घरफिचर्सकोकण नैसर्गिक र्‍हासाकडे

कोकण नैसर्गिक र्‍हासाकडे

Subscribe

जमिनीचा व्यवहार करणारे दलाल, राजकारणी यांचा कोकणात हैदोस सुरू आहे. शासनही कोकणाला कुठल्याही खिजगणतीत ठेवत नाही. फक्त जमिनी-खाड्या दूषित करणारे प्रकल्प आणायचे. समुद्री किनारे संपविणारे बंदर प्रकल्प, उर्जा प्रकल्प, प्रस्तावित केले जात आहेत. कुंडिलका, सावित्री, वशिष्ठी आदी नद्यांची गटारेच केली आहेत. परिसरातील प्रदुषणकारी उद्योगामुळे श्वास घेणेही मुश्किल झाले आहे.

ज्याला कोकणातील जांभ्या दगडाच्या सड्याचं सौंदर्य दिसते-समजते तोच खरा निसर्गप्रेमी अशी पर्यावरणवाद्यांनी व्याख्या केली तर त्यात काही अतिशयोक्ती नाही. सह्याद्रीच्या पायथ्यापासून ते समुद्र किनार्‍यापर्यंत पसलेले जांभ्या दगडाचे सडे (पठार) हेच कोकणाचं अस्तित्व खरे स्वरूप. क्षितिजाला जाऊन भिडणारे असंख्य सजीवांचे आश्रयस्थान म्हणजे हे सडे. जांभ्या दगडाची पठारे ही नापिकी , जर म्हणून सरकार दरबारी नोंदली केली आहेत. हा खरेतर यांच्यावर अन्याय आहे. आजच्या मितीला पृथ्वीच्या पाठीवर केवळ दोन भागांत अशा प्रकारचे भूशास्त्रीय दगड आढळतात.

त्यातील एक कोकणात. नाही म्हणायला घाटावर ही माथेरान, महाबळेश्वर कास पठार आदी भागातही हे आहेत, त्यांना प्राथमिक जांभ्या दगडाची पठारे म्हणतात. प्राथमिक म्हणजे ज्यात एक स्तरास लागूनच खाली-खाली जसे जातो तसे संबंधित स्तर मिळतात. घाटावरच्या जांभ्या दगडाच्या खाली मुरूम, कडक मुरुम, लालसर दगडानंतर हळूहळू काळा-बेसाल्ट दगड मिटतो. हा एकाच दगडाचा भाग आहे. मात्र कोकणात असे नाही हा सेकंडरी किंवा ‘द्वितीय’ दर्जाचा जांभा आहे. या जांभ्याखाली चिखल लागतो, पुन्हा जांभा, पुन्हा चिखल आणि असे करत एकदम काळा दगड बेसाल्ट लागतो. ज्याचा वरच्या स्तराशी काहीही संबंध नाही.याचे कारण लाखो वर्ष मागे गेल्यावर मिळते. जेव्हा आफ्रिकेपासून भारतीय उपखंडाचा तुकडा विलग होऊन उत्तरेेकडे सरकत होता, त्यावेळी विषववृत्तीय प्रदेशातून अती पावसाच्या प्रदेशातून जात होता. विरघळणारे क्षार दगडाला पातळ बनवित होते. पाण्यात न विरघळणारे लोह व मॅग्नेशिअम इ. घाटावर उरले.

- Advertisement -

तोच जांभा खडक. नंतर सलग तुकड्या-तुकड्याने घाटाचे जांभे खडक खाली कोसळले. त्यावेळी समुद्रपातळी उंच होती. खाली जमा होत जाणारे जांभा खडक, वर साचलेली माती, परत मातीवर येऊन जमा होणारे जांभा खडक… समुद्री पाण्याचा दबाव यामुळे एक ‘युनिक’ अशी खडक संरचना निर्माण झाली. पुढे समुद्र पातळी कमी झाल्यावर ही खडक संरचना उघडी पडली. जांभा हा खराखुरा दगड कारण त्यातून काही विरघळत नाही. इर्नट, कुठलीही प्रक्रिया न करणारा. या खडकावर, खडकांमधल्या खड्ड्यांत माती साचून-मातीवर एक वेगळीच जीव संस्था आकार घेत होती. फॉल्ट लाईनवर निर्माण झालेल्या खाड्या, खाड्यांची अन्य प्रवाहे, बेटे यांनी कोकणाला बहरून टाकले.

सड्यावरची म्हणजेच जांभ्या दगडावरची जैवविविधता कुठल्याही जंगलापेक्षा कमी नाही. युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेले कासचे पठार हे जांभा दगडाचे पठारच आहे. त्यावरील फुलोरा पहायला तुफान गर्दी होते. त्याच प्रकारचे कोकणातील सडे आहेत. डॉ. आपेट, तैताली, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संसोधक डॉ.स्वप्ना प्रभू आरी, कोल्हापूरच्या विद्यापीठातील डॉ. यादव आणि अन्य संशोधक यांनी कोकणातील पठाराचा अभ्यास केला आहे. या पठारांचे संरक्षण करण्याचेही सुचविले आहे.खाड्यांच्या मूळ प्रवाहापासून फारकत घेतलेले प्रवाह आत घुसलेले असतात. त्यांच्या किनार्‍याने कांदळवने उभी राहिलेली असतात. सात किनार्‍यावरील खडकात कालवं, शिपल्या, मुळ्ये, खेकडे आदी स्थानिक गावातील स्त्रिया जमा करतात. हे घरासाठी तसेच छोट्या बाजारात विकण्यासाठी असते. लहान-लहान बोटी घेऊन खाडीतील मासेही असेच स्वतःसाठी आणि स्थानिक बाजारासाठी पकडले जातात.

- Advertisement -

पर्ससिन नेट, जिशींग आदी मोठ्या प्रमाणातील मासेमारी गेल्या काही वर्षांत वाढीस लागली आहे. पैसा खोर्‍याने देणारा हा व्यवसाय समुद्री जीवांचा कर्दनकाळ ठरला आहे. समुद्राचा तळ खरखडून काढत, मार्केट अर्थव्यवस्थेसाठी उत्पादने पुरवीत आताची मासेमारी फोफावत आहे. पारंपारिक मच्छीमारांची स्थिती दयनीय आहे. सर्वच लहान-मोठे मासे मोठ्या यांत्रिक बोटींनी गिळंकृत केल्याने पारंपारिक मच्छीमारांना काही मिळेनासे झाले आहे. शासनाने आता पर्स इन नेटवर बंधने आणली आहेत. मात्र, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आजही बंधने सर्रास तोडली जातात.

ताडाची वने, उंडीक, भेंड आदी झाडांनी बहरलेली कांदळवनाचे किनारे, ठिकठिकाणी खाजणे, स्वैर समुद्र किनारे, समुद्रात घुसलेले कातळाचे डोंगर, दगडी किनारे, जागोजागी सजीवांच्या वसाहतीत रमणारा निसर्ग आता मानवाच्या अती हव्यासामुळे धोक्यात आलेला आहे. विस्तीर्ण समुद्र किनारा शाप ठरू लागला आहे. कातळाची जून ते ऑक्टोबर महिन्यात, रेन फॉरेस्टनाही लाजवणारी, मागे टाकणारी, बहरणारी जैवविविधता नापिकी म्हणून हिणवली जात आहे. कमी असणारी लोकसंख्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, राजापूर रिफायनरीसारख्या विनाशकारी प्रकल्पांनी देत व्यापून टाकली आहेत. लांब-लांब असणार्‍या वाड्या, प्रवासाची कमी साधने यामुळे संघर्षात जनता मागे राहात आहे. जमिनीचा व्यवहार करणारे दलाल, राजकारणी यांचा कोकणात हैदोस सुरू आहे. शासनही कोकणाला कुठल्याही शिजगणतीत ठेवत नाही, फक्त जमिनी-खाड्या दूषित करणारे प्रकल्प आणायचे. समुद्री किनारे संपविणारे बंदर प्रकल्प, उर्जा प्रकल्प, प्रस्तावित केले जात आहेत. कुंडिलका, सावित्रा, वशिष्ठी आदी नद्यांची गटारेच केली आहेत. परिसरातील प्रदुषणकारी उद्योगामुळे श्वास घेणेही मुश्किल झाले आहे.

कोकणात मोठ्या प्रमाणावर असेलला पण मागास राहिलेला कुणबी समाज, चाकरमनी, मनी ऑर्डर इकॉनॉमी, दारूचे व्यसन, बाबा-बुवांच्या बैठका, प्रस्तावित विनाशकारी प्रकल्प, हायवेचे चौपदरीकरण, गावागावांतील गलिच्छ राजकारण यात कोकणाच्या शासन, राजकारण्यांचा विरोध पत्करून नेटाने कोकण वाचविण्याचे, विनाशकारी प्रकल्प थांबविण्याचे काम कोकणी माणूस नेटाने करीत आहे. कोकणात काही अपवाद वगळता असलेली राजकीय पोकळीही जनतेचा आवाज शासन व्यवस्थेपर्यंत पोहचू शकत नाही. मुंबई-पुण्याकडून झिरपलेला भोगवाद, चंगळवाद आणि कमालीची स्वार्थी वृत्ती गावाचे निर्मल जीवन नष्ट करू पाहात आहे. निसर्ग हा आपला साथी आहे. त्याचा आदर करून जीवनशैली बनवायचे जुने सूत्र जास्तीत जास्त ओरबाडणे शासनाकडून- जनतेचा स्वभावधर्म बनला आहे. कोकणात आत्महत्या नाहीत याचे गोडवे सोशल मीडिया वर गायले जात आहेत. पण कोकणाच्या निसर्गाची हत्या होत आहे त्याकडे कोणाचेच लक्ष नाही.

जांभ्या पठाराची जैवविविधता थोडक्यात

गवत-फुलांच्या ७० हून अधिक प्रजाती
झुड्यांच्या-करवंद आदीच्या शेकडो जाती
किटकांच्या शेकडो जाती
भेकर, रानडुक्कर, बिबटे, खवले मांजर, साळींदर, कोल्हे, तरस, उदमांजर आदींची रेलचेल
२०० हून अधिक पक्षी
बेडूक, सरडे, साप आणि अन्य सरपटणारे प्राणी
परिसरात घरे, मानवी जीवन असूनही नैसर्गिक परिसंस्था योग्य राखण्यात कोकणाला बर्‍यापैकी यश आले होते. स्थानिक आधारित जगणार्‍यांना ‘शहरी’ लोक गरीब म्हणू शकतात. पण आनंदाने किंवा इतरांच्यादृष्टीने अल्पसंतुष्टीचे जीवन ते आतापर्यंत जगत आले आहेत. ‘रिमोर्स रिच बट मनी पुअर’ संसाधनाने श्रीमंत पण पैशाने गरीब अशी व्याख्या कोकणाची केली जाते.

जांभ्या दगड spamay/poras असल्याने त्यातून पाणी रोखून खालील गावांतील विहिरींना पाण्याचा पुरवठा होतो. रत्नागिरी जिल्हा ‘बागायती’ चा जिल्हा घोषित झाल्यावर अनेक जमिनदारांनी जांभा कातळावर खड्डे करून आंबा-काजू बागायतीची लागवड केली आहे. खाजी समुद्र किनारची हवा दमटपणा आदी बागायतीसाठी फायदेशीर ठरल्या आहेत.
कातळाच्या उतारावर असणार्‍या मातीच्या थरावर घनदाट जंगले कोकणात आढळतात. काही ठिकाणी जंगले तोडून आंबा-काजूच्या बागाही लावलेल्या आहेत. ही वैयक्तिक जंगले, बहुधा जंगल विभागाच्या नोंदीत नसतात. त्यामुळे या भागात जंगल नाही, असे कुठलाही प्रकल्प आणणार्‍या कंपन्या बिनदिक्कत म्हणतात.
जसे उतारावरून थोड्याशा मैदानी भागात उतरलो की भात-शेतीची खाचर असतात. पावसात नैसर्गिक पाणी प्रवाहावर भात शेती, त्यानंतर वरी, नाचणी वरी, कुलिथ आदी पिके आणि भाज्या मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. चिर्‍याची कौलारु घरे सुटसुटीत-एैसपैस, अंगणात चिकू, पेरू, कोकम, फणस, जाम आदी फळ झाडांची लागवड असते.


-सत्यजित चव्हाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -