घरमनोरंजनकॉर्नर सीट

कॉर्नर सीट

Subscribe

रंगमंचावर अंधूक प्रकाश..एका स्पॉट खाली मंद निळ्या प्रकाशात दोन पात्रांमध्ये जवळीक..स्मोक मशीनचा हलका आवाज अन् स्टेजवर धूर ..गंभीर प्रसंग सुरू आहे..दोघेही जीव ओतून अभिनय करतायेत..त्यांच्या डोळ्यात पाणी..प्रेक्षकांचेही डोळे आता पाणावलेले आहेत..प्रेक्षागृहात शांतता..नट काहीतरी बोलणार इतक्यात अचानक मोबाईलची रिंग वाजते..सगळेच थबकतात…आणि नटाऐवजी तो ‘एक प्रेक्षक’ मोबाईल सायलेंट करायचा सोडून (आधी मोबाईल बंद करायची विनंती करूनही) फोनवर बोलायला सुरुवात करतो. रसभंग..काही प्रेक्षक ‘पच’ करून नाराजी दर्शवतात तर काही प्रेक्षक आणि स्टेजवरील,बॅकस्टेजचे कलाकार मनोमन शिवी हासडतात.शेवटी कसंबसं त्या एका प्रेक्षकाच्या महत्त्वपूर्ण डायलॉगनंतर नाटक सुरू राहातं आणि अखेर संपतंही. पण यात नक्की ‘नुकसान’ कुणाचं होतं? हा प्रश्न मला नेहमी पडतो. कलाकारांचं? प्रेक्षकांचं? त्या एका प्रेक्षकाचं? की एकूणातच त्या मेहनतीने उभ्या केलेल्या कलाकृतीचं?

खरंतर नुकसान या सगळ्यांचं आहेच पण ज्या प्रेक्षकामुळे रसभंग होतो त्याच्यातल्या आणि त्याच्यासारख्या अनेकांच्या आत असलेल्या ‘प्रेक्षकाचं’नुकसानही मोठं आहे.. सिनेमागृह,नाटक,होमथिएटर,टीव्ही किंवा मोबाईल काय.. जर आपण प्रेक्षकाच्या खुर्चीत बसून त्या कलाकृतीचा (बरा-वाईट)आस्वादच घेतला नाही तर काय उपयोग? भरघोस पगार कमवून,महागडं तिकीट काढून विकएंडला पॉपकॉर्न,पेप्सी,नाचोज् घेऊन सर्कस करत खुर्चीतआपण बसतो पण मूड फक्त टी.पी करण्याचा,कमेंट्स करण्याचा असतो. मग समोरची कलाकृती कोणतीही असो.

- Advertisement -

पण मुद्दा फक्त प्रत्यक्षपणे रसभंग करणार्‍या प्रेक्षकांपुरताच नसून प्रत्येकातील प्रेक्षकाचा आहे.उत्तमोत्तम भावनिक,संवेदनशील सिनेमे जे लोकचेहर्‍यावरची रेषही न हलवता बघू शकतात, त्यांचं मला नेहमी आश्चर्य वाटतं. मुळात व्यक्ती म्हणूनच नीरस,रूक्ष असल्यास गोष्ट वेगळी पण प्रेक्षकाच्या भूमिकेत असताना थोडं तरी समरस होणं गरजेचं आहे. प्रत्येक भाषेत,समाजात,क्षेत्रात असेही प्रेक्षक असतात जे केवळ समीक्षाच करतात. त्या लेखनाशी,कथेशी,पात्रांशी,नृत्याशी,संगीताशी,चित्रकलेशी नातं जोडण्याचा प्रयत्नच करत नाहीत. ते प्रेक्षकाच्या खुर्चीत बसून कलाकृती मागच्या,पात्रामागच्या व्यक्तीबद्दल आकस मनात सुरूवातीपासूनच ठेवून किंवा बघू काय केलंय ह्याने? ह्या अविर्भावात किंवा कलाकारावर असलेल्या प्रेमापोटी बघायला बसतात..शेवटी मग त्या गोष्टीतील विविध रस ते चाखूच शकत नाही. मग ते केवळ ‘बघणारे’च असतात. प्रेक्षक किंवा रसिक नाही.

उदाहरणार्थ (स्वत: तिकिट काढून) खुर्चीत बसून एखादा चित्रपट किंवा नाटक बघताना एखादी गोष्ट न पटल्यास,अतार्किक वाटल्यास तेच मुद्दे सतत डोक्यात घोळवत न ठेवता शांतपणे ती बघणं हा देखील पर्याय असूच शकतो. आणि एकदा(चा) चित्रपट,नाटक संपल्यावर तुम्ही तुमचे मत (तुमच्या विद्वान वर्तुळात)चर्चास्वरूपात ,कलहस्वरूपात,थट्टास्वरूपात किंवा निदर्शन स्वरूपात मांडण्यास हल्ली मोकळे असतात. मी आर्कीटेक्चरला मुंबईत आलो तेव्हा माझी दक्षिण भारतीय मैत्रीण होती तिने मला एकदा रशियन फेमस सिने दिग्दर्शक ‘तारकोस्की’चा एक सिनेमा सुचवला जो बर्‍यापैकी संथ होता पण सुंदरहोता आणि नंतर दुसरा सिनेमा दाखवला जो सुपरस्टार रजनीकांतचा होता. दोन्ही सिनेमे तिच्या आवडीचे होते ते तिने एन्जॉय केले होते. प्रेक्षक म्हणून तिचं मनोरंजन झालं होतं. मला दोन्ही चित्रपटांच्या काही पटणार्‍या न पटणार्‍या बाजू होत्या पण नंतर केवळ समीक्षा न करता बघितल्यावर त्यातील आनंद मला घेता आला. मी तरी माझ्या मित्र- मैत्रिणींशी,सिनिअर्सशी बोलताना हे प्रश्न नेहमी विचारतो की, एक प्रेक्षक म्हणून अमुक अमुक गोष्ट तुम्ही एन्जॉय केली का? .. त्या सीनला रडू आलं? …त्या वेळी छान वाटलं?

- Advertisement -

उत्तरं ग्रुपनुसार वेगवेगळी मिळतात.. असो! थोडक्यात आपल्यातील प्रेक्षकाला जिवंत ठेवणं महत्त्वाचं..नाहीतर नकळत आपण प्रेक्षक म्हणून मेलेल्यांच्या खुर्चीत तर बसत नाहीये ना? हे पडताळायला हवं!


– अभिषेक देशमुख (लेखक युवा अभिनेते आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -