घरसंपादकीयदिन विशेषव्याकरणकार, ग्रंथकार दादोबा पांडुरंग तर्खडकर

व्याकरणकार, ग्रंथकार दादोबा पांडुरंग तर्खडकर

Subscribe

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा आज स्मृतिदिन. दादोबा तर्खडकर हे अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक होते. त्यांचा जन्म 9 मे 1814 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खासगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले. गुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तीनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते.

संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण (१८३६) त्यांनी सिद्ध केले. या व्याकरणाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. १८८१ मध्ये त्यांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही (१८६५) त्यांनी लिहिले. त्याच्याही अनेक आवृत्त्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर ‘यशोदापांडुरंगी’ (१८६५) ही गद्य टीका त्यांनी लिहिली. त्यांचे ‘१८४६ पर्यंतचे आत्मचरित्र’ (१९४७, संपा. अ. का. प्रियोळकर) महत्त्वाचे आहे. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून त्यांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहे.

- Advertisement -

साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ठ्ये होत. यांशिवाय ‘मराठी नकाशांचे पुस्तक’ (१८३६), ‘इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका’ (१८६०), ‘धर्मविवेचन’ (१८६८), ‘पारमहंसिक ब्राह्मधर्म’ (१८८०), अशी विविध प्रकारची त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले. ग्रंथलेखनाप्रमाणेच समाजसुधारणेचे कार्यही त्यांनी केले. सरकारी नोकरी करीत असतानाच लोकहिताच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. दुर्गाराम मनसाराम मेहेता यांनी सुरतला स्थापन केलेली मानवधर्मसभा (१८४४) आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली परमहंस सभा या धर्मसुधारक संस्थांमागे त्यांची प्रेरणा होती. अशा या थोर व्याकरणकाराचे 17 ऑक्टोबर 1882 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -