घरमनोरंजनडिजिटल माध्यमांमध्ये अभिनयास मोकळीक

डिजिटल माध्यमांमध्ये अभिनयास मोकळीक

Subscribe

‘राजी’ चित्रपटामध्ये सोज्वळ पाकिस्तानी गृहिणी मुनीराच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच ‘डॅमेज’ या वेबसीरिजमधून डिजिटल माध्यमात पदार्पण केले. या तिच्या वेबसीरिजला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यानिमित्ताने तिच्याशी तेजल गावडे यांनी केलेली बातचीत…

सोज्वळ भूमिकेनंतर तू डॅमेजमध्ये ग्रे शेड भूमिका करते आहेस, त्याबद्दल काय सांगशील?
वेगवेगळ्या भूमिका साकारायला प्रत्येक कलाकाराला आवडते. मुनीराच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप चांगली दाद मिळाली. या चित्रपटानंतर मी डॅमेज या वेबसीरिजमध्ये ग्रे शेड भूमिकेत पाहायला मिळते आहे. ग्रे शेड भूमिका मी पहिल्यांदाच करत आहे. त्यामुळे मी खूप उत्साही आहे. हंगामा प्लेसारखे मोठे व्यासपीठ मला मिळाले आहे. इतक्या मोठ्या व्यासपीठावरून तुम्ही मुख्य भूमिकेत प्रेक्षकांसमोर येता. तेव्हा त्याची मजा काही औरच असते. नेहमीच्या पठडीतल्या भूमिकेनंतर वेगळ्या भूमिकेत माझे चाहते व प्रेक्षक मला पाहणार आहेत याचा मला आनंद आहे.

- Advertisement -

तुझ्या ‘डॅमेज’मधील भूमिकेबद्दल सांग?
वेबसीरिजच्या शीर्षकाप्रमाणेच माझी भूमिका डॅमेज आहे. तसेच ही बोल्ड भूमिका आहे. मी लविनाचे पात्र साकारीत असून, तिच्या भूतकाळात घडलेल्या घटनेमुळे ती दुखावलेली आहे. ती सायको किलर आहे. ती लोकांना वेगवेगळ्या हत्यारांच्या माध्यमातून मारते. हे तुम्हाला वेबसीरिजच्या माध्यमातून समजेल. या सीरिजसाठी मी पहिल्यांदा स्मोकिंग केले, कोणाला तरी हातोड्याने मारले. माझ्यासाठी निगेटिव्ह पात्र साकारणे चॅलेंजिंग होते कारण ते लोकांना वास्तविक वाटले पाहिजे.

ग्रे शेड भूमिका स्वीकारताना तुझ्या मनावर दडपण आले का?
अजिबात नाही. याउलट मला खूप मजा आली. मी खूप बिंधास्त व बेधडक मुलगी आहे. त्यामुळे निगेटिव्ह भूमिका स्वीकारताना मला अजिबात दडपण आले नाही. मला कोणत्याही गोष्टींच्या दडपणापेक्षा मी त्याबाबत जास्त उत्सुक असते.

- Advertisement -

या वेबसीरिजसाठी तू चाळीस सिगरेट ओढल्यास, काय सांगशील?
मला सिगरेटच्या वासानेही मळमळते. माझ्या आसपास कोणी सिगरेट ओढत असेल तर मी लगेच त्या व्यक्तीला रागावते. अशावेळी मनोरूग्ण लविनाची भूमिका रंगवताना मलाच सिगरेट ओढणे भाग होते. सिगरेट पिणे भूमिकेचा अविभाज्य भाग असल्यामुळे मी तयार झाले. पण मला सिगरेट ओढायला जमत नव्हते. शूटिंगदरम्यान दिग्दर्शक सारखा ओरडत होता, इनहेल कर. सिगरेटचा धूर व्यवस्थित सोडणे मला जमत नव्हते. दिवसअखेरीला ते जमले. पण या फंद्यात एका दिवसात मी ४० सिगरेट प्यायली आणि माझा दूसऱ्या दिवशी घसा बसला. त्यामुळे जवळ जवळ दोन आठवडे मला बोलता येत नव्हते.

या वेबसीरिजचा तुझा अनुभव कसा होता?
कलाकारांना माध्यम कोणते आहे, त्याचा अजिबात फरक पडत नाही. कोणत्याही माध्यमात आम्ही तितकेच परिश्रम घेतो. मात्र या माध्यमांतून जास्तीत जास्त लोकांपर्यंत सहज पोहचतो. मला हे पात्र लोकांना वास्तविक वाटेल का याचे दडपण जास्त होते. कारण कुठेही अतिशयोक्ती वाटायला नको तसेच लोकांना ही भूमिका आवडली पाहिजे. माझा या वेबसीरिजचा अनुभव अप्रतिम होता.

डिजिटल प्लॅटफॉर्म बद्दल काय वाटते?
डिजिटल माध्यम खूप मोठे माध्यम आहे. इथे खूप स्वातंत्र्य असून या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता येते. आता सगळ्यांकडे मोबाईल व इंटरनेट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक डिजिटल माध्यमांचा वापर करताना दिसतात. इतक्या मोठ्या माध्यमाचा आपण अविभाज्य भाग आहोत याचा मला जास्त आनंद आहे. हंगामा प्लेदेखील डॅमेजमधून वेबसीरिजमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा सोने पे सुहागा आहे.

आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांग?
सत्यमेव जयते या हिंदी चित्रपटात मी काम केले आहे. त्याबद्दल आता काहीही सांगू शकत नाही.

– तेजल गावडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -