“खळी”जी गालावरही पडते अनं हृदयातही जडते!

आतापर्यंत खळी हा शब्द म्हटले की, गालावरची खळी आठवत होती. आता शब्द एका नाटकासाठी ओळखला जाणार आहे. याचे कारण लवकरच म्हणजे येत्या १५ डिसेंबरला ‘खळी’ नावाचे एक नवे मराठी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

खळी नाटक

हे नाटक एकूण तीन पात्रांचे असून लग्नासारख्या एका सामाजिक विषयावर भाष्य करणारा परंतु, हलक्या फुलक्या मनोरंजनाचे एक कौटुंबीक नाटक असणार आहे. अनेक प्रायोगिक नाटकांमध्ये आणि मराठी-हिंदी मालिका व चित्रपटांमध्येही काम केलेला, तसेच डोंबिवली फास्ट नावाच्या चित्रपटातून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची खास छाप पाडणारा अभिनेता संदेश जाधव या नाटकात भावाची मुख्य भुमिका करतोय. तर सर्वांना कॅडबरी चॉकलेटच्या अ‍ॅडमध्ये काम केल्यामुळे कॅडबरी गर्ल म्हणून ओळख असलेली आणि इतरही अनेक चित्रपटातील भुमिकेमुळे परिचित असलेली पल्लवी सुभाष ही या नाटकात एका ब्युटीशीयनची भुमिका साकारत आहे. तसेच या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रायोगिक नाटक करणारी नेहा अष्टपुत्रे यात बहिणीची भुमिका साकारताना दिसणार आहे.

एक पस्तीशी पार केलेला आणि घरच्या काही जबाबदार्‍यांमुळे लग्न करू न शकलेला मानव नावाचा भाऊ, त्याच्या चींगी नावाच्या बहिणीचे तिच्या सावळ्या रंगामुळे लग्न न होऊ शकल्यामुळे तिला आलेला न्युनगंड घालवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना दाखवलेला आहे. बहिणीला तिच्या सावळेपणामुळे आलेला न्युनगंड घालवण्याठी तो तिला उपासना नावाच्या ब्युटीशियनकडे घेऊन जातो. ती ब्युटीशियन सुद्धा तिच्या काही ठराविक अटींमुळे अविवाहीत असते. या नाटकातील भाऊ हा खूप पॉझिटिव्ह विचार करणारा असतो. काहीतरी चांगले होणार असा त्याचा सतत प्रयत्न असतो.

त्याची ती पॉझिटिव्ह विचारसरणी आणि बहिणीसाठी सुरू असलेली धावपळ बघून मनाने तशी कठोर असलेली ब्युटीशियनही त्याच्या प्रेमात कशी पडते अशी या नाटकाची काहीशी कथा आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन शिरीष लाटकर यांनी केले असून निर्मिती संध्या रोठे, प्रांजली मते आणि मंदार शिंदे यांची आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यासाठी नाटकात गाण्याचाही वापर करण्यात आला आहे. केतन पटवर्धन आणि स्वरांजली मराठे यांनी या नाटकासाठी खास गाणे गायले आहे. त्यामुळे हे नाटक म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरेल यात शंकाच नाही.