घरमनोरंजन'मोहन जोशी' यांना यंदाचा झी नाट्य गौरव २०२४ 'जीवन गौरव' पुरस्कार जाहीर...

‘मोहन जोशी’ यांना यंदाचा झी नाट्य गौरव २०२४ ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर !

Subscribe

मराठी नाट्यसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी नाट्य गौरव २०२४ पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. या सोहोळ्याचे खास आकर्षण ठरलं ते कलाकारांसमवेत नांदीने झालेली सुरुवात आणि यंदाच्या ‘झी नाट्य गौरव २०२४’ जीवन गौरव पुरस्काराचे मानकर ठरले ते म्हणजे जेष्ठ अभिनेते ‘मोहन जोशी’. आज हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रात अनेक दिग्गज मराठी कलावंत आहेत. पण बालनाट्य, एकांकिका, प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक अशी साधना करून हिंदी-मराठीत स्थिरावलेले काही मोजके कलावंत आहेत. त्यातलंच एक हुकमी नाव म्हणजे मोहन जोशी.

१२ जुलै १९५३ ला बंगळुरुला जन्म झाल्यानंतर तुमचं बालपण पुण्यात गेलं. फाटक वाड्यातला खट्याळ मुलगा म्हणून तुम्ही लवकरच प्रसिद्ध झालात. गल्लीत भाजीवाला आणि दहीवाल्याचा आवाज यायचा तेव्हा पुणेकर मंडळी अपेक्षेने दाराखिडक्यात यायचे. तेव्हा या आवाजाची नक्कल काढणारा ‘खट्याळ मोहन’ फिदीफिदी हसायचा. एकदा मंडळाला होळीला जेव्हा गव-या मिळत नव्हत्या तेव्हा खत्रुड शेजा-यांच्या अंगणातून आईची साडी घालून बेमालुमपणे याच ‘खट्याळ मोहन’ने गव-या उडवल्या आणि मंडळाचा होळीचा प्रश्न मिटवला. अभ्यासात ठिकठाक आणि खोड्या उदंड. पालक सहसा नकला आणि खोड्यांनी त्रस्त होतात. पण मोहनच्या वडीलांनी त्याला ‘भरत नाट्यमंदिर’मध्ये रंगभूषाकार ‘बाबा साठे’ ह्यांच्या हवाली केलं.

- Advertisement -

नेमकं तेव्हाच एका बालनाट्यातला प्रमुख कलाकार अभ्यासाचं कारण देऊन नाटक सोडून गेला होता. एकाने अभ्यास करायला रंगभूमी सोडली. आणि मोहनने अभ्यासापासून पळून जायला रंगभूमीवर पाऊल ठेवलं. पुढे १२ वर्ष बाल नाटकांचा सपाटा सुरू राहिला. जंगलातील वेताळ, गाणारा मुलुख, बुडत्याचा पाय खोलात, इकडम तिकडम विजयी विक्रम, राजकन्या नेत्रादेवी. मजलदरमजल करत कॉलेज गाठलं. बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स BMCC. कॉलेजमध्ये डिअर पिनाक, काका किशाचा, तीन चोक तेरा, पेटली आहे मशाल अशा अनेक नाटकांतून भुमिका गाजल्या. दौ-यावर असतांना तुम्ही कंपनीत पत्र पाठवीत. एका गावावरून – आजी आजारी आहे. सबब दोन दिवस रजेवर आहे. आणि पुढच्या गावावरून दौ-याला – आजी वारली. सबब तेरा दिवस रजेवर आहे’ मग असे असंख्य दौरे आणि अगणित आज्या वारल्यावर कंपनीने तुम्हाला नाटक आणि कंपनी ह्यात निवड करायला सांगितली.

आता घरच्या कॅलेंडरवर नाटकाच्या तारखा लिहल्या जायच्या. समंजस ज्योती तारखांच्या हिशोबाने खर्चाचा ताळमेळ बसवे.
परिवार वाढत होता. त्यामुळे आर्थिक स्थैर्यासाठी तुम्ही ट्रान्सपोर्ट लाईन सुरु केली. गाडी नंबर २७३०. बेळगाव , हुबळी , धारवाड , सत्तुर, शिरसी, बॅंग्लोर म्हैसूर, कलकत्ता हैद्राबाद सिंकदराबाद देवास नागपूर. ८ वर्ष. या आठ वर्षांनी तुम्हाला असंख्य अनुभव, अनेक वाटा, अगणित खड्डे दाखवले.

- Advertisement -

वाहतूक व्यवसाय बंद करून मुंबईला येणं हा मोठा निर्णय होता. सुरवातीच्या काळात मुंबईतला पत्ता सांगतांना ‘प्रभादेवीला रविंद्रनावाचा बंगला आहे’ असं तुम्ही सांगायचा. पण हा बंगला म्हणजे ‘रविंद्र नाट्य मंदिर’ हे अनेकांना माहिती नव्हतं. कोप-यावरचा पब्लिक फोन हाच तुमचा खाजगी दिवाणखान्यातला फोन. मुंबईबद्दलच्या एक अनामिक भितीने हळुहळु मुंबईच्या प्रेमात रुपांतर होत गेलं.

शरद तळवळकर, बाबूराव गोखले, यशवंत दत्त, मधुकर (मामा) तोरडमल अशी एक एक दिग्गज मंडळीच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही रंगभूमी गाजवु लागलात. थॅंक्यु मिस्टर ग्लाड, तरुण तुर्क म्हातारे अर्क, गुड बाय डॉक्टर, नाती गोती, रायगडाला जेव्हा जाग येते, श्री तशी सौ, कुर्यात सदा टिंगलम, पुरुष, ती फुलराणी, मी रेवती देशपांडे , माझं छान चाललंय, कार्टी काळजात घुसली… अशी पन्नासपेक्षा अधिक नाटके गाजवलीत. गाढवाचं लग्नने तर अक्षरश: धुमाकूळ घातला. नाटकानंतर मालिका, मराठी – हिंदी चित्रपटसृष्टीत तुम्ही हक्काचे ‘मोजो’ झालात.

पण रंगभूमीशी तुमचं नातं नाट्य परिषदेच्या रुपाने म्हणा किंवा अगदी आत्ता आत्ता ‘नटसम्राट’ , ‘सुमी आणि आम्ही’ अशा नाटकांच्या माध्यमातून म्हणा तुम्ही घट्ट ठेवलं. तुमच्या रंगभूमीवरच्या योगदानासाठी तुम्हाला संगीत नाटक अकादमी पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार अशी अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. मराठी रंगभूमीवरचे तुमचे स्थान अढळ आहे.


हेही वाचा :

साखरपुड्याच्या निमित्ताने निशी, नीरज आणि मेघनाच्या नात्यामध्ये पुन्हा गोडवा येईल?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -