घरमनोरंजनOscar 2024 : ऑस्कर सोहळ्यात नितीन देसाई यांना आदरांजली

Oscar 2024 : ऑस्कर सोहळ्यात नितीन देसाई यांना आदरांजली

Subscribe

यंदाचा ऑस्कर सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये 11 मार्च रोजी पार पडला. या सोहळ्यात अनेक चित्रपट आणि कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावर्षीचा ऑस्कर सोहळा आणखी एका गोष्टीसाठी खास ठरला तो म्हणजे या सोहळ्यात लोकप्रिय कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना आदरांजली वाहण्यात आली. ‘इन मेमोरियम’ नावाच्या सत्रात जगभरातील यशस्वी दिवंगत कलावंतांचं स्मरण केलं जाते. त्यामध्ये यंदा नितीन देसाई यांचा देखील उल्लेख करण्यात आला.

2 ऑगस्ट 2023 रोजी दिग्दर्शक, कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं होतं. नितीन देसाई यांनी संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर काम केलं होतं. ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे सेट त्यांनी तयार केले होते. ‘लगान’ हा चित्रपट 2002 साली ऑस्करला गेला होता. त्याचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई होते. लगानने सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाच्या कॅटेगरीत अंतिम पाच चित्रपटात स्थान मिळवले होते. ‘स्लमडॉग मिलेनियर’ या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपटाचं कला दिग्दर्शन देखील त्यांनीच केलं होतं.’स्लमडॉग मिलेनियर’या चित्रपट ओरिजनल स्कोअर कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

- Advertisement -

नितीन देसाई यांनी मोठ्या चित्रपटांसाठी काम केलं होतं. राजकुमार हिरानी, विधू विनोद चोप्रा आणि आशुतोष गोवारीकर यांसारख्या चित्रपट निर्मात्यांसमवेत त्यांनी काम केलं होतं. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, दोस्ताना, लगे रहो मुन्ना भाई, मुन्ना भाई एमबीबीएस, मिशन कश्मीर, जोश आणि प्यार तो होना ही था या चित्रपटांचे ते कला दिग्दर्शक होते. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत हा 2019 सालचा ऐतिहासिक चित्रपट नितीन देसाईंचा शेवटचा चित्रपट होता. हिंदी सिनेसृष्टीतील कलादिग्दर्शनाच्या क्षेत्रात नितीन देसाईंचं मोठं योगदान आहे. मागील वर्षी नितीन देसाई यांनी कर्जतमधील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत टोकाचे पाऊल उचलले होते. नितीन देसाई यांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली होती. यावेळी त्यांचं वय अवघं 57 वर्षे होतं. मात्र ते बॉलिवूडमध्ये आपला ठसा कायमचा उमटवून गेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -