूल. पाणी विहिरीतून आणायचं. दगड चुलीला शोधायचे, जळाण, काट्या कुट्याचं आणायचं. वार्‍या कावरात उघड्यावर भाकरी भाजायच्या. कोकरी, घोडी मागं पुढं लांबलं आकाडलं ते बघायचं. जगणं त्या विसरून जायच्या. गडी माणसं मात्र चार दिवस जत्रेला गावी जाऊन यायचं. पुरुष मंडळी जीवनाची सगळी हौसमौज करतात, तर महिलांना मर्यादित स्वातंत्र्य आहे.

संपूर्ण कादंबरी माणदेशातील धनगरी या आपल्या बोलीभाषेत लिहिली आहे. सातारा जिल्ह्यातील माण नदीच्या काठावर जो परिसर वसला आहे त्याला माणदेश म्हणतात. त्या परिसरातील सर्व समाजातील सुखदुःख, त्यांची बोलीभाषा, त्यांचे सण-उत्सव याचा प्रामुख्याने यात उल्लेख आहे. इथल्या भटक्या समूहाला शाळा म्हणजे नक्की काय असते हेही माहिती नाही. नागू आपल्या मित्राला विचारतो, कसली आसतीया रं शाळा? शिंगाड्याचा पक्या म्हणाला, आरं शाळा म्हन्जी सारी पोरं एकाच खोलीत कोंढत्याती, कोकरी कोतू तसे एक मास्तर आसत्यां शिकवायला. मग दिवसभर खेळ, गाणी काय काय आसतया बाबा.

मज्जाबी आसतीय अनं लिवायला आलं न्हाय मग मास्तर लय मारतूया. शाळेतील मास्तरांची काल्पनिक भीती हा लहान मुलांसाठी एक महत्वाचा विषय राहिलेला आहे. त्यात पुन्हा गावाकडच्या शाळांमध्ये शिक्षकसुद्धा दूरवर राहत असतात, त्यांनाही पायपीट करत शाळेत पोहोचायचे असते. त्यात पुन्हा आडगाव म्हणजेच मुख्य रस्त्यापासून आत दूरवर असेल तर तिथल्या शाळेमध्ये पोहोचणे शिक्षकांसाठीही आव्हान असते. शाळेत गेलास तर शिकून साहेब होशील, आमच्यासारखे भटकावे लागणार नाही, अशी स्वप्ने पालक मुलांना दाखवत असतात. निदान त्या आशेने तरी आपला मुलगा शाळेत जाईल आणि शिकेल, असे या पालकांना वाटत असते. शाळा आणि मास्तर यांच्याविषयी लहान मुलांच्या मनात एक अनामिक भीती असते, ती घालवण्यासाठी शिक्षकांची भूमिका फार महत्वाची असते.

कादंबरी लेखन करताना केवळ भटक्या विमुक्त नव्हे तर सर्वच तळागाळातील समाजाचं जीवन जगताना सामूहिक बंधनं, सहकार्य, मान-अपमान, अवहेलना, देवभोळेपणा, अंधश्रद्धा, निसर्ग हाच देव, प्राणीमात्रांवरील प्रेम, शाळाबाह्य मुलांच्या वैयक्तिक भावभावना, कुचंबना यांच्या मुळाशी जाऊन ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हेडाममधून अनेक नवनवीन गोष्टी वाचकाला माहिती होतात. धनगर वस्तीला धनगरवाडा म्हणतात. वाड्याच्या मुखियाला खिलारी म्हणतात. सर्वजण त्यांना मानसन्मान देतात. या वाड्यात आठ-दहा बिर्‍हाडं राहतात. धनगरी याड, हेडाम, भाकणूक, धनगरी ओव्या, नागोबा, बिरोबा, देवदेवता, जत्रा, मेंढ्या कोकरांच्या जगण्याला व्यापलेले विश्व. असे शतकानुशतकांच्या अज्ञान अंधःकारातील जग ‘हेडाम’मध्ये पाहायला मिळते. या प्रदेशातील लोकजीवनाची भाषिक ओळख या कादंबरीतून होते, तर पारधी आणि धनगर या दोन भटक्या समाजातील झालेल्या भांडणातून एकाचा झालेला मृत्यू वाचताना अंगावर शहारे येतात, काफरं भरतं.

‘हेडाम’ कादंबरीत निसर्गरम्य परिसराचा उल्लेख, पशू-पक्ष्यांवरील प्रेम, माणदेशाचा दुष्काळ, फिरस्त्या मेंढपाळ धनगरांचा संघर्ष, सांस्कृतिकता, धार्मिकता आणि बोलीभाषा अशा अनेक बाजू नागू विरकर यांनी या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तेथील भूसांस्कृतिक जग व समकालीन जगाची तुलना करताना वाचकाला भुरळ पाडून खिळवून ठेवते. वेगळ्या विषयावरचे संदर्भ आणि चित्रण असल्याने या कादंबरीचे स्वागतच होईल. मुखपृष्ठावरील चित्र सहज लक्ष वेधून घेतं. कारण एकाच चित्रामध्ये भटक्यांची भ्रमंती चित्रकाराने साकारली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -