घरमुंबईटीबी रुग्णांचा देवदूत

टीबी रुग्णांचा देवदूत

Subscribe

टीबीचे नाव जरी घेतले, तरी अनेकांच्या छातीत धस्स होते. टीबी झाल्याचे समजले तर समाज स्वीकारेल का? या भितीने मुंबईकर घाबरतात. या परिस्थितीला डॉक्टर तरी कसे अपवाद असतील? टीबी हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या डॉक्टरांचीही परिस्थिती सामान्यांपेक्षा वेगळी नाही.

टीबीचे नाव जरी घेतले, तरी अनेकांच्या छातीत धस्स होते. टीबी झाल्याचे समजले तर समाज स्वीकारेल का? या भितीने मुंबईकर घाबरतात. या परिस्थितीला डॉक्टर तरी कसे अपवाद असतील? टीबी हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या डॉक्टरांचीही परिस्थिती सामान्यांपेक्षा वेगळी नाही. पण समाजात आजही अशी माणसे आहेत जे टीबी पेशंट्ससाठी मनापासून काम करतात. त्यातीलच एक नाव म्हणजे डॉ. श्रीकृष्ण जोशी. ७४ वर्षीय भूलतज्ज्ञ डॉ. जोशी हे टीबीला अजिबात घाबरत नाहीत. डॉ. जोशी आजही टीबी हॉस्पिटलमध्ये जातात. टीबी पेशंट्सची विचारपूस करतात. एवढेच नाही, तर शस्त्रक्रियेदरम्यान भूल देण्याचे महत्त्वाचे कामही ते आनंदाने करतात. जवळपास ७ ते ८ तासांच्या एका शस्त्रक्रियेला डॉ. जोशी हजर राहतात. शस्त्रक्रियेवेळी टीबी पेशंट्सचा सर्वात जास्त डॉक्टरांशी संपर्क येतो. त्यामुळे टीबी होण्याची शक्यता टाळता येत नाही, असेही हॉस्पिटलचे डॉक्टर सांगतात.

टीबीसाठी शस्त्रक्रिया उत्तम पर्याय

टीबी हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्‍या पेशंटला अनेकदा टीबी पूर्णपणे शरीरातून काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. या शस्त्रक्रियेत फक्त एका फुफ्फुसावर शस्त्रक्रिया केली जाते. ज्या फुफ्फुसात पू जमा होतो, त्याला भूल दिली जाते आणि एक फुफ्फुस सुरू ठेऊन शस्त्रक्रिया केली जाते. टीबी पेशंटला शस्त्रक्रियेदरम्यान भूल देण्याचे काम डॉ. जोशी करतात. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास फुफ्फुस म्हणजे आपल्या शरीरातील एक पातळ थर. त्याची तुलना कदाचित आपण एका कोर्‍या कागदासारखी करू शकतो आणि हा कोरा कागद जर पाण्यात भिजवला तर त्याला टीबीचे स्वरुप प्राप्त होते. या पातळ थरातून टीबीची शस्त्रक्रिया करायची आणि त्यासाठी भूल द्यायची यासाठी अनुभवी व्यक्तीचीच गरज असते. शिवाय, राज्यात डॉक्टरांची कमतरता असल्या कारणाने कोणताच डॉक्टर सहजासहजी टीबी रुग्णांसाठी काम करायला तयार होत नाही. त्यामुळे डॉ. जोशी टीबी रुग्णालयांत दर शुक्रवारी भूल देण्यासाठी दाखल होतात. टीबीवर शस्त्रक्रिया केली तर एखाद्याला आयुष्यभरासाठी टीबीमुक्त जीवन जगता येऊ शकते, असेही डॉ. जोशी यांनी आपलं महानगर शी बोलताना सांगितले.

- Advertisement -

टीबीच्या वाढत्या प्रसारामुळे मुंबईतील टीबी हॉस्पिटलमध्ये २००६ ते २०१२ या काळात कुठल्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या नाहीत. पण, २०१२ नंतर टीबी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया सुरू झाल्या. दर शुक्रवारी या हॉस्पिटलमध्ये एकच शस्त्रक्रिया केली जाते. ज्यासाठी ७ ते ८ तास लागतात. आतापर्यंत जवळपास हॉस्पिटलमध्ये ३५० शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

डॉक्टरांसह कर्मचार्‍यांनाही टीबीची भीती

प्रतिकारशक्ती थोडीतरी कमी झाली तरी लगेचच टीबी होण्याची शक्यता असते. आतापर्यंत टीबी रुग्णालयातील १० ते १२ जणांना टीबी झाला आहे. तर, २०१५ पर्यंत मुंबईच्या पालिका रुग्णालय केईएम, सायन, नायर आणि राज्य सरकारद्वारे संचालित जे. जे रुग्णालयातील एकूण ४२ निवासी डॉक्टरांना टीबी झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

टीबीमुक्तीचे केंद्रासमोर मोठे आव्हान

आधी डॉक्टरांसह कर्मचार्‍यांनाही पोषण आहार दिला जायचा. पण आता तोही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण आहे. टीबी झाला की नातेवाईक रुग्णांना रुग्णालयातच सोडून जातात आणि तो बरा झाला तरी त्याला पुन्हा घ्यायला येत नाही. तो रुग्ण तसाच खितपत पडतो. पण, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललित आनंदे हे अशा रुग्णांसाठी पुढाकार घेतात, असेही डॉ. जोशी सांगतात.

कसा होतो टीबी ?

टीबी म्हणजे क्षयरोग. हा संसर्गजन्य आहे. अन्य संसर्गजन्य रोगांमध्ये रुग्ण खोकला की बाहेर पडलेले जंतू जमिनीवर पडतात. जमीन साफ केली की ते मरतात. पण, टीबीमध्ये तसं होत नाही. खोकल्यावर बाहेर पडणारे टीबीचे जंतू हवेतच राहतात आणि सगळीकडे पसरू लागतात. यामुळे अन्य रोगांच्या तुलनेत हा रोग अधिक प्रमाणात पसरतो. त्यामुळे खोकताना, शिंकताना तोंडावर हात ठेवणं आवश्यक आहे असा सल्ला शिवडी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललित आनंदे यांनी आपलं महानगर’ला दिली.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -