घरसंपादकीयओपेडमुंबईची लाईफलाईन बनतेय मुंबईकरांची डेथ लाईन!

मुंबईची लाईफलाईन बनतेय मुंबईकरांची डेथ लाईन!

Subscribe

मुंबईकरांचे दररोज किमान २ ते ४ तास प्रवासातच जातात. मुंबईकर त्यांचं अर्ध आयुष्य हे घराबाहेर त्यातही बहुतांश प्रवासातच घालवतो. त्यामुळं की काय लोकल ट्रेनचा मुंबईची लाईफलाईन असा उल्लेख केला जातो, पण वाढत्या गर्दीमुळं हीच लाईफलाईन मुंबईकर प्रवाशांची डेथ लाईन बनू पाहतेय. मुंबईत दररोज २० प्रवासी लोकल रेल्वे अपघातात जखमी होतात, तर रोज किमान १० प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू होतो. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर वर्षाकाठी ७ हजार प्रवाशांचे अपघात होतात. त्यात दरवर्षी साडेतीन ते ४ हजार प्रवाशांचा मृत्यू होतो. अगदी दहशतवादी हल्यात जेवढे लोक मारले जात नाहीत, त्यापेक्षा अधिक माणसं रोज मुंबई लोकलमधून पडून मरतात.

मोबाईलमध्ये सेट केलेला अलार्म पहाटेची भूपाळी आळवू लागताच मुंबईतील तमाम सकळजन डोळे चोळत…अर्धवट गुंगीतच अंथरूणाची आवरासावर करून दिनचर्येला लागतात. दिवसभर दमूनभागून स्वत:ला अंथरूणाच्या हवाली करून निद्राधीन झालेल्या मुंबईकरांचे डोळे अलार्मशिवाय उघडणं निव्वळ अशक्यच. तोंडातला ब्रश चावत आणि खांद्यावरच्या टॉवेलला झटका देत न्हाणीघरात घुसण्याआधी हाच मुंबईकर भिंतीवर टांगलेल्या घडाळ्यावर एक कटाक्ष टाकून स्वत:चं आन्हिक, दैनंदिन कामं उरकून अमूक वाजताची, तमूक प्लॅटफॉर्मवर येणारी लोकल गाठायचीच असा निर्धार करतो आणि पाण्याचा पहिला तांब्या मग मोठ्या जोशात अंगावर ओततो.

तयारी करून धावतपळत प्लॅटफॉर्मवर यायचं, मागच्या स्टेशनवरून गर्दीनं ओसंडून वाहणार्‍या लोकलमध्ये रेटारेटी करत, अंग बारीक करून कसंबसं घुसायचं आणि आपलं स्थानक येईपर्यंत जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा. मुंबईची उपनगरीय ट्रेन अर्थात लोकल गाठण्यासाठी मुंबईकरांची घडाळ्याच्या काट्याशी सुरू असलेली स्पर्धा ही नित्याचीच.

- Advertisement -

त्यात एखादी लोकल रद्द झाली म्हणजे त्या दुर्दैवी अपघातही. जीवाच्या आकांताने धावणार्‍या मुंबईकरांच्या या जगण्याला जगणं कसं म्हणायचं आणि रोजच्या वाटेवर गर्दीत चेंगरून येणार्‍या मरणाला मरण तरी कसं म्हणायचं? असा साधा सरळ प्रश्न मुंबईबाहेरच्या अनेकांना पडेलही, परंतु मुंबईकरांचं हेच आयुष्य. मुंबईला स्वप्ननगरी असं म्हटलं जातं. देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्यांच्या स्वप्नांची पूर्तता या शहारानं केली. पण याच मुंबईतील सर्वसामान्यांचं जगणं हे आजघडीला किड्या-मुंग्यांसारखं झालं आहे. मुंबईकरांचं जगणं किती हलाखीचं आहे, याचा अनुभव सकाळ-संध्याकाळच्या कार्यालयीन वेळेत गर्दीनं ओसंडून वाहणार्‍या लोकल ट्रेनकडं बघितल्यास सहजपणं येतो.

मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांच्या जीवनातील अविभाज्य घटक. दररोज कार्यालय गाठायचं असो किंवा मुंबईच्या एका टोकापासून दुसरं टोक गाठायचं असो, पहिला पर्याय म्हणून लोकलचंच नाव पुढं येतं. एसटी-बेस्ट बस, रिक्षा-टॅक्सीचा पर्याय निश्चितच उपलब्ध आहे, पण तो फारच वेळकाढू असल्यानं फारसे प्रवासी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी त्यांच्या वाटेला जात नाहीत. मेट्रो सेवा दिवसागणिक विस्तारत असली, तरी तिला मुंबईच्या दळणवळणाचा कणा बनण्यास अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

- Advertisement -

दररोज ७५ ते ८० लाख प्रवासी मुंबई लोकलनं प्रवास करतात. सकाळच्या वेळेत खोपोली, कर्जत, कसारा, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ, पनवेल, खारघर, वाशी, वसई-विरार, भाईंदर, बोरीवली, कल्याण-डोंबिवली, ठाणे अशा मुंबईच्या पूर्व-पश्चिमेकडील एक ना अनेक उपनगरातून प्रवासी दक्षिण मुंबईकडं निघतात, तर सायंकाळी चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी ट्रेन गाठून पुन्हा घर गाठतात. यामध्ये नोकरदार, दुकानदार, व्यावसायिक, कष्टकरी, मजूर या सार्‍यांचाच समावेश असतो.

मुंबईकरांचे दररोज किमान २ ते ४ तास प्रवासातच जातात. मुंबईकर त्यांचं अर्ध आयुष्य हे घराबाहेर त्यातही बहुतांश प्रवासातच घालवतो. त्यामुळं की काय लोकल ट्रेनचा मुंबईची लाईफलाईन असा उल्लेख केला जातो, पण वाढत्या गर्दीमुळं हीच लाईफलाईन मुंबईकर प्रवाशांची डेथ लाईन बनू पाहतेय. मुंबई लोकलचा प्रवास किती जीवघेणा बनलाय हे काही आकडेवारी पहिल्यानंतर लक्षात येतं. मुंबईत दररोज २० प्रवासी लोकल रेल्वे अपघातात जखमी होतात, तर रोज किमान १० प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू होतो.

रेल्वे प्रशासनाच्या आकडेवारीनुसार मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर वर्षाकाठी ७ हजार प्रवाशांना रेल्वे अपघाताला सामोरं जावं लागतं. त्यात दरवर्षी साडेतीन ते ४ हजार प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू होतो. अगदी दहशतवादी हल्यात जेवढी लोक मारली जात नाहीत, त्यापेक्षा अधिक माणसं रोज मुंबई लोकलमधून पडून मरतात. गेल्या वर्षभरात एकूण २५०७ जणांचा रेल्वे अपघातांमुळं मृत्यू झाला होता.

वाढत्या गर्दीचा विचार करून प्लॅटफॉर्म-जिन्यांची संख्या आणि रुंदी वाढवणं, नवीन पादचारी पूल बांधणं आदी कामंही रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहेत, पण फारसा फरक पडताना दिसत नाही. गर्दीचे व्यवस्थापन करणे अवघड झालेले आहे. आता सकाळ आणि संध्याकाळी पीक अवरला होणार्‍या गर्दीवर उतारा म्हणून मुंबईतील खासगी आणि शासकीय कार्यालयांच्या वेळेत बदल करून ही कार्यालये दोन शिफ्टमध्ये चालवण्यात यावी, अशी विनंती मध्य रेल्वे प्रशासनाकडून राज्य सरकारला करण्यात येणार आहे. खरं तर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ९ वर्षांपूर्वी कार्यालयीन वेळेतील बदलाची सूचना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती, परंतु ही सूचना कुणीही गांभीर्यानं घेतली नाही.

विशेष म्हणजे यावेळी मध्य रेल्वेने इतरांना ब्रम्हज्ञान ऐकवण्याआधी १ नोव्हेंबर २०२३ पासून स्वत: या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात करत नवा पायंडा पाडला आहे. मध्य रेल्वेवर दररोज ४० ते ४५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यातील ८० टक्के प्रवासी हे पासधारक आहेत. याचाच अर्थ हे प्रवासी रोज प्रवास करणारे प्रवासी आहेत. मध्य रेल्वेचे अनेक प्रवासी हे कर्जत-कसारा, ठाणे-कल्याण आदी स्थानकांवरून येतात. लोकलच्या गर्दीचा त्यांनाही फटका बसतो. त्यांचाही लेटमार्क लागतो. त्यामुळं मध्य रेल्वेनं आपल्या कर्मचार्‍यांना सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.४५ तसेच सकाळी ११.३० ते सायंकाळी ७.४५ वाजेपर्यंत अशा दोन शिफ्ट उपलब्ध करून दिल्या आहेत.

या दोनपैकी जमेल ती शिफ्ट निवडण्याची मुभा कर्मचार्‍यांना देण्यात आली आहे. एका महिन्यासाठी ही वेळ असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) रजनिश कुमार गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेत मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, भुसावळ हे ५ विभाग येतात. मुंबई विभागातील १२ उपविभागात ३०,७०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. इलेक्ट्रिक उपविभागात सर्वाधिक ४,७०० कर्मचारी कार्यरत आहेत. सर्वात कमी पर्सनल आणि स्टोर उपविभागात कर्मचारी आहेत. या निर्णयामुळं मध्य रेल्वेच्या ३० हजारांहून जास्त कर्मचार्‍यांची गर्दीतून सुटका होईल, असा अंदाज आहे.

दक्षिण मुंबईतील कुलाबा, फोर्ट, मरिन लाईन्स, काळबादेवी या भागात बहुतांश सरकारी आणि खासगी कार्यालये वा इतर महत्वाचे उद्योगधंदे असल्याने पीक अवरला मोठ्या प्रमाणात गर्दीचा लोंढा या भागात येतो. मागील काही वर्षांमध्ये मुंबई सेंट्रल, ताडदेव ते दुसर्‍या बाजूला लालबाग परळ या भागाचा वेगाने विकास झाला आहे. जुन्या गिरण्यांच्या जागी आकाशाला गवसणी घालणारे टॉवर्स उभे राहिलेत, वांद्रे-कुर्ला संकुलात अनेक महत्त्वाची कार्यालये हलवण्यात आली आहेत. या ठिकाणी अनेक उद्योगधंदे, मोठ्या कॉर्पोरेट्सची कार्यालये तयार झाल्यानं शहराच्या वेशीबाहेर हद्दपार झालेल्या मुंबईकराला नाईलाजानं रोजगारासाठी इथंच यावं लागत आहे. त्यामुळं कार्यालयीन वेळेतील बदलासोबतच उद्योगधंद्यांची नवनवी ठिकाणंही विकसित होणं गरजेचं आहे.

मंत्रालयापासून इतर विविध विभागांच्या सरकारी कार्यालयाच्या वेळा या एकसमान आहेत. बँका वा इतर खासगी कार्यालयांच्या वेळाही सकाळी ९ ते ५ किंवा १० ते ६ अशाच असतात, परिणामी एकाच वेळेला कर्मचारी घराबाहेर पडतात आणि त्याच सुमारास घरी जाण्यास निघतात. या गर्दीची २ शिफ्टमध्ये विभागणी केल्यास साधारणपणे सर्व खासगी-सरकारी बँका, पतपेढ्यांमधील कर्मचार्‍यांची संख्या सुमारे ८ लाख, केंद्र-राज्य-महापालिका अर्थात सर्व सरकारी कर्मचार्‍यांची संख्या १० लाख, खासगी आस्थापने-कार्यालयांमधील प्रवासी संख्या १५ आणि अन्य प्रवासी एकूण १२ लाख अशी मांडता येईल. यामुळे एकट्या खासगी आस्थापनांतील वेळेत बदल केल्यास मध्य रेल्वेवरील ४५ लाख प्रवाशांपैकी तब्बल १५ लाख प्रवासी विभागले जातील, असा कयास आहे. अर्थात हा ढोबळ अंदाज आहे.

राज्य सरकारच्या आस्थापनेतच मोठ्या संख्येने कर्मचारी काम करत असल्यानं याबाबत राज्य सरकारचा पुढाकार महत्त्वाचा ठरणार आहे. गर्दीच्या नियोजनासोबतच या २ शिफ्टचे फायदेही अनेक आहेत. बँका वा इतर सरकारी कामांसाठी सर्वसामान्यांना रजा काढावी लागते. शिफ्टमध्ये बदल झाल्यास सर्वसामान्यांना त्यांच्या सोयीच्या वेळेत या कार्यालयात जाऊन आपली कामं करणं शक्य होईल. सद्यस्थितीत सकाळी कामावर गेलेला माणूस सुखरूप घरी परत येईल की नाही, याची शाश्वती या मुंबई शहरात राहिलेली नाही, अशा या मुंबईचा विकास आंतरराष्ट्रीय धर्तीवर होण्याआधी माणूसकेंद्री व्हायला हवा, हेच सर्वसामान्य मुंबईकरांचं मागणं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -