घरफिचर्ससारांशअजिंठ्याचा ‘प्रकाश’ चित्रकार!

अजिंठ्याचा ‘प्रकाश’ चित्रकार!

Subscribe

भुसावळ हे मुंबई-नागपूरदरम्यानचं ब्रिटिशकालीन जंक्शन रेल्वे स्थानक. या रेल्वे स्थानकाच्या ओव्हरब्रीजच्या लाकडी पायर्‍या उतरून स्टेशनच्या पलीकडे काही अंतरावर असलेल्या भुसावळ कॅथोलिक चर्चमध्ये विश्वविख्यात महान प्रकाशचित्रकार (फोटोग्राफर) मेजर रॉबर्ट गिलचं थडगं आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी ‘अजिंठा’ चित्रपटामुळे रॉबर्ट गिल आणि त्याच्या सहजीवनात काही काळ घालवलेल्या ‘पारो’ या त्याच्या प्रेमिकेची सुरचित कथा प्रसारमाध्यमांतून मोठ्या चर्चेचा विषय बनली. या चर्चेत मात्र अथक परिश्रमाने आपल्या फोटोग्राफीतून अजिंठ्याबरोबरच मराठवाडा, खान्देश व विदर्भाच्या भूमीने आपल्या गर्भात साठवलेला अप्रतिम असा सांस्कृतिक ठेवा जगासमोर अजरामर करणारा प्रकाशचित्रकार म्हणून मेजर रॉबर्ट गिल अप्रकाशितच राहिला आहे.

-रणजितसिंह राजपूत

आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीत अजिंठा जगासमोर मांडणारा चित्रकार आणि त्या काळात त्याला भेटलेली प्रेमिका पारो हा चित्रकार, फोटोग्राफर आणि सैन्यात अधिकारी असलेल्या रॉबर्ट गिलच्या आयुष्यातील केवळ एक टप्पा आहे. २६ सप्टेंबर १८०४ ला लंडनच्या बिशपगेट येथे जन्माला आलेल्या रॉबर्टचे २६ ऑक्टोबर १८०४ ला त्याची आई ‘अ‍ॅन अ‍ॅलिनसन’ हिने नामकरण केले. ‘चर्च ऑफ इंग्लंड’मध्ये त्याने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि ‘रॉयल अकादमी स्कूल बर्लिंग्टन हाऊस’, पिकॅडील्ली येथे त्याने आपले उच्चशिक्षण पूर्ण केले.

- Advertisement -

चित्रकला, शिल्पकला यांसारख्या ललितकलांचं उच्चशिक्षण देणारी ती इंग्लंडमधील सर्वात जुनी संस्था आहे. या संस्थेत त्याने तीन वर्षांचा पदव्युत्तर ललितकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. वयाच्या १९व्या वर्षी पी. पी. ग्रेलीमर यांच्या शिफारशीने जेम्स पॅटीस यांच्या आदेशानुसार मद्रास येथील ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्मीत ४४ मद्रास नेटिव्ह इनफंट्री दलात तो भरती झाला. त्यावेळी तो भारतात सर्वप्रथम आला. ऑक्टोबर १८३४ ला त्याच्या आईचे ६१व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर दोन वर्षांनी ऑगस्ट १८३६ ला त्याचे वडील जॉन गिल यांचे वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले.

वयाच्या ३६व्या वर्षी सुट्टीवर असताना २५ मे १८४१ रोजी रॉबर्टने २४ वर्षीय फ्रान्सिस फ्लॉवरड्यू रिकबेरीशी चेल्सा (लंडन) येथे विवाह केला. लग्नानंतर तीन महिने प्रवास करून सप्टेंबर १९४१ ला तो पुन्हा पत्नीसोबत मद्रासला आला. तेथे २५ जुलै १८४२ ला त्याच्या पत्नीने त्यांची पहिली मुलगी फ्रान्सिस एलिझा मिनचीन गिल हिला जन्म दिला. त्यानंतर १० सप्टेंबर १८४३ ला बंगलोरला असताना विल्यम्स जॉन गिल या मुलाचा जन्म झाला. सन १८४३ पर्यंत रॉबर्टने आर्मीच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम केले. तो लंडन रॉयल एशियाटिक सोसायटीचा क्वालिफाईड आर्टिस्ट होता.

- Advertisement -

मेजर जॉन स्मिथ हा इंग्रज अधिकारी एप्रिल १८१९ ला सह्याद्री पर्वताच्या सातमाळ रांगेतील इंध्याद्री शाखेतील जंगलात वाघाच्या शिकारीसाठी गेला असताना त्याला अजिंठ्याच्या १०व्या लेणीचा शोध लागला. त्यानंतर त्या ठिकाणी उत्खनन करण्यात आले. कोर्ट ऑफ द डायरेक्टर्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनीने रॉबर्ट गिलमधील सुप्त कलाकाराला ओळखून १ ऑक्टोबर १८४४ ला अजिंठ्यातील चित्र-शिल्पांच्या आरेखनासाठी (ड्राफ्समन) अजिंठा येथे नियुक्ती दिली. त्यात त्याला एक सहाय्यक ड्राफ्समन व तीन स्थानिक कुशल कारागीर ठेवण्याचे अधिकार दिले होते.

दरम्यानच्या काळात २ एप्रिल १८४५ ला रॉबर्ट गिलची दुसरी मुलगी रोज मॅतिल्डा गिल हिचा चेल्सा (लंडन) येथे जन्म झाला व अवघ्या २० दिवसांनी म्हणजेच २० एप्रिल १८४५ ला तिचा मृत्यू झाला. १३ मे १८४५ ला १७ सुरक्षा जवानांसह तो अजिंठ्याला आला. अजिंठा परिसरातील सैन्य प्रशिक्षण केंद्राच्या स्थानिक वैद्यकीय उपचार केंद्रात तो राहत होता. सप्टेंबर १८४५ ला त्याचे रंग व कॅनव्हास अजिंठ्याला आले. त्यावेळी स्थानिक अनागर भारतीय जमातीच्या ‘पारो’ या तरुणीशी त्याची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाल्याचे दिसून येते, परंतु रॉबर्ट-पारो यांचा विवाह झाल्याचे कोठेही नमूद नाही. नोव्हेंबर १८४६ ला रॉबर्ट गिलने अजिंठ्याच्या आठ चित्रकृतींचा पहिला टप्पा पूर्ण केला होता.

लंडनच्या इंडियन कोर्ट ऑफ द क्रिस्टल पॅलेस, सिडनेहॅम येथे सन १८५१ला त्याच्या अजिंठ्यावरील चित्रांचे प्रदर्शन भरले होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतातील हा ठेवा सर्वप्रथम जगासमोर आला आणि त्याची मोठ्या प्रमाणावर प्रशंसाही झाली. त्याच्या एकूणच कामगिरीची दखल घेऊन १ एप्रिल १८५४ला त्याला लष्करातील मेजर पदावर पदोन्नतीही देण्यात आली. त्यावेळी तो दोन महिन्यांच्या रजेवर गेला. अजिंठा आणि त्यातील बुद्धाच्या जातककथांनी प्रभावित होऊन रॉबर्टने आपल्या चित्रनिर्मितीचा दुसरा टप्पा सुरू केला.

त्याच्या या चित्रनिर्मितीच्या दोन वर्षांत (सन १९५४-५५) भारतात प्लेगची साथ आली आणि त्यात २३ मे १८५६ला रॉबर्टची अत्यंत जिवलग अशी सहकारी पारो हिचा मृत्यू झाला. पारोच्या या अकाली एक्झिटने रॉबर्ट अत्यंत दुःखी झाला. देश, धर्म, भाषा, सामाजिक बंधने या सर्वांच्या पलीकडे जाऊन पारोने रॉबर्टला खूप सहकार्य केले होते. सन १८४५ ते १८५६ या ११ वर्षांच्या सहजीवनातून त्यांना कुठलेही अपत्य झाले नाही किंवा होणार होते असाही उल्लेख दिसून येत नाही, परंतु पारोबद्दल असलेल्या अत्यंत प्रेमापोटी रॉबर्टने सिल्लोड तालुक्यात अजिंठा गावच्या दिल्ली गेटवर डब्ल्यू. हिरोन या शिल्पकाराकडून तिची कबर बांधली. ‘टू द मेमरी ऑफ माय बिलव्हेड पारो हू डाईड ऑन २३ मे १८५६’ अशा ओळी तिच्या कबरीवर लिहिल्या आहेत.

त्यानंतर पारोच्या विरहाने रॉबर्ट गिल दुःखात आरपार बुडाला हे अर्धसत्य आहे. कारण वयाच्या ५२व्या वर्षी सन १८५६ला तो अजिंठा येथे असताना पुन्हा अ‍ॅनीनामक स्री त्याच्या सहवासात आल्याचे दिसून येते. अ‍ॅनीने रॉबर्टच्या सहजीवनातून २६ फेब्रुवारी १८६६ला मिल्ड्रेड मेरी गिल या मुलीला व त्यानंतर रॉबर्ट (बन्नी) गिल या मुलाला मुंबई येथे जन्म दिला असल्याच्या नोंदी आहेत. सन १८५७ला त्याने स्वतःहून फोटोग्राफीचा अभ्यास सुरू केला.

याच कालखंडात त्याने अजिंठ्याची २९ चित्रे साकारली. त्यातलं शेवटचं चित्र जुलै १८६३ला त्याने पूर्ण केलंय. डिसेंबर १८६६ला तो अजिंठ्यात असताना त्याची चित्रे जळाली. त्यातली सन १८५० ते १८५४ या कालखंडातील शिल्लक राहिलेली पाच चित्रे आजही पाहायला मिळतात. अजिंठ्याची चित्रकला आणि त्या अनुषंगाने रॉबर्ट गिलच्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात घडलेल्या घटना हा त्याच्या आयुष्यातील एक टप्पा आहे. मुळात चित्रकाराची प्रतिभा असलेला पण सैनिकी पेशा स्वीकारून भारतात आलेला मेजर रॉबर्ट गिल, अजिंठ्याच्या सान्निध्यात भारतीय चित्र-शिल्पकला त्यातील सर्वसमावेशक परंपरांमुळे झपाटून गेला होता.

त्याबद्दल कवी कुसुमाग्रज म्हणतात की, रॉबर्ट गिल अजिंठ्याच्या दर्शनाने झपाटून गेला होता. खांद्यावरची बंदूक त्याने बाजूला टाकली आणि रंगांचा कुंचला हातात घेतला. भारतातील एका डोंगराच्या कडेकपारीतील ही अद्भुत चित्रे त्यांच्या प्रतिकृती करून सर्व जगातील रसिकांसमोर मांडावीत आणि आपल्या अनुभवात त्यांना सामील करून घ्यावे ही गिलची आकांक्षा होती. त्यामुळे भारतीय पुरातन वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला यांचा अभ्यास करताना त्याने फोटोग्राफीच्या क्षेत्रात केलेली कामगिरी भारताच्या दृष्टीने दुर्लक्षित करण्यासारखी नाही.

सन १८६३ला त्याने स्टेरीओग्राफिक प्रकाशचित्रांची २०० दृश्ये लंडनला पाठवली होती. या प्रकाशचित्रांच्या (फोटोग्राफ्स) माध्यमातून अजिंठा, वेरूळ, खान्देशातील, पश्चिम विदर्भातील लोणार सरोवर, मुक्तगिरी, हेमाडपंती मंदिरे, किल्ले, मुस्लीम वास्तुकला यांची प्रकाशचित्रे काढून भारतातील हा विशाल सांस्कृतिक वारसा जगासमोर आणला. त्याची नोंद ब्रिटिश लायब्ररीने घेतली आहे. आजही ब्रिटिश लायब्ररीच्या ऑनलाईन वेबसाईटवर ही प्रकाशचित्रे शेकडोंच्या संख्येने उपलब्ध आहेत. रॉबर्ट गिलचे काम केवळ अजिंठा या विश्वविख्यात नावापुरते सीमित ठेवणे उचित ठरणार नाही. लोणार या जगप्रसिद्ध सरोवराची, अमरावतीच्या जवळ मेळघाटात असलेल्या जैन तीर्थक्षेत्र मुक्तगिरीच्या मंदिर-शिल्पसमूहाची सचित्र ओळख जगाला करून देणारा रॉबर्ट गिल हा जगातला पहिला प्रकाशचित्रकार आहे.

तो सन १८७१-७२ला भुसावळला राहायला गेला. त्याकाळी भुसावळ हे छोटेसे खेडेवजा शहर होते. रेल्वेचे जंक्शन असल्यामुळे इंग्रजांची ये-जा सतत होत असे. त्यामुळे एक मिशनरी दवाखाना व कॅथोलिक चर्चही तेथे अस्तित्वात होते. म्हणून त्याकाळी रॉबर्ट गिलने भुसावळलाच राहणे पसंत केले असावे. त्याचे निवासस्थान तापी नदीजवळ असलेल्या रेल्वे दवाखान्याजवळ होते.

एप्रिल १८७९च्या पहिल्या आठवड्यात चैत्रातल्या कडक उन्हाळ्यात भुसावळच्या मिशनरी दवाखान्यात रॉबर्ट गिल उष्माघाताने फणफणत होता. प्रकाशातून सौंदर्याचा वेध घेणारे त्याचे डोळे बंद पापण्यांनी अंधाराच्या गर्द गर्भात कसली स्वप्ने पाहत होती हे समजायच्या आत १० एप्रिल १८७९ला त्या अंधाराच्या गर्द गर्भात तो कायमचा चेतनाहीन, संवेदनाहीन झाला. त्यावेळी अजिंठ्यातील पाषाणमय देवतांनी आणि यक्षगंधर्वांनी आपल्या पापण्याही पुसल्या असतील. त्याच्या निधनानंतर रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या कॅथोलिक चर्चच्या दफनभूमीत त्याचं दफन करण्यात आलं.

तेथे त्याचे थडगे आजही आहे. त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना ह्या चैत्रातच (एप्रिल आणि मे) घडल्या आहेत. म्हणून चैत्राच्या लख्ख प्रकाशाचं आणि त्याचं नातं मृत्यूपर्यंत कायम राहिलं, पण त्या चैत्रात मात्र तो कायमचा अंधार बनून राहिला आहे. नुकत्याच झालेल्या व्हॅलेंटाईन डेला मी त्याच्या थडग्याजवळ जाणीवपूर्वक गेलो होतो. सर्वत्र लक्ष-लक्ष प्रकाशकिरण पडलेले असताना त्याच्या या थडग्यात मात्र अंधार होता. वर रात्र असो वा दिवस तिथं फक्त अवस असते. सर्वत्र रंगांची आतषबाजी सुरू असताना हा मात्र अंधार बनून राहिला आहे. किती वर्षे लोटली? अजून किती शिल्लक आहेत मित्रा? तप्त प्रकाश लेवून चैत्राचे दिवस आले की मी मनाने तुझ्या थडग्याभोवती घिरट्या घालू लागतो.

-(लेखक शासनाच्या माहिती जनसंपर्क विभागात जिल्हा माहिती अधिकारी आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -