घरसंपादकीयनवर्‍याच्या जागेवर बायकोच का?

नवर्‍याच्या जागेवर बायकोच का?

Subscribe

शिवसेना तर आपल्या मालकीची, पण बहुतांश सरदार आणि सैनिक शिंदेंच्या गोटात सहभागी होत आहेत, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांची चिंता वाढत आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघातील निवडणूक त्यांच्या दृष्टीनेही महत्त्वाची झालेली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या येत्या ३ नोव्हेंबरला होणार्‍या पोटनिवडणुकीला केंद्रित करून विशेषत: मुंबईतील परिसर ढवळून काढला जात आहे. ही पोटनिवडणूक भाजप, त्यांच्यासोबत असलेला शिंदे गट आणि दुसर्‍या बाजूला शिवसेना आणि त्यांच्यासोबत महाविकास आघाडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनवलेली आहे. भाजपने तर मुंबईतील आपल्या सगळ्या आमदारांना त्या मतदारसंघांमध्ये अगदी कानाकोपर्‍यात फिंल्डिंगसाठी उतरवले आहे, म्हणजे एक एक मत महत्वाचे ठरवले आहे. त्याचसोबत दुसर्‍या बाजूला शिंदे गटाने खरी शिवसेना आपलीच असा दावा करून ४० आमदार, तसेच काही खासदार, अनेक नगरसेवक आपल्या बाजूने वळवल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण शिवसेना तर आपल्या मालकीची, पण बहुतांश सरदार आणि सैनिक शिंदेंच्या गोटात सहभागी होत आहेत, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांची चिंता वाढत आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघातील निवडणूक त्यांच्या दृष्टीनेही महत्त्वाची झालेली आहे.

या निवडणुकीतील हार जीत ही आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची झलक मानली जात आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघातील आमदार रमेश लटके यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. ही पोटनिवडणूक कदाचित इतकी प्रतिष्ठेची आणि चुरशीची झाली नसती, पण एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी करणे, त्यातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर वरचष्मा मिळवणे ही भाजपची महत्वाकांक्षा बळावणे, यावेळी मुंबई महापालिकेवर आपली बहुमताची सत्ता आणणे असे भाजपला प्रकर्षाने वाटणे अशा सगळ्या वातावरणात ही पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीला मुंबईतूनच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रातून जोर लावण्यात येत आहे. या निवडणुकीचे अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपच्या मुरजी पटेल यांनी भरल्यानंतर आता दोन्ही बाजूंनी प्रचाराला सुरुवात झालेली आहे, यावर्षी दिवाळीत वाजणार्‍या फटाक्यांपेक्षा भाजप विरुद्ध ठाकरे गटांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फटाक्यांचे आवाज जास्त मोेठे असतील, यात शंका नाही. त्यामुळे ही निवडणूक यावेळी मुंबईकरांचे काहीही करून लक्ष वेधून घेणार आहे.

- Advertisement -

ही निवडणूक लढवली जात असताना राज्यातील दोन नेत्यांचे सूचनावजा सल्ले पुढे आले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही निवडणूक त्यांचा उमेदवार उभा न करता बिनविरोध करण्याचा सल्ला दिला आहे. भाजपने आपला उमेदवार उभा करू नये, असे केल्याने दिवंगत रमेश लटके यांच्या आत्म्यास शांती मिळेल. भाजपने असे करणे हे महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगत राहील, हीच आमच्या पक्षाची धोरणात्मक भूमिका आहे, असे म्हटले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर पत्रकार परिषद घेऊन भाजपने आपला उमेदवार मागे घ्यावा आणि ही निवडणूक ऋतुजा लटके यांच्यासाठी बिनविरोध करावी, असे आवाहन केले आहे. ही पोटनिवडणूक भाजपने बिनविरोध केली तर महाराष्ट्रात चांगला संदेश जाईल, असे म्हटले आहे. राज ठाकरे आणि शरद पवार यांनी अशा प्रकारचे आवाहन केले आहे, या मागची भावना समजण्यासारखी आहे, पण राजकारण हे केवळ भावनेवर चालत नाही, कारण भावनेच्या ढाली मागून मोठे राजकारण खेळले जात असते.

राज ठाकरे यांची अलिकडची भाषणे पाहता त्यांच्या भाषणांना भाजपला अनुकुल ठरेल, अशा भूमिकेची किनार आहे, असे दिसते. त्या भाषणांमध्ये त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली, त्यामुळे आता त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासाठी भाजपला उमेदवार मागे घ्यायला सांगणे हेही कोड्यात टाकणारे आहे. जोपर्यंत शिंदे गट भाजपच्या कब्जात येत नव्हता तोपर्यंत भाजपचे नेते राज ठाकरे यांच्या भेटीगाठी घेत होते, पण जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फूट पाडून भाजपशी हातमिळवणी केली, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा सहभाग असलेले सरकार पडले. त्यानंतर भाजपला राज ठाकरे यांच्याविषयी वाटणारे ममत्व कमी झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण राजकारण हा सोयीचा मामला आहे. कोण कुणाशी कधी हातमिळवणी करेल, याची काहीच शाश्वती नाही. दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपने उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी आणि महाराष्ट्राला चांगला संदेश द्यावा, असे म्हटले आहे. मुद्दा असा आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना २०१९ साली लोकांचा कौल मिळालेला नसतानाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याच्या जिद्दीतून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळाली होती. त्यातून महाविकास आघाडी स्थापना झाली, त्यांची सत्ता महाराष्ट्रात आली. जर शरद पवार यांनी अकल्पितपणे आकाराला आणून सत्ता मिळवलेल्या महाविकास आघाडीचा शिवसेना भाग नसती तर आज शरद पवार यांनी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या समर्थनासाठी पत्रकार घेतली असती का?

- Advertisement -

ऋतुजा लटके यांच्या पतीचे निधन झाले आहे, त्यामुळे पुढे त्यांच्या जागी त्या निवडणुकीला उभ्या राहत असतील तर त्यांच्या विरोधात उमेदवार उभे करू नयेत, हा एक भावनिक भाग आहे. पण राजकीय पक्ष मृत लोकप्रतिनिधीच्या पत्नीला उमेदवारी देऊन लोकांना भावनिकदृष्ठ्या प्रभावित करून त्या जागेवरील विजय पक्का करत असतो, हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. त्या जागेवर उभे राहणे ही त्या लोकप्रतिनिधीच्या पत्नीची गरज आहे की, पक्षाची गरज आहे, याचा कोण विचार करणार? त्या लोकप्रतिनिधीने त्या पक्षासाठी विविध पातळ्यांवर काम केलेले असते, त्यामुळे त्याला पक्षाची उमेदवारी मिळलेली असते, पण त्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला उभे करण्यासाठी तिचे त्या पक्षासाठी काय योगदान आहे, असा प्रश्न कुणीही विचारत नाही, कारण प्रश्न भावनेचा बनवला जातो. खरे तर त्या पक्षासाठी अनेक वर्षे लोकांमध्ये जाऊन काम करणारे अनेक पदाधिकारी असतात, पण त्यांना संधी दिली जात नाही. आपल्याकडे लोकशाही शासनप्रणाली आहे, त्यामुळे इथे जो पक्षातील सक्षम उमेदवार असेल त्याला संधी द्यायला हवी. नवर्‍याच्या जागेवर बायको, ही पद्धती लोकशाहीच्या तत्वाला पोषक ठरणारी नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -