घरफिचर्सकुटुंबातील मार्क्सचा मॅनिफेस्टो !

कुटुंबातील मार्क्सचा मॅनिफेस्टो !

Subscribe

कुटुंबात महिलांची भूमिका फार महत्त्वाची असते. एखाद्या कुटुंबातील वातावरण कसे असावे, हे प्रामुख्याने सासू आणि सुनेमधील संबंध कशा प्रकारचे आहेत, यावर अवलंबून असते. या सासू-सुनेच्या नात्याबद्दल भाष्य करणारा हा लेख नक्की वाचा...

कुटुंबात महिलांची भूमिका फार महत्त्वाची असते. एखाद्या कुटुंबातील वातावरण कसे असावे, हे प्रामुख्याने सासू आणि सुनेमधील संबंध कशा प्रकारचे आहेत, यावर अवलंबून असते. साम्यवादी विचारसरणीचा प्रणेता कार्ल मार्क्स याने मॅनिफेस्टो हे पुस्तक लिहिले. त्यात हाच कौटुंंबिक सिद्धांत अधिक व्यापक अर्थाने मांडल्याचे दिसून येईल.

सासू आणि सून यांच्यातील संबंध हा संसारिक जीवनाचा पिढ्यानपिढ्या गाभा राहिलेला आहे. त्यांच्यातील संंबंध कशा प्रकारचे आहेत, त्यावरच त्या घरातील शांतता आणि समृद्धी अवलंबून असते. असं म्हटलं जातं की, एका दोरीवर शंभर धोतरं वाळतील आणि दोन पातळं वाळणं फार अवघड असतं. सासू-सुनांच्या संघर्षात घरातील पुरुषाचा अक्षरश: मृदुंग होतो. जगावर कामगारांचे राज्य यावे, असे स्वप्न बाळगून साम्यवादाचा सिद्धांत मांडणार्‍या कार्ल मार्क्स याने दास कॅपिटल हे पुस्तक लिहिले. ते खूप गाजले. त्याचा प्रभाव जगावर पडला. पण या पुस्तकापूर्वी त्याने ‘मॅनिफेस्टो’ हे छोटेखानी पुस्तक लिहिले होते. तेही खूप गाजले. त्यात एक वैश्विक सिद्धांत त्याने मांडलेला होता.

- Advertisement -

तो असा होता की, जगात माणसांच्या खर्‍या अर्थाने दोनच जाती असतात. एक प्रस्थापित आणि दुसरी संघर्षवादी. त्यांच्या सुरू असलेला लढ्यावर जगरहाटी सुरू असते. या लढ्यात नव्या आणि त्रासलेल्या संघर्षवाद्यांना प्रस्तापितांमधील एक सुधारणावादी गट मदत करत असतो. त्यामुळे त्यांना या जगात आपला कुणी तरी वाली आहे, असे वाटत असते. त्यामुळे अडचणींवर मात करून पुढे मार्ग काढण्याची आशा त्यांच्यात निर्माण होत असते.

मार्क्सच्या मॅनिफेस्टोमधील हा सिद्धांत तसा दिसायला कठीण वाटत असला तरी तो तसा समजून घ्यायला फार सोपा आहे. कारण हा सिद्धांत घरोघरी जिवंत स्वरुपात नांदत असतो. घरोघरी असलेल्या सासू आणि सुना हे वैश्विक द्वंद्व आहे. विविध चॅनेल्सवरही सासू आणि सुना यांच्यातील संंबंधावरच अनेक मालिका सुरू आहेत. त्यांचा दर्शकवर्गही मोठा आहे. त्यात घराघरातील सासू आणि सुनांचाच मोठा सहभाग आहे. मार्क्सच्या मॅनिफेस्टोमधील सिद्धांतानुसार सासू प्रस्थापितांचे तर सून संघर्षवाद्यांचे प्रतिनिधीत्व करत असते. आज जी सासू असते ती काही वर्षांपूर्वी त्या घरात नवी सून म्हणून आलेली असते. आपल्या सासूकडून तिलाही सासूरवास सहन करावा लागलेला असतो.

- Advertisement -

पुढे त्या घरात ती सिनियर होत जाते. सगळ्या खाचाखोचा तिला कळू लागतात. तिच्या मुलांची लग्ने होतात. तिच्या घरी नवी सून येते. तिची सासू वृद्ध होते. जुनी सूनबाई सासू झालेली असते. पुन्हा तेच चक्र सुरू होते. प्रस्थापित आणि संघर्षवादी अशी ही चढाओढ सुरू असते. ज्याला मार्क्स प्रस्थापितांमधील सुधारणावादी घटक म्हणतो तो असतो, नव्या सुनेचा सासरा. त्याच्या मनात नव्या सूनेविषयी नेहमी सॉफ्ट कॉर्नर असतो. सासूची वागणूक जरी कडक असली तरी तिच्या अपरोक्ष सासरा त्या नव्या सुनेला मानसिक आधार ठरत असतो. ‘पूर्वीपासून तिचा स्वभावच तसा आहे. तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस’, असे तो सांगत असतो.

नव्या सुनेचा संसार अशा प्रकारे सुरू असतो. सासू सुनेच्या माध्यमातून नव्या जुन्याचा, दोन पिढ्यांचा संवाद आणि प्रसंगी विसंवाद सुरू होतो. मार्क्सला जगाचे वैश्विक तत्त्व छोट्याशा कुटुंबातच सापडले. समाज हा छोट्याशा कुटुंबाचे व्यापक रुप असते, तर कुटूंब हे समाजाचे लघुरुप असते. मार्क्स हासुद्धा संसारिक माणूस होता. कदाचित त्यामुळेच त्याला त्याच्या कुटुंबात हे वैश्विक तत्त्व सापडले असावे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -