घरमनोरंजनराजेशाही राजकारणाचा रटाळपट

राजेशाही राजकारणाचा रटाळपट

Subscribe

‘साहेब बीवी और गँगस्टर’च्या रांगेतला हा तिसरा चित्रपटही अखेर आला. शेखर कपूर, केतन मेहताअशा दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केल्यावरही तिग्मांशू कमर्शियल सिक्वेलपटात अडकून पडल्याचा पुरेपूर परिणाम ‘साहेब बीवी और गँगस्टर’च्या तिसर्‍या रटाळपटातही दिसून येतो.

‘साहेब बीवी और गँगस्टर’च्या रांगेतला हा तिसरा चित्रपटही अखेर आला. शेखर कपूर, केतन मेहताअशा दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केल्यावरही तिग्मांशू कमर्शियल सिक्वेलपटात अडकून पडल्याचा पुरेपूर परिणाम ‘साहेब बीवी और गँगस्टर’च्या तिसर्‍या रटाळपटातही दिसून येतो. राजेशाही घराणी, राजकारण, त्यातले घात-प्रतिघात, डाव-प्रतिडाव ‘साहब बीवी…’ च्या पडद्यावर येतात.

नैतिकता, विश्वास, नातेसंबंध, कुटुंब, प्रेम, जिव्हाळा असलं काही पडद्यावर नसतं. आणि हे केवळ राजकीय महत्त्वाकांक्षा म्हणून सुरू असेल तर ते पटवून देणारी तेवढ्याच ताकदीची पटकथा आणि संवाद पडद्यावर साकारले जात नाहीत. इथंच हा खेळ फसतो. चित्रपटातली अगदी प्रत्येक व्यक्तिरेखा ही घातकी आहे. टोकाचा राजकीय स्वार्थ हे राजकारणाचं दुसरं नाव असल्याचं मानून चाललं तरी ते इतकं डोईजड होतं की त्यात ‘साहब बीवी…’ चा पडदा विस्कळीत प्रसंगांचा घातकी कथापट बनून जातो. चित्रपटाची सुरुवात चित्रांगदाच्या संवादांमुळे परिणामकारक होते. पण पटकथेत सातत्य नसल्यामुळे त्यापुढे तिग्मांशूची चित्रपटावरील पकड ढिली पडत जाते. जिमी शेरगील ‘साहेब बीवी…’च्या या तिसर्‍या पटांतही साहेब अदित्यप्रताप सिंग या राजेशाही घराण्यातील व्यक्तिरेखेत आहे. राजकारणात अनेक गुन्हे केल्यानंतर तो जेलमधून बाहेर येतो. तो जेलमध्ये असल्याच्या काळात त्याची पत्नी माधवी (माही गिल) त्याचा राजकारणातला पसारा सांभाळत असते. त्यांच्यात कुठलंही नातं नाही. केवळ तडजोड आहे. या तडजोडीला गरजेचं नाव देऊन दोघेही हवेलीत, बाहेरच्या जगात आपली राजकीय प्रतिमा जपण्यासाठी एकत्र राहतात. हीच स्थिती चित्रपटातील इतर राजेशाही घराण्यांची आहे. वारेमाप श्रीमंती, शोषणाला एन्जॉय करणार्‍या राजेशाही घराण्यातल्या महिला, विमनस्क स्थितीतली माणसं, असं सगळं येतं. पण हा पट मात्र पटकथेत पुरता विस्कळीत झालाय.

- Advertisement -

युरोपमध्ये जुगाराचा क्लब चालवणारा युवराज (संजय दत्त) हा महाराजा हरीसिंगच्या राजघराण्यातला मोठा मुलगा. तर दिपक तिजोरीने साकारलेला धाकटा मुलगा हे दुसरं राजेशाही घराणं. राजेशाही घराण्यात असतानाही संजय दत्त लंडनमध्ये जुगाराचा क्लब का चालवतो हे पडद्यावर उमगत नाही. दोन राजघराण्यांतल्या संघर्षाचा सरधोपट मार्ग टाळण्याच्या प्रयत्नात कथेची मोडतोड झाल्याचे पडदाभर जाणवते. माही गिलनं साकारलेली माधवी अल्कोहोलीक आहे. तिच्यात टोकाची राजकीय महत्त्वाकांक्षा असल्यानं ती प्रसंगी लैंगिक तडजोडीवरही उतरते. यामागे राजघराण्यातल्या महिलांच्या लैंगिक इच्छांचं दमन हे समोर न येणारं दुसरं कारण आहे. राजकीय सत्ता मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेसाठी ती युवराजला नवर्‍याची हत्या करायला सुचवते. इथं त्यांच्यात राजकीय, आर्थिक व्यवहार होतो. त्यासाठी एक जीवघेणा खेळ खेळला जातो. हा खेळ पडद्यावर पाहायला हवा. प्रत्येक व्यक्तिरेखा आतून उद्ध्वस्त झालेली आहे. त्यांच्या जगण्याची कारणे केवळ राजकीय आहेत. समाजातील लोक आणि प्रसारमाध्यमांमध्ये आपली प्रतिमा आणि राजकीय इभ्रत जपण्याची भीती इथं प्रत्येकाला आहे. पण ही राजकीय महत्त्वाकांक्षा टोकदार होत नाही. चित्रपटाला वेग नसल्याने तो पुरता फसला आहे.

पैसा, संपत्ती, राजेशाही घराणी, राजकारणाच्या या जगात माणसांचं जगणं हरवून जातं आणि महिलांचं जगणं सोयीनुसार वापरलं जातं. हे हरवलेलं जगणं शोधण्याची कुणालाच गरज पडत नाही. त्यामुळे पडद्यावर जे काही डावपेच एकमेकांना संपवण्यासाठी केले जातात, त्याची कारणं समोर येत नाहीत. राजकुमार हिरानीचा बायोपीक संजूनं बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवल्यानंतर संजय दत्तचा हा अभिनेता म्हणून पहिलाच चित्रपट. पण संजय दत्तच्या कथित कथानकाचा बायोपीक आणि अभिनेता संजय दत्त यातलं अंतर थोडंही कमी झालेलं नाही. त्याच्या भाईगिरीटाईप चित्रपटांत ‘साहब बीवी…’ची भर पडली इतकंच. सोहा अली खान राजघराण्यातल्या पुरुषी व्यवहाराची सुरुवातीलाच बळी ठरल्याने तिला पुढे पडद्यावर काहीच काम नाही. चित्रांगदा रोमँटीक प्रसंग आणि गाण्यापुरती आहे.

- Advertisement -

संवेदनशीलता करून डोळ्यांतून उभं करण्यात माही गिलने यश मिळवलंय. तर तेच कारुण्य हत्यार म्हणून वापरताना मनातली विखारी महत्त्वाकांक्षाही तिने उभी केली आहे. तर त्याच सोशिकतेला लैंगिक गरजेचं परिमाण देतानाही देहबोलीत झालेले बदल तिने अभिनयातून समोर आणले आहेत. थोडक्यात साहेब (जिमी शेरगील), गँगस्टर (संजय दत्त) यांच्यातल्या राजकीय स्पर्धेच्या या चित्रपटांत साहेब आणि गँगस्टरपेक्षा बीवी म्हणजेच माही गिलनं बाजी मारलीय.
——————–

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -