घरफिचर्सआर्थिक संकटे आणि धोक्याचे बावटे

आर्थिक संकटे आणि धोक्याचे बावटे

Subscribe

विश्लेषण आर्थिक संकटांवरचे असो की आर्थिक स्थितीवरचे असो, त्यात नकारात्मकता आणि सावधगिरीचे इशारे उमटतात, कारण पैसा आणि सावधगिरी हे एक समीकरण आहे. अर्थविषयक लेखनात या समीकरणाचे प्रतिबिंब उमटणे साहजिकच म्हणावे लागेल.

आपत्ती नैसर्गिक असो की मानवनिर्मित, तिने घडविलेले नुकसान मोठे असेल तर त्याची चर्चा वर्षानुवर्षे होत राहाते. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अमेरिकेतल्या २००८ च्या आर्थिक ‘भूकंपा’ची आठवण जगाला होते. त्याबद्दल लिहिले जाते. सबप्राइम क्रायसिस या नावाने ओळखल्या गेलेल्या या संकटाशी संबंधित गंभीर घडामोडी सप्टेंबर २००८ मध्ये, आणि त्यानंतर, जगाने पाहिल्या होत्या. या वर्षी त्याला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुन्हा एकदा त्या घटनेची उजळणी माध्यमांतून झाली.

त्या संकटाने अमेरिकेत काही बड्या वित्तीय संस्थांवर दिवाळखोरीची वेळ आली. बाजारांचे निर्देशांक घसरले, रोजगार कमी झाले. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर काही ना काही प्रमाणात अवलंबून असलेल्या अनेक देशांत अर्थव्यवस्थेवर कमीअधिक परिणाम झाले. एकूण संकटांचे जागतिक स्वरूप त्यातून स्पष्ट झाले. त्यावर लेखन झाले, माध्यमांतून चर्चा झडल्या, पुस्तके निघाली. आता या घटनेला एक दशक झाल्याच्या निमित्ताने त्याची आठवण आणि सध्याच्या परिस्थितीची त्या वेळशी तुलना करून निष्कर्ष काढले गेले. अशा निमित्ताने होणार्‍या लेखनात, ‘पुन्हा असे होण्याची शक्यता किती’ याची चर्चा होताना दिसते. काही विश्लेषक सावधगिरीचे, धोक्याचे बावटेही उभारतात. आर्थिक संकटाची अशी चर्चा सबप्राइम क्रायसिसमुळे पहिल्यांदाच घडली असे नाही. १९३० मधील अमेरिकेतील महामंदीनंतरही (ग्रेट डिप्रेशन) जगात त्या गोष्टीची चर्चा होत राहिली आहे. गेल्या ८० हून अधिक वर्षांत महामंदीच्या संकटाचा संदर्भ किती वेळा जगात चर्चेत आला, त्याची गणना अशक्य आहे.

- Advertisement -

भारतातही हे आपण अनुभवले आहे. १९९१ मध्ये भारतापुढे आर्थिक संकट उभे राहिले होते. बाह्य देण्यांचे संतुलन बिघडल्याचे संकट (बॅलेन्स ऑव्ह पेमेंट क्रायसिस) ही मोठी आर्थिक आपत्ती होती. अत्यावश्यक आयातीची देणी देणे अवघड झाल्याची परिस्थिती उद्भवली. देशात अस्वस्थता उसळली. त्यानंतर पीव्ही नरसिंह रावांचे सरकार सत्तारुढ झाले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिलेले अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थमंत्रिपद दिले गेले. त्यांनी अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा मार्ग आखला आणि अर्थव्यवस्थेची पडझड रोखून नवी सुरूवात करून दिली. या आर्थिक संकटाने संपूर्ण माध्यम जगताचे लक्ष वेधून घेतले होते. लेख, चर्चासत्रे, भाषणे, व्याख्याने आणि पुस्तके यातूनही हा विषय गाजला. पुन्हा असे होण्याची शक्यता तपासली गेली, सावधगिरीचे इशारे दिले गेले, धोक्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असेही लिहिले गेले.

थोडक्यात काय तर आर्थिक संकटाबद्दल, त्यातील धोक्यांबद्दल भरपूर लिहिले जाते. चर्चा होते. मात्र असे संकट नसताना देखील अर्थव्यवस्थेबाबत, किंवा आर्थिक परिस्थितीबाबतच्या लेखनात अनेकदा सावधगिरीचा इशारा, काही विपरित होण्याची चिंता डोकावते. आर्थिक लेखनात नकारात्मकता असणे, तज्ज्ञांनी सावध करीत राहणे हे सतत होताना दिसते. नजिकच्या भविष्यकाळाविषयी चांगले लिहायचे असेल तरीही जर- तर असे शब्द वापरून सशर्त मत मांडले जाते. आर्थिक विश्लेषकांना चांगले काहीच घडताना दिसत नाही का, असा प्रश्न हे सगळे वाचून सर्वसाधारण वाचकांच्या मनात उमटत असेल, तर तो साहजिक म्हणावे लागेल.

- Advertisement -

मला वाटते याचे उत्तर संपत्ती किंवा पैशाच्या दोन वैशिष्ट्यांमध्ये दडले आहे. उपयुक्तता मूल्य आणि गतीशील स्वरूप ही ती दोन वैशिष्ट्ये. यापैकी उपयुक्ततेविषयी वेगळे सांगण्याची गरज नाही, इतके ते सर्वश्रुत आहे. गतीशील स्वरुपाविषयी इथे थोडे स्पष्ट केले पाहिजे.पैसा किंवा संपत्तीचा एकूण प्रकृतिधर्म हा गतीशील, चल स्वरुपाचाच असतो. लिक्विडीटी, फ्लोटिंग रेट, व्होलॅटॅलिटी, द्रव्य, चलन असे वित्त व्यवहारांबाबतचे अनेक शब्द पाहा. हे शब्दही गतिशीलतेकडे निर्देश करतात. आर्थिक रचनेत प्रत्येक घटकाची किंमत आणि त्याचा प्रभाव सातत्याने कमीअधिक होत असतो, बदलत असतो. कारण त्यावर इतर घटकांचा प्रभाव पडत असतो. शिवाय हे प्रभावित करणारे घटकही स्वतः स्थिर नसतात, त्यांच्या प्रभावाची तीव्रताही कमीअधिक होत असते. या अर्थाने त्यांचे स्वरूप गतीशील असते.

आर्थिक लेखनात विश्लेषण आणि पूर्वानुमान या दोन गोष्टींवर भर असतो. हे दोन्ही करताना विश्लेषकाला सावधगिरी बाळगावी लागते. दिशेचा अंदाज देऊन थांबावे लागते. ठोसपणाने मुद्दे मांडताना मर्यादा येतात. कितीही आकडेवारी हाती आली आणि त्याआधारे ठोस स्वरुपात मांडणी करायची म्हटले म्हटले तरी, विविध घटकांची संख्या आणि प्रभाव पाहता त्यातून तसा ठोसपणा अवघड होऊन बसत असावा.पैसा आणि सावधगिरी हे महत्त्वाचे समीकरण आहे. हे समीकरण आर्थिक लेखन, विश्लेषणातही उमटते. आर्थिक संकट असो वा नसो, आर्थिक विश्लेषणात नकारात्मकता आणि सावधगिरीची भूमिका लिहिली जाण्यामागे हे कारण असावे असे वाटते.

एका प्रकारे या कामाचे स्वरुप हवामानाच्या अभ्यासासारखे असते, असे म्हणणे चूक ठरू नये. हवामानविषयक डेटा कितीही मोठ्या प्रमाणात हाती असला तरी प्रभाव टाकणार्‍या घटकांची संख्या आणि त्यांची गतीमानता इतकी असते की पूर्वानुमानात नेमकेपणा आणणे अवघड होऊन बसते. अचूकतेची अडचण होऊन बसते, त्यामुळे धोक्याचे इशारे दिले जाणे क्रमप्राप्त असते.

अलीकडे मात्र संगणकीय मॉडेलच्या आधारे हवामानाचा अंदाज अधिकाधिक अचूक वर्तवण्याकडे वाटचाल सुरू आहे, त्याच धर्तीवर अधिकाधिक डेटाच्या आधारे अधिकाधिक अचूक आर्थिक विश्लेषण आणि अंदाज व्यक्त होताना आपल्याला पहायला मिळेल, त्याद्वारे अशा लेखनात डोकावणारी नकारात्मकता कमी होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

– मनोज तुळपुळे
(लेखक अर्थविषयक अभ्यासक आहेत.) 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -