घरमनोरंजन‘आरण्यक’ची खिल्ली उडवणार नाही ‘चला हवा येऊ द्या’तही थुकरटवाडी होणार गंभीर

‘आरण्यक’ची खिल्ली उडवणार नाही ‘चला हवा येऊ द्या’तही थुकरटवाडी होणार गंभीर

Subscribe

आज २१ आणि २२ नोव्हेंबर या दिवशी दाखवल्या जाणार्‍या ‘चला हवा येऊ द्या’ चा एपिसोड नेहमीपेक्षा थोडा वेगळा आहे. दरवेळी एखादा चित्रपट, नाटकातील कलाकारांना ‘हवा येऊ द्या’ मध्ये बोलावले जाते. त्यावेळी त्या नाटक किंवा सिनेमाची ‘हवा येऊ द्या’च्या कलाकारांकडून विनोदातून थट्टा, मस्करी केली जाते. नाटक, चित्रपटातले कलाकारही ही थट्टामस्करी एन्जॉय करून खिलाडूपणे घेतात. पण आज आणि उद्याच्या एपिसोड्समध्ये अशी थट्टा होणार नाही. त्याला कारणही तसेच आहे. काही दशकांपूर्वी रत्नाकर मतकरी लिखित, दिग्दर्शित ‘आरण्यक’ हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर आले होते. झी मराठीने त्याच कलाकारांना घेऊन या नाटकाची पुन्हा निर्मिती केलेली आहे. महाभारताचा संदर्भ या नाटकाला आहे.

रवी पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, प्रतिभा मतकरी यांच्यासोबत नकुल घाणेकर, अतुल महाजन, विक्रम गायकवाड, मिनल परांजपे या कलाकारांचा या नाटकात सहभाग आहे. झी मराठीची ही निर्मिती असल्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये ‘आरण्यक’मधील कलाकार मंडळी कधी येणार, ही प्रेक्षकांची प्रतीक्षा होती. ती आता संपलेली आहे. बर्‍याच वेळा नाटकाचा विषय आणि त्यातील पात्रे लक्षात घेऊन थुकरटवाडीतला विनोदी गोंधळ सादर केला जातो, पण यंदा मात्र ‘चला हवा येऊ द्या’मध्ये ‘नो कमेंट्स’ असं काहीसं चित्र ‘आरण्यक’च्या निमित्ताने दिसणार आहे. या नाटकातील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘आरण्यक’ या नाटकाचे प्रमोशन केले जाणार आहे. यातल्या मुख्य कलाकारांशी गप्पा आणि सोबतीला नाट्यप्रसंग असे काहीसे त्याचे स्वरुप असणार आहे. बहुधा फारशी खिल्ली न उडवता साध्या सरळ विनोदात नाटकाचे गांभीर्य लक्षात घेऊन सादर केला गेलेला हा रिअ‍ॅलिटी शो असणार आहे.

- Advertisement -

मात्र, झी मराठीची निर्मिती असलेल्या या नाटकासाठी ‘चला हवा येऊ द्या’ने वेगळा नियम का लावला? इतर नाटकांची खिल्ली उडवताना त्यातील गांभीर्य कमी होत नाही का? त्यावेळी ‘हवा येऊ द्या’ कडून इतर गंभीर नाटकांबाबत अशी काळजी का घेतली जात नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. ‘आरण्यक’च्या निमित्ताने थुकरटवाडीमधे थोडे गंभीर वातावरण तयार झालेले आहे. कलाकृतीच्या केलेल्या विडंबनातून कोणाच्या भावना दुखावल्या जातील? हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी आगरी समुदायावर केलेले विडंबन त्या समाजातील नेत्यांना काही आवडले नाही. त्यामुळे या शोमधले मुख्य कलाकार अभिनेता भाऊ कदम यांना माफी मागायला भाग पाडले होते. तसेच चॅनलवाल्यांनाही तो टिकात्मक प्रसंग काढायला भाग पाडले होते. त्यामुळे ‘हवा येऊ दे’ कडून आता जास्त काळजी घेतली जाणार आहे. एखाद्या विषय, विडंबनावरून समाज, संघटनेच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -