घरफिचर्ससारांशवृक्षांच्या सान्निध्यातलं शिक्षण : पाथा भवन

वृक्षांच्या सान्निध्यातलं शिक्षण : पाथा भवन

Subscribe

रवींद्रनाथ टागोर म्हटलं की काही शब्द हमखास मनात उमटतात-शांतिनिकेतन, मुक्त शिक्षण व्यवस्था, संवेदनशीलता, काव्य आणि बंगाली भाषा. जगभरातून अनेक जण शांतिनिकेतनच्या ‘पाथा भवन’मध्ये शिक्षण घ्यायला उत्सुक असतात. त्यासाठी एक अट असते, प्रवेश घेताना तुम्हाला बंगाली भाषा ज्ञात असावीच लागते. कारण मातृभाषेतून शिक्षणावर इथे भर देण्यात येतो. टागोरांच्या या विचाराला आता तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे (एआय) बळकटी मिळत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगातून आता असे फोन अस्तित्वात आले आहेत की त्यावर कोणत्याही भाषेतला मजकूर तुम्हाला तुमच्या मातृभाषेतून ऐकता येऊ शकतो. म्हणजे एआय इथे जणू जागतिक पातळीवर दुभाषाचं काम करीत आहे.

-सचिन जोशी

मला बंगाली भाषेतला गोडवा माहीत होता. त्या भाषेप्रमाणेच ‘पाथा भवन’ शाळेतलं वातावरण आणि माझं झालेलं स्वागत या गोष्टींमध्येही स्निग्धता अनुभवायला मिळाली. माझं पारंपरिक पद्धतीने कुंकुमतिलक लावून आणि शंख वाजवून स्वागत करण्यात आलं. मातीच्या भांड्यातून पाणी प्यायला दिलं गेलं. तिथलं मुळी सगळंच विशेष! सगळा कॅम्पस पारंपरिक खुणा वागवताना पाहायला मिळतो. शाळेची इमारत हेरिटेज बिल्डिंग म्हणून घोषित आहे. तेव्हाच्या तिथल्या प्राचार्या होत्या बोधी रूपा. त्या अर्थशास्त्र शिकवत. त्यांचं स्वत:चं संपूर्ण शिक्षणही याच शाळेत झालेलं आहे.

- Advertisement -

इथे सहावी ते आठवीपर्यंत मुलींना पिवळा कुर्ता आणि पांढरा पायजमा असा गणवेश होता. नववीच्या पुढे मुली युनिफॉर्म म्हणून साडी नेसत. नर्सरीपासून बारावीपर्यंत असलेली ही शाळा १९०१ मध्ये स्थापन झाली आहे. विशेष म्हणजे शाळेच्या बंदिस्त इमारतीपलीकडे जात ही शाळा खरंतर झाडांखाली भरते. त्या आवारातच ‘विश्वभारती विद्यापीठ’ आहे. त्याच्याशी शाळा संलग्न असून शाळेचं स्वत:चं सिलॅबस आहे. एकूण शंभर एकर जागा व्यापलेल्या या विद्यापीठाला ३० एकरचं ग्राऊंड आहे. रोज संध्याकाळी साडेचारला मुलांना सक्तीच्या खेळण्याची वेळ असते. संपूर्ण विद्यापीठासाठी सकाळची असेम्ब्ली अटेंड करणं अनिवार्य असतं.

विद्यार्थ्यांना कंटाळा येऊ नये म्हणून नि:श्वास टाकायला मोकळा वेळ मिळावा म्हणून दोन तासिकांमध्ये पाच मिनिटांचा गॅप असतो. बकुलपेड, आम्रकुंज असा अनेक झाडांचा बहर आवारात आहे. एका वृक्षाखालची तासिका संपली की पाच मिनिटांनी मुलं दुसर्‍या तासिकेसाठी वेगळ्या वृक्षाच्या सावलीत जातात. अगदी परीक्षाही वृक्षांखालीच घेतल्या जातात.

- Advertisement -

कोणतंही परिवर्तन क्षणात घडत नसतं. दीर्घकाल प्रयत्नांच्या दशदिशा धुंडाळाव्या लागतात. हे प्रयत्न केले रवींद्रनाथांच्या वडिलांनी-देवेंद्रनाथ टागोरांनी! प्रारंभी आवारात एकच झाड होतं, पण त्यांनी या जागेत आश्रम काढायचं ठरवलं तेव्हा हेतूपूर्वक तिथे अनेक झाडं लावली. रवींद्रनाथ तेव्हा दहा-अकरा वर्षांचे होते. त्यांना शाळेत जायला आवडायचं नाही. इथे मात्र ते रमत. ही शाळा सुरुवातीला गुरुकुल पद्धतीने भरत असे. निसर्गाच्या कुशीत शिक्षण, संवाद. कालानुरूप शिक्षण पद्धतीमध्ये फरक पडत गेला असला तरी इथल्या विद्यार्थ्यांवर, शाळेवर असलेला निसर्गाचा वरदहस्त मात्र तसाच आहे.

विज्ञानाचा वर्गसुद्धा निसर्गाच्या सान्निध्यातच भरतो. मुलं वेगवेगळी पानं-फुलं गोळा करून अभ्यास करतात. पावसाळा त्यासाठी मोठी पर्वणी असते. मुलं पावसात हिंडतात, कविता करतात. एकीकडे अभ्यास चालू असतो. वह्या-पुस्तकांपलीकडचा अभ्यास इथे मुलांना अनुभवायला मिळतो. रवींद्रनाथांचा ‘एकला चालो रे’ हा सूर आळवतानाही ‘हे विश्वचि माझे घर’ या उक्तीचं बाळकडूही इथे दिलं जातं. एकमेकांच्या सुखदु:खापर्यंत पोहचताना आपोआपच विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्ध्यांकाचा विकास होतो. ज्याकडे आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे. आजूबाजूच्या गावात जाऊन मुलं तिथल्या लोकांचे प्रॉब्लेम्स समजून घेऊन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात. यातलं शेअरिंग मुलांच्या मनोविकासासाठी गरजेचं असतं.

स्वच्छतेचं जगण्यातलं महत्त्व इथे कृतीतून अधोरेखित केलं जातं. मुलं टॉयलेट, लायब्ररी, कम्युनिटी हॉल स्वच्छ करतात. ही स्वच्छतेची सवय अर्थातच त्यांच्या अंगी मुरत जाते. या सगळ्या दैनंदिन जगण्याशी निगडित गोष्टी झाल्या. नवं काही करण्यासाठी अनेक निमित्तही असतातच. ७ ऑगस्ट रवींद्रनाथांची पुण्यतिथी. त्या दिवशी विद्यार्थ्यांकडून नृत्य सादरीकरण होतं. नृत्य ही नवीन आयुष्याची सुरुवात असते असं म्हटलं जातं. त्या दिवशी वृक्षारोपण केलं जातं. रवींद्रनाथांनी प्रत्येक ऋतूवर, अनेक प्रसंगांवर जवळजवळ अडीच हजार गीतं लिहिली आहेत. त्यावर आधारित कार्यक्रम शाळेत सादर होत असतात. या सगळ्याचा फायदा अर्थातच इथल्या विद्यार्थ्यांना होतो. त्यांची वाटचाल परिपक्वतेकडे होते.

नियमाने काही गोष्टी इथे पाळल्या जातात. दर गुरुवारी भरणार्‍या साहित्यसभेत मुलांनी स्वत: लिहून गोष्टी सादर करायच्या असतात. रक्षाबंधन साजरं केलं जातं. त्यावेळी मुलांनी केलेल्या राख्यांना मोठा मान असतो. क्रीडाविषयक घडामोडींमध्ये सर्व मुलांचा सहभाग नेहमी असतो. इथेही स्पर्धा नसते तर सहकार्यावर भर असतो. मुलांना चूक करण्याचा अधिकार इथे असतो. शाळेची स्वत:ची घटना-कॉन्स्टिट्यूशन आहे. या घटनेनेच तो अधिकार मुलांना दिला आहे. अर्थात म्हणून मुलांनी अव्याहत चुका कराव्यात असा याचा अर्थ नाही. चुकांमधूनच माणूस सुधारत जातो असा त्याचा अर्थ आहे. इथे चुकीचं वागलं तर शिक्षा होत नाही; फक्त कॅम्पस स्वच्छ करावा लागतो आणि चूक दुरुस्त करावी लागते. सकाळची असेम्ब्ली अरेंज करणं हाही शिक्षेचा प्रकार आहे.

शाळेत अर्थातच जगण्याशी संबंधित अनेक क्षेत्रांची ओळख करून दिली जाते. त्यासाठी प्रकल्प, तंत्रज्ञान यांची मदत घेण्यात येते. आर्ट टीचर्स, म्युझिक टीचर्स मिळून एकूण २० कलाशिक्षक शाळेत आहेत. लेदर वर्क, पॉटरी वर्क इथे शिकवलं जातं. हातमागावर विणणं हा अभ्यासक्रमाचा भाग आहे. संपूर्ण कॅम्पसमध्ये मुलं सायकल चालवतात. तसंच चालणं, धावणं, हिंडणं, फिरणं या गोष्टींना खूप महत्त्व देण्यात येतं. ‘लूक अराऊंड नेचर’ ही थीम आहे शाळेची. निसर्गाची जास्तीत जास्त ओळख करून घेण्याची मुलांना सवय लावली जाते. संपूर्ण कॅम्पसमध्ये मुलं स्वच्छपणे बागडतात. टागोरांच्या चार तात्त्विक स्तंभांवर शाळा उभारलेली आहे.

१) गुरू-गुरूला इथे अर्थातच महत्त्व देण्यात येतं. इथे शिकवणारा शिक्षक खर्‍या अर्थाने ‘गुरू’ असतो.

२) निसर्ग-नेचर. निसर्गाच्या साक्षीने इथे अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. खूप गाणी म्हटली जातात. नृत्यं केली जातात. जणू निसर्गाच्या हातात हात घालून आनंदोत्सव साजरा केला जातो.

३) स्वातंत्र्य-फ्रीडम. इथे खर्‍या अर्थी मुलांचं स्वातंत्र्य जोपासलं जातं. त्याद्वारे स्वयंविकास हा शिक्षणाचा उद्देश साधण्यास मदत होते. म्हणूनच परीक्षा हे इथे शिक्षणाचं ध्येय नाही.

४) शिकण्यातला आनंद-जॉय ऑफ लर्निंग. या आनंदाला इथे कमालीचं महत्त्व दिलं जातं. आनंद असावा; स्पर्धा नसावी. स्पर्धेतून शत्रू निर्माण होतात. चांगला माणूस घडण्यासाठी स्पर्धेची गरज नसते तर सहकार्याची गरज असते. यातून एकमेकांना आनंद देता येतो हे इथे आवर्जून मुलांना सांगण्यात येतं.

सहकार्याची भावना आणि नवनिर्मितीक्षमता हा शिक्षणाचा पाया आहे. मिआली या शिक्षणतज्ज्ञांनी सर्जनशीलतेवर अभ्यास केला, सुचतं कसं या प्रश्नाचा वेध घेतला. त्यातून त्यांच्या लक्षात आलं की लहानपणीच ज्या मुलांचं कुतूहल वाढीस लागतं त्यांना पुढे खूप काही नवीन सुचू लागतं. शांतिनिकेतनमध्ये याचा अनुभव येतो. तिथे एका शिक्षिकेने आम्हाला एक प्रोजेक्ट दाखवला.
उदा-पाणी-वॉटर

प्रत्येक विषयात पाणी वेगळं रूप धारण करून येतं. कवितेत वेगळं, विज्ञानात वेगळं, चित्रातलं पाणी वेगळं, गणितातलं त्याचं मोजमाप वेगळं, पण पाणी एकच हे सर्व मुलांना प्रयोगाद्वारे समजावून सांगण्यात येतं. असा एकाच गोष्टीचा विविधांगाने विचार करतानाच सर्जनशीलता वाढीस लागते. म्हणूनच नित्यनूतन अनुभव देत असलेल्या या शाळेत यायला प्रत्येक मुलाला आवडतं. हा त्यांना मिळत असलेल्या आनंदाचा पुरावा आहे. असा आनंद मुक्तहस्ताने आसमंतात लुटत असलेलं हे टागोरांच्या तत्त्वांवर आधारित विश्वभारती विद्यापीठ. शोपेकतो हे तेव्हा त्याचे व्हाईस चान्सलर होते.

‘पाथा भवन’ हे प्रायमरी स्कूल आहे आणि ‘आनंदोभवन’ हे सेकंडरी स्कूल आहे. खर्‍या अर्थाने मुक्तपणे शिक्षण हा इथे शिक्षणाचा गाभा आहे. मुलांना होमवर्क नसतं. कुठल्याही प्रकारचं दडपण नसतं. अर्थात दडपण नाही म्हणून इथे बेशिस्त निर्माण होत नाही. मोकळ्या शिस्तीचं अस्तित्व जाणवतंच. ती स्वयंशिस्त असते. ‘पाथा भवन स्कूल’ हे भारतातलं मॉडेल बनावं ही इच्छा इथल्या सर्वच शिक्षकांची असते. शिक्षक वेळेआधी क्लासमध्ये हजर असतात.

प्राचार्य, व्हाईस चान्सलर, विद्यार्थी सगळ्यांबरोबर आमचा वेगवेगळा संवाद झाला. इंग्लंड, यूके, फ्रान्समधून मुलं इथे भेट द्यायला येत असतात. अनेक मान्यवर अनेक ठिकाणांहून येत असतात. त्यांची व्याख्यानं होतात. कोणाचं व्याख्यान आवडलं तर इथे टाळ्या वाजवत नाहीत तर सगळे ‘शाहदु-शाहदु’ म्हणतात. याचा अर्थ ‘वेलकम, थँक्यू.’ यातून पॉझिटिव्ह एक्स्प्रेशन्स व्यक्त होतात. अनेक क्षेत्रांतल्या अनेक तज्ज्ञांचं मार्गदर्शन इथे विद्यार्थ्यांना मिळतं. अर्थातच इथल्या तज्ज्ञांचाही त्यात समावेश असतो. रिसर्च कसा करावा याचा वस्तुपाठच जणू तारोगनाथ पाल यांनी आमच्यासमोर ठेवला. शांतिनिकेतनमध्ये ४०० विद्यार्थ्यांनी तारोगनाथांच्या मार्गदर्शनाखाली रिसर्च केला आहे. आमचा तिथला प्रत्येक क्षण नवनवीन माहितीने संपन्न होत होता.

मुलांनी आमच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता. ‘शाळा आमच्यासाठी काय आहे’ याबद्दलच्या विद्यार्थ्यांच्या भावना सादरीकरणातून व्यक्त होत होत्या. कार्यक्रम बहारदार होताच, पण इथे प्रत्येक गोष्टीत काहीतरी विशेष बघायला मिळालं. अगदी शाळेतले सगळे डस्बिनही अभिनव होते, कलात्मक पद्धतीने सजवलेले होते. प्रत्येक गोष्टीचं योग्य महत्त्व जाणणं विद्यार्थ्यांना चांगलं जमत होतं. आलेल्या पाहुण्यांची काळजी घेणं, त्यांच्या चहा-नाश्त्याची सोय करणं हेही विद्यार्थीच करीत होते. सगळ्या गोष्टींची ओळख करून देत होते. त्यांनी आम्हाला ‘देहोली’ म्हणजे काय ते सांगितलं. ही अशी मोकळी जागा शाळेत आहे जी टागोरांच्या कल्पनेतून साकारली. प्रत्येक जण इथे विश्रांती घेऊ शकतो. अशा अनेक कल्पनांनी साकारलेली ही शाळा.

सगळ्या विकासाची सुरुवात बालवयातच होते हे लक्षात घेत ‘मृणालिनी आनंद पाठशाला’ ही पूर्व प्राथमिक पाठशाला इथे टागोरांच्या पत्नीच्या नावाने सुरू करण्यात आली. इथल्या छोट्या मुलांना अर्थातच मुक्तस्वातंत्र्य असतं. पेंटिंग, मातीकाम, मॉडेलिंग, भाषा अशा विषयांत ही बच्चेकंपनी रमलेली असते. संगीताला महत्त्व दिलं जातं. गणित नसतं. या मुलांना गणवेश नाही. स्वच्छतेची सवय या वयापासूनच लावली जाते. वर्गात झाडू असतात. मुलं खाली बसतात. पूर्व प्राथमिकसाठी केवळ बंगाली भाषेचाच वापर करतात. सर्व गोष्टींमध्ये एक लय सांभाळली जात आहे असं वाटतं. तेव्हा लेका चॅटर्जी पूर्व प्राथमिकच्या प्राचार्या होत्या. इथले वर्ग खूप छोटे आहेत.

कारण मुलांचा बराचसा वेळ झाडाखालीच जातो. चित्रकलेसाठी फक्त ती वर्गात येतात. पावसाळ्यातसुद्धा त्यांनी विविध ठिकाणी छत लावलेले असतात. त्या छताखाली विद्यार्थी अभ्यास करतात, पण त्या छताला कुठल्याही भिंती नसतात. जमिनीपासून चार फूट वरती गोल अशा भिंती बांधल्या आहेत, जेणेकरून पाणी आत येणार नाही. त्यामुळे पावसात मुलं शाळा जास्त आनंदाने अनुभवतात. मी जेव्हा या शाळेत गेलो होतो त्यावेळेस पावसाळा ऋतूच होता. मी तीन दिवस या शाळेत राहिलो तरी बाहेर पडण्याची अजिबात इच्छा नव्हती.

या शाळेतल्या शिक्षकांना मुलांना ‘नाही, डोन्ट, नो’ म्हणण्याचा अधिकार नाही. नर्सरी ते कॉलेज टीचर्सना दादा आणि दीदी म्हणतात. त्यातून निर्माण होणारी आपुलकी खूप महत्त्वाची ठरते. एकूणच प्रत्येक गोष्टीत एखादं वैशिष्ठ्य जोपासणार्‍या या शाळेत मुलांचा सर्वांगीण विकास झाला नाही तरच नवल. अशा या आनंदाने बहरलेल्या ‘पाथा भवन’ला एकदा तुम्हीही भेट दिलीच पाहिजे.

ही शाळा आगळीवेगळी का?
रवींद्रनाथ टागोर यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित शाळा
विश्वभारती विद्यापीठाशी संलग्न
शाळेचे वर्ग झाडांखाली भरतात
तसेच रोज प्रत्येक तासिका वेगळ्या झाडाखाली
बंदिस्त वातावरणापलीकडचं शिक्षण
विद्यार्थ्यांना निसर्गाची परिपूर्ण ओळख करून दिली जाते.
शाळेला स्वत:ची घटना आहे.
चुका करायला जास्त वाव
नवीन विचारांची जोपासना
कला, क्रीडा स्पर्धा नाही, तर सहकार्याची भावना
विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासावर भर
कॅम्पसभर हिंडण्या-फिरण्याचं मुक्त स्वातंत्र्य
विद्यार्थ्यांच्या भाषेवर अधिक काम केले जाते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी इथे पाहायला मिळतात.
सायन्स सब्जेक्ट लूक अराऊंड नेचर या संकल्पनेवर आधारित

-(लेखक शिक्षण अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -