घरफिचर्ससारांश...आणि ग्रंथोपजीविये

…आणि ग्रंथोपजीविये

Subscribe

वाचनाचे महत्त्व केवळ पुस्तक दिन, अथवा वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने सांगणे आणि त्या दिवशीच वाचनाविषयी ममत्व वाटणे हे कोणत्याही सुसंस्कृत, प्रगत समाजाचे खचितच लक्षण नाही. तरीही यानिमित्ताने का होईना वाचनाचे महत्त्व पृष्ठस्तरावर येते, तसेच काही लोक यातून वाचनाकडेही वळतील ही भाबडी आशा बाळगून का होईना या दिवसाचे औचित्य मानण्यास हरकत नाही. २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्त हा लेख.

-डॉ. अशोक लिंबेकर

आज केवळ माहिती तंत्रज्ञान हे माहिती देण्यापर्यंतच सीमित राहिलेले नाहीत तर चाट जीपीटी, एआय तंत्रज्ञानाने मानवी निर्मिती, सर्जनशीलतेलाही आव्हान दिले आहे. वाचून, विचार करून, ते पचवून, मनन, चिंतनाच्या उजेडात अभिव्यक्त होण्याचे पुढे काय होईल? अशा संभ्रमाच्या उंबरठ्यावर आज मानवी जीवन येऊन उभे ठाकले आहे. सुजाणपणे हे बदल लक्षात घेतले नाही तर मानवी जीवन एका नव्या अराजकाच्या खाईत लोटले जाईल का ही भीतीही आहे. अशा परिस्थितीत वाचन, पुस्तकं हे आपणास काय देतील? ज्ञानदेवांनी …आणि ग्रंथोपजीविये हे मानवी कल्याणासाठी मागणे मागितले ते कशासाठी…याचे चिंतन करायची वेळ आली आहे.

- Advertisement -

आजची पिढी वाचत नाही अशी एक सार्वत्रिक ओरड नेहमी केली जाते. वाचनावर प्रेम करणारी मंडळी तर ती करतातच, परंतु वाचनाच्या आसपास न फिरकणारीही यात सामील असतात हे विशेष. वाचन संस्कृती टिकून राहणे, अथवा ती जोपासणे ही एक सामाजिक गरज आहे, परंतु आजच्या समाजाचे प्राधान्यक्रम पाहता ही निकड अगदी तळाशी आहे हे वास्तव लक्षात घेता समाज जीवनात पुस्तकांचे महत्त्व कसे रुजणार? हा एक सांस्कृतिक प्रश्न आहे. असे प्रश्न आताच निर्माण झालेत असेही नाही. खानोलकरांनी सत्तरच्या दशकात हाच प्रश्न त्यांच्या ललित लेखातून खूप मार्मिकपणे मांडला होता. एक ग्रामीण माणूस मुंबईत येतो.

इथे आल्यावर केवळ समुद्रच न पाहता जहांगीर कलादालन पाहावे, जेजे स्कूल ऑफ आर्ट पाहावे असे त्याला वाटते. तो बिचारा या स्थळांचा पत्ता अनेक महाराष्ट्रीय माणसांना विचारतो, परंतु त्याची हेटाळणी करून वरून त्याला ‘मुंबईत व्यवस्थित पत्ता असल्याशिवाय नेमक्या स्थळी पोहचता येत नाही’ मदतीऐवजी असे आगाऊ सल्ले त्याला मिळतात. अचानक त्याला एक गोरा माणूस दिसतो. तो अमेरिकन असतो. त्याला हा पत्ता विचारतो आणि काय आश्चर्य तो माणूस म्हणतो, मी तिकडेच चाललो आहे. चला मी तुम्हाला तिथे सोडतो. भारतात आलो की मी या स्थळांना भेटी देतोच. आपल्या सांस्कृतिक अनास्थेचे हे उदाहरण. आजही यात फारसा फरक पडला असे नाही.

- Advertisement -

वाचन संस्कृती लोप पावत आहे हे एक अर्धसत्य आहे. आज वाचन संस्कृतीबद्दल जे निराशेचे, उदासीनतेचे सूर ऐकू येतात त्याला सांस्कृतिक व्यवहारातील अनेक घटक कारणीभूत आहेत. यावर उपाय म्हणून काही सकारात्मक प्रयत्न नक्कीच होत आहेत. ‘लोकराज्य’चा ‘वाचन एक अमृतानुभव’ हा विशेष अंक यावर आधारित होता. ‘ग्रंथाली’ने तर वाचन चळवळीचे सामूहिक पातळीवर विविध उपक्रम राबवून सर्वप्रथम जनजागरण केले. १९८२ मध्ये ग्रंथप्रसार यात्रा, १९८३ ला ग्रंथ एल्गार, १९८६ मध्ये ग्रंथमोहोळ आणि १९८७ यावर्षी बाल झुंबड हे सर्व कृतिशील उपक्रमांचे उत्तम उदाहरण आहे.

साधारणत: इ.स. नव्वदच्या उंबरठ्यावरच विविध माध्यमांचे आव्हान आणि त्यातून ग्रंथ संस्कृतीवर होणार्‍या संक्रमणाची चाहूल लागलेली होती. आजही अनेक प्रकाशन संस्था वाचकांनी पुस्तकाकडे आकर्षित व्हावे म्हणून अनेकविध प्रयोग राबवत आहेत, परंतु ठरावीक पातळीच्या पलीकडे त्याचा विस्तार होताना दिसत नाही.

पुस्तकं ही जीवनावश्यक वस्तूंच्या जागी यायला हवीत अशी चर्चा आणि मागणी आज काही प्रकाशक आणि ग्रंथविक्रेते विविध माध्यमातून करताना दिसत आहेत. कारण या दोन वर्षात या व्यवसायाला सर्वाधिक फटका बसला आहे, परंतु सामाजिक पाठिंब्याशिवाय आणि जगण्याच्या किमान गरजा भागल्याशिवाय सर्व स्तरावर या अपेक्षांची पूर्ती होणे शक्य नाही. कारण वाचन ही आज केवळ व्यक्तिगत बाब झालेली आहे. ती सामाजिक गरज बनल्याशिवाय या अपेक्षा वास्तवात साकार होऊ शकणार नाहीत.

१९७० च्या दशकात टेलिव्हिजनचा आपल्या सांस्कृतिक जीवनात प्रवेश झाला आणि त्यानंतर या छोट्या पडद्याने आपले भावजीवन व्यापून टाकले. त्याआधीही चित्रपट माध्यमाने नाटक आणि लोकनाट्य यांसारख्या जिवंत समूहजीवी कलांना झाकोळून टाकले होते. यात नाटक कसेतरी तग धरून उभे राहिले, परंतु मराठी मातीतील लोकनाट्य ही अस्सल कला मात्र पुन्हा तितक्या ताकदीने उभी राहू शकली नाही. नव्वदनंतरच्या माध्यम क्रांतीने हीच परिस्थिती ग्रंथ जगतात निर्माण केली. या माध्यम क्रांतीने अवघ्या विश्वालाच कवेत घेतले. माणूस माध्यम केंद्री बनला.

जगाच्या कुठल्याही कोपर्‍यातील बातमी, माहिती आपल्यापर्यंत क्षणार्धात येऊन धडकू लागली. ‘करलो दुनिया मुठ्ठी में’ अशा एका क्लिकवर सर्व काही उपलब्ध होऊ लागले. पुस्तक वाचल्याशिवाय काही बाबी अवगत होऊ लागल्या. पुस्तके हीच जेव्हा माहितीचे प्राथमिक स्रोत होते, तेव्हा त्यावर विसंबून राहणे गरजेचे होते. आता ही निकड सामान्य वाचकांना राहिली नाही. नवमाध्यमे या काळात अधिक विस्तारत ती अधिक समाजाभिमुख झाली. माध्यमांची ही गतिमानता आणि जागतिकीकरणाच्या रेट्याने माणूस माध्यम केंद्री बनला.

यात माहिती आणि ज्ञान यांचे भान सुटत गेले. यात वाचन मागे पडत गेले. मागील दशकात हे वाचन वर्तमानपत्राच्या रविवार पुरवणीपुरतेच मर्यादित होते. आता तर ते समाजमाध्यमापुरतेच सीमित झालेय. माध्यम केंद्री समाज या कोशातच गुरफटला गेला. मूळ संदर्भ न पाहता, कोणतीही खातरजमा न करता वरवरच्या महितीलाच हा समाज ज्ञान समजू लागला. यातून अभ्यासोनी प्रकटावे या वृत्तीचा र्‍हास होऊन प्रतिक्रियावाद वाढत गेला. या समाज वास्तवाची प्रचिती शिक्षणापासून ते राजकारणापर्यंत येताना दिसते. या समाज वास्तवाचा अत्यंत गंभीर परिणाम वाचन संस्कृतीवर झाला.

असे असले तरी काही पुस्तकांच्या लाखो प्रती आज विकल्या जात आहेत. ‘हिंदू’ कादंबरीचे उदाहरण याबाबतीत महत्त्वाचे आहे. ई-बुक्स, कींडल, वेब पोर्टल यांसारख्या नव्या माध्यमात, नव्या डिजिटल रूपात पुस्तके आपणास भेटत आहेत. यावरून एक गोष्ट सहज ध्यानात येते ती म्हणजे एक व्यक्तिगत छंद म्हणून वाचन ही बाब आज जोपासली जातेय आणि पुढील काळातही वाचनाचे स्वरूप असेच राहणार आहे.

तसेच जे सकस आहे ते वाचले जाणारच आहे याचेही हे द्योतकच म्हणावे लागेल. नव्या तंत्रज्ञानामुळे पुस्तक प्रकाशित करणे सहज सोपे झालेय. त्यामुळे अनेक पुस्तके प्रकाशित होत आहेत. याला अनेक व्यावसायिक, व्यावहारिक कारणेही आहेत. ही संख्यात्मक वृद्धी दिसत असली तरी गुणात्मक वाढ समजण्यास मात्र संदेह आहे. वाचणारा जो सजग वाचक आहे त्याला निवडण्याचे भान आहे. त्यामुळे आजही सकस साहित्य वाचले जाते, परंतु हे चित्र अतिशय मर्यादित आहे.

दर्जेदार साहित्य ते ललित असो अथवा वैचारिक त्याची चर्चा व्हायला हवी, परंतु अशी चर्चा करणारा, उत्तमाची पारख करून दर्जेदार साहित्य वाचकाभिमुख करणार्‍या साक्षेपी समीक्षकांची दुर्मीळता हाही आजचा कळीचा मुद्दा आहे. अजूनही तरुण वाचक ग्रंथ जगताच्या परिघावरच आहेत. ग्रंथालयाकडे वळणारी पावले कमी होत आहेत. समाजमाध्यमांच्या मगरमिठीतून तरुणाईला पुस्तकाकडे वळवल्याशिवाय हे घडणे शक्य नाही. यासाठी व्यापक अशी लोकचळवळ उभारणे गरजेचे आहे. तरुणांचे भावविश्व, त्यांचे जगणे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या आशा- आकांक्षा यापासून आजचे साहित्य कोसो दूर आहे.

याला काही सन्माननीय अपवाद असतीलही, परंतु ते खूप कमीच. अल्केमिस्ट ही कादंबरी तरुणवर्गामध्ये खूप वाचली गेली असे मानले जाते. ते खरेही आहे. अलीकडेच केरळातील एका रिक्षावाल्याने तर या कादंबरीचे आणि त्या लेखकाचे चित्र आपल्या रिक्षावर मिरवले आणि ही बातमी जागतिक झाली. त्या आंतरराष्ट्रीय लेखकाने याची दखल घेऊन याचे ट्विट केले. आपल्या भाषेतील लेखनात असे सामर्थ्य असूनही तरुणांपर्यंत ते जात नाही हे वास्तव खेदजनक आहे. तरुणांना त्यांच्या वयानुसार आणि त्यांच्या समजीनुसार लिहिले जाणारे साहित्य आवडण्यात काहीच गैर नाही.

शिस्तबद्ध, वैचारिक, सकस वाचनाची सवय उत्तरोत्तरच आणि वाचनाच्या सातत्यातूनच प्रगल्भ होत जाते, परंतु तरुणांचे भावविश्व चित्रीत करणार्‍या साहित्याला रंजनवादी म्हणून साहित्यातून बाद केले जाते. त्यामुळे ज्यात आपले जगणेच नाही त्याकडे ही माध्यमांनी भारलेली पिढी कशी वळेल? म्हणूनच त्यांची मानसिक, सांस्कृतिक भूक आज ओटीटीसारखी तत्सम माध्यमे भागवत आहेत. गुगल गुरू त्यांच्या उशाला आहे. या वास्तवाकडे डोळेझाक करून चालणार नाही. माणसांचे जीवन हे बहुस्तरीय आहे. त्यामुळे साहित्यातून अभिव्यक्त होणार्‍या विविधांगी अनुभवांची, विविध वैचारिक प्रवाहांचे स्वागत करण्याची स्वीकारशीलता आपल्यात पाहिजे.

मधल्या काळात वेतनेतर शासकीय अनुदान देणे बंद झाल्याने त्याचा परिणाम ग्रंथविश्वावर होणे स्वाभाविक आहे. ही सांस्कृतिक अनास्था निश्चितच चिंताजनक आहे. कागद, छपाई आणि त्यावर लावला जाणारा कर यामुळे पुस्तकांच्या किमती वाढल्या आहेत. सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात ही बाब यायला हवी. या दशकात केवळ प्रकाशन व्यवसायच नाही तर दैनिक वृत्तपत्रे प्रकाशित करणेही जिकिरीचे झाले आहे.

सर्व प्रकारच्या शासकीय करातून ही माध्यमे वगळल्याशिवाय सांस्कृतिक उन्नती होणे शक्य नाही. साहित्य, संस्कृती, कला हे घटक आपल्या आस्थेच्या केंद्रस्थानी नाहीत याचेच हे प्रत्यंतर आहे. सब घोडे बारा टक्के या न्यायाने सांस्कृतिक व्यवहाराकडे पाहण्याची दृष्टी बदलल्याशिवाय या क्षेत्राला चालना मिळणार नाही. कारण कितीही माध्यमे आली तरी पुस्तकांची जागा ही माध्यमे घेऊ शकणार नाहीत. कारण आपले व्यक्तिगत छंद आणि अभ्यास म्हणून पुस्तके हीच सर्वश्रेष्ठ आणि सशक्त माध्यम आहे आणि ते राहीलच यात कोणतीही शंका नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -