सर्कस…दोघांच्या डबल रोलची फसलेली कसरत

रोहित शेट्टीचा सर्कस पाहाताना, आपल्याला गुलजारांचा १९८२ चा अंगूर आठवत असतो, संजीव कुमार आणि देवेन वर्माचा, डबल कॅरेक्टर्सचा डबल रोल त्यामुळे झालेला गोंधळ अंगूरही १९६३ च्या ‘दो दुनी चार’ वर आधारलेला होता, तर दो दुनी चार एका बंगाली चित्रपटावर आधारलेला होता, म्हणजेच रोहित शेट्टीचा सर्कस हा याच कथानकावरचा चौथा चित्रपट म्हणायला हवा. संजीव कुमार आणि देवेन वर्माच्या सहज अभिनयामुळे ‘अंगूर ’ आजही पाहिला आठवला जातो. रोहित शेट्टीनं संजीव कुमारच्या जागी रणवीर सिंग आणि देवेन वर्माच्या ठिकाणी वरुण शर्मा आहे. मात्र मूळ शेक्सपिअरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर’ वर आधारलेली ही भट्टी आधीइतकी जमलेली नाही.

सर्कसमध्ये रोहित शेट्टीच्या विनोदी चित्रपटातलं सगळं आहे. रोहित शेट्टीच्या चित्रपटात दिसणारे रंग, लोकेशन्स, चित्रिकरण असं सगळं एखाद्या शुभ्र कॅनव्हासवर कुंचल्यानं फेकलेल्या रंग फटकार्‍यांसारखंच आहे. सिनेमाच्या पडद्याचा कॅनव्हास  व्ह्युज्युअल इफेक्ट्सच्या प्रकाश रंगांनी रंगवण्याचं करण्याचं रोहितच्या इतर चित्रपटांप्रमाणे इथंही त्यानं केलेलं आहे. परंतु सगळं असताना सशक्त पटकथाच नसल्यानं  सर्कशीचा हा खेळ फसलेला आहे. दोन माणसांची दुहेरी व्यक्तीमत्व हा या कथेचा मूळ गाभा आहे. याकथेमध्येच कमालीची औत्सूक भरलेली काल्पनीकता आहे. मात्र हे शिवधनुष्य पेलण्यासाठी सशक्त पटकथेसोबतच कथानकातल्या गोंधळाशी प्रेक्षकाला समरस करणारे संवाद महत्वाचे आहेत. नेमकं इथंच ही सर्कस केवळ विनोदनिर्मितीचा प्रयत्न रेटणारी कसरत होऊन जाते. रोहितनं चित्रपटाच्या सुरुवात करताना प्रेक्षकांना कथेतला सस्पेन्स संपवून टाकल्यानं ही सर्कस पाहाण्याची उत्सुकता उरत नाही, त्यामुळे पुढची सर्कस केवळ पटकथेवर विसंबून ठेवण्याचा धोका दिग्दर्शकानं का पत्करला असा प्रश्न आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी, रणवीर सिंह आणि वरुण शर्माला शेक्सपिअरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर’चं कथानक पेलवलेलं नाही.

मुख्य कथानक त्याला जोडून आलेली उपकथानकं, डबल माणसांचे डबल रोल, असा सगळा व्यावसायिक विनोदाचा मालमसाला असतानाही, ही सर्कस कंटाळवाणी झालेली आहे. संवादात वैशिष्ठ्य नाही. सारख्याच कथानकामुळे गुलजारांच्या अंगूरसोबत होणारी तुलना टाळता येत नाही. या कथानकातील ‘दोन माणसांच्या डबल रोल’च्या मुख्य कथानकाला गुलजारांनी धक्का लावला नव्हता. या कथामूल्यातंच कमालीची फॅन्टसी आणि औत्सुक्य असल्यानं त्याची गुलजारांना गरज पडली नसावी. अंगूरमधल्या घटना घडत जातात, त्या घडवल्या जात नाहीत. रोहित शेट्टीच्या सर्कशीतल्या खेळातील प्रसंग ढिसाळ पटकथा आणि संवादांमुळे घडवलेले असतात. मुख्य कथानकांना जोडून असलेल्या उपकथनाकांतील गोंधळ रोहित शेट्टी आणि प्रियदर्शन या दोघांच्या चित्रपटात दिसतो. मात्र पडद्यावर उलगडत जाणारी मुख्य कथा, उपकथानकांमधील रंजकता संतुलीत ठेवण्यात प्रियदर्शनचा हतखंडा असतो. रोहित शेट्टीनं केलेल्या सर्कसमध्ये केलेल्या अशाच प्रयत्नांचं कौतूक असलं तरी सर्कशीचा हा खेळ आणखी रंगवता आला असता हे स्पष्ट व्हावं. सलमानच्या जुडवामध्ये  आणि राकेश रोशनच्या किशन कन्हैयामध्ये एकाला मारलं तर  दुसर्‍याला लागलं, असा घासून गुळगुळीत झालेला फार्म्युला नव्याने  इलेक्ट्रीक शॉकचा संदर्भ जुना आणि घासून गुळगुळीत झालेला असतो.
एकाच वेळेस झालेल्या चार मुलांच्या जन्माचं असतं.

यातल्या दोन्ही जोड्या जुळ्या असल्यानं पुढचा दुहेरी गोंधळ अटळ असतो. कथानक आधीच माहित असताना रोहितच्या चित्रपटांमधली पडद्यावरची रंगसंगती सर्कसमध्येही उमटते. कथानक साठच्या दशकातलं असल्यानं व्हिंटेज गाड्या, कौलारू घरं, उटीतल्या डोंगरदर्‍यांची अनटच हिरवळ आणि हॉटेल्स असं त्या काळातलं पर्यटन पडद्यावर होतं. या शिवाय पडद्यावर काहीच घडत नाही. पटकथा, संवाद पुरते फसल्यामुळे विनोदनिर्मितीचे केविलवाणे प्रयत्न मागे राहातात, या प्रयत्नांशी प्रेक्षक समरस होत नाही. या सर्कशीचं मुख्य आकर्षण रणवीस सिंह असल्याने प्रत्येक फ्रेममध्ये इतर पात्र बदलताना तो मात्र कायम असतो, परंतु अडीच तास प्रेक्षकांना रोहित्या रंगांत रंगवणं ही सर्कशीतली मोठी कसरत ठरते. मराठीपटातील विनोदाचं टायमिंग ओळखणार्‍या सिद्धार्थ जाधववर रोहितनं टाकलेला विश्वास त्यानं सार्थ केला आहे. जॅकलीन आणि पूजा हेगडे छान छान दिसतात. विनोदनिर्मितीसाठी संजय मिश्रा, जॉनी लिव्हर, टिकू तलसानीया, वर्जेश हिरजी, मुकेश तिवारी अशी रोहित शेट्टीची नेहमीची फौज असतानाही सर्कस खिळवून ठेवत नाही. रस्ते, लोकेशन्स आणि सेट्स यावर भर असल्यानं कथा फुलवण्याकडे दुर्लक्ष झाल्याचं स्पष्ट आहे. सर्कशीचा हा खेळ आणखी चित्तथरारक, विनोदी, उत्कंठावर्धक करता आला असता, दोघांच्या डबल रोलमुळे यातला विनोदातही डबल डोस असेल, अशी पडद्यावर डबल अपेक्षा न ठेवता सर्कशीचा हा खेळ पाहाण्यात हशील नाही. डबल विनोदाची अपेक्षा डबल रटाळपणात बदलंत असल्यानं ही सर्कस पाहायला हवीच असंही काही नाही.

– संजय सोनवणे, चित्रपट परिक्षण