घरफिचर्ससारांशविलुप्त सरस्वतीचा टाहो!

विलुप्त सरस्वतीचा टाहो!

Subscribe

सरस्वतीचा उल्लेख हिंदूंच्या सर्व पौराणिक ग्रंथांत आढळून येतो. याशिवाय प्रामुख्याने ऋग्वेदात सरस्वतीचे वर्णन आले आहे. ऋग्वेदानुसार सरस्वती नदी यमुनेच्या पश्चिमेला आणि सतलजच्या पूर्वेला वाहणारी नदी होती. तांडय आणि जैमिनीय ब्राह्मणसारख्या वैदिक ग्रंथात सरस्वती नदी वाळवंटात विलुप्त झाल्याचे वर्णन येते. महाभारत काळात प्लक्षवती, वेद्स्मृती, वेदवती या नावाने प्रचलित असलेली सरस्वती वाळवंटातील विनाशन नावाच्या प्रदेशात लुप्त झाल्याचे वर्णन आहे.

-संजीव आहिरे

भारतीय नद्यांच्या शृंखलेत आज आपण अशा नदीची चर्चा करणार आहोत जी एक पौराणिक आणि वेदांमध्ये चर्चित नदी होती. ती एक अशी नदी होती जी सदैव सुजला होती आणि तिच्या किनार्‍यावर प्रचुर अन्नाची उत्पत्ती होत होती. हिमाचल प्रदेशातील सिरमौर पर्वतीय भागातून उगम पावून अंबाला, कुरुक्षेत्र, कैथलमधून वाहत पटियाला राज्यात प्रवेश करीत कांगार नदीत ती विलीन होत असे. काही मतप्रवाहानुसार ही नदी प्रयागजवळ येऊन गंगा-यमुनेच्या संगमात विलीन होऊन त्रिवेणी संगम घडवत होती, अशी ही कोणती नदी होती?

- Advertisement -

जिचे वर्णन खूप ऐकावयास मिळते, परंतु वर्तमान युगात तिचे प्रत्यक्ष अस्तित्व मात्र नाही. ती नदी म्हणजे विलुप्त झालेली सरस्वती नदी होय. काळाच्या प्रवाहात सरस्वती या सर्व ठिकाणांवरून अंतर्धान झाली. आज सरस्वतीच्या अनंत आठवणी फक्त आमच्याजवळ आहेत. प्रत्यक्षात एकेकाळची सदानिरा, सुजलाम, सुफलाम प्रदेश बनवणारी आणि अभिजात्य संस्कृतीची पोशिंदी सरस्वती आम्ही प्रत्यक्ष पाहू शकत नाही. विलुप्तप्राय सरस्वती विज्ञान युगातील वर्तमान माणसांना भविष्याचा इशारा देण्यासाठी तर विलुप्त झाली नसेल ना?

पौराणिक अस्तित्व – सरस्वतीचा उल्लेख हिंदूंच्या सर्व पौराणिक ग्रंथांत आढळून येतो. याशिवाय प्रामुख्याने ऋग्वेदात सरस्वतीचे वर्णन आले आहे. ऋग्वेदानुसार सरस्वती नदी यमुनेच्या पश्चिमेला आणि सतलजच्या पूर्वेला वाहणारी नदी होती. तांडय आणि जैमिनीय ब्राह्मणसारख्या वैदिक ग्रंथात सरस्वती नदी वाळवंटात विलुप्त झाल्याचे वर्णन येते. महाभारत काळात प्लक्षवती, वेद्स्मृती, वेदवती या नावाने प्रचलित असलेली सरस्वती वाळवंटातील विनाशन नावाच्या प्रदेशात लुप्त झाल्याचे वर्णन आहे.

- Advertisement -

आजच्या भूवैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार हरियाणा आणि राजस्थानमधून वाहणारी आणि सध्या शुष्क झालेली घग्गर-हाकरा नावाची जी नदी आहे तीच प्राचीन सरस्वतीची मुख्य सहाय्यक नदी होती. याशिवाय दोन अन्य विलुप्त नद्या दृष्टावती आणि हिरण्यवती यासुद्धा सरस्वतीच्या सहाय्यक असल्याचे आढळून आले आहे. जवळजवळ १९०० इ. पूर्व भूगर्भीय बदलांमुळे यमुना आणि सतलूज या नद्यांनी आपला प्रवाह बदलला. दृष्टावती नदीचा प्रवाह संपुष्टात आला.

या बदलांच्या परिणामस्वरूप सरस्वती नदी विलुप्तीच्या गहन अंधकारात ढकलली गेली. वैदिक काळातील ही एक प्रमुख आणि विशाल नदी होती. तिला नदित्तमा नावाने संबोधित केले जात असे. वैदिक सभ्यतेनुसार आज जसे आपण गंगेला मानतो तेवढेच किंबहुना त्याहीपेक्षा मोठे स्थान त्याकाळी सरस्वती नदीला प्राप्त झाले होते. इस्रोच्या संशोधनानुसार सरस्वती नदी आजही हरियाणा, पंजाब आणि राजस्थान या राज्यांतून भूमिगत स्वरूपात प्रवाहित आहे.

यजुर्वेदाच्या वाजस्नेही संहितेनुसार सतलज, रावी, व्यास, चिनाब आणि दृष्टावती या पंजाबच्या पाच नद्या प्राचीन सरस्वती नदीला येऊन मिळत असत. आजही त्यांच्या संगमांचे कोरडे अवशेष राजस्थानच्या बाडमेर आणि जैसलमेर जिल्ह्यातील पंचभद्र तीर्थ या ठिकाणी पाहावयास मिळतात. वाल्मिकी रामायणात भरत कैकय देशातून अयोध्येला येताना गंगा आणि सरस्वती नदी पार करून आल्याचा उल्लेख आहे.

सरस्वती विलुप्त का झाली? – शिवालिक पर्वतरांगांच्या खालच्या भागात आदिबद्री या ठिकाणावरून प्रसवणार्‍या प्राचीन सरस्वतीच्या प्रवाहाच्या खाणाखुणा आजही आढळून येतात. कुरुक्षेत्र आणि पेहवा या ठिकाणी अनेक अर्धचंद्राकार आकाराची कोरडी सरोवरे आजही सरस्वतीची साक्ष देतात. सरस्वती या नावातूनच सरोवर हा शब्द उदयास आला आहे.

भूगर्भ विज्ञानाच्या संशोधनानुसार प्राचीन काळी या क्षेत्रात झालेल्या भीषण भूकंपांमुळे जमिनीच्या आतील भागातील डोंगर उफाळून वरती आले आणि सरस्वती नदीचा प्रवाह मागच्या बाजूस ढकलला गेला. हरियाणातून वाहणारी सरस्वतीची मुख्य सहाय्यक दृश्यवती नदीचा प्रवाह या भूकंपांमुळे उत्तर आणि पूर्व दिशेला परिवर्तीत झाला. तीच दृश्यवती नदी आज यमुना नावाने ओळखली जाते.

सरस्वतीचा वळलेला प्रवाह यमुनेत विलीन झाला. तीच यमुना आज प्रयागराज येथे गंगेला येऊन मिळते. यमुनेबरोबर सरस्वतीचा प्रवाहही यमुनेच्या रूपात गंगेला मिळतो, म्हणून तीर्थराज प्रयागला आजही त्रिवेणी संगम या नावानेच ओळखले जाते आणि सरस्वती गुप्त रूपात येऊन प्रयागचा त्रिवेणी संगम घडवते असे मानले जाते. प्रयागचा हा त्रिवेणी संगम हिंदूंचे सर्वात मोठे पवित्र तीर्थस्थळ आहे.

हडप्पा संस्कृती आणि सरस्वती – ऐतिहासिक मान्यतेनुसार हडप्पा संस्कृती सिंधू नदीची देण मानली जाते, परंतु वास्तव स्वरूपात हडप्पा संस्कृतीच्या ज्या २६०० वस्त्या आढळून आल्या आहेत त्यातील फक्त २६५ वस्त्या सिंधू नदीच्या तटावरील आहेत. उरलेल्या अनेक वस्त्यांचे अवशेष सरस्वतीच्या किनार्‍यावर असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सिंधू सभ्यता ही केवळ सिंधू नदीचीच देण नसून मुख्यत: सरस्वती नदीचेही योगदान सिंधू सभ्यता निर्माण होण्यात राहिले आहे ही महत्त्वाची बाब आहे. यावरून प्राचीन काळी सरस्वती नदी किती महत्त्वाची नदी होती हे स्पष्ट होते.

सरस्वतीच्या अस्तित्वाचे पुरावे – सरस्वती खरोखर अस्तित्वात होती का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. ऋग्वेदातील पुरावे, सिंधू संस्कृतीचे जन्मस्थान या प्राचीन दस्तावेजाखेरीज खरोखर सरस्वती प्रयागला जाऊन गंगा आणि यमुनेशी संगम करते का? हा आजही संशोधनाचा विषय आहे. असे असले तरी आजही प्रयागराज येथे जो त्रिवेणी संगम घडतो तो गंगा-यमुना सरस्वतीचाच आहे अशी मान्यता आहे.

सरस्वती आजही विलुप्त स्वरूपात वाहत असून गंगा यमुनेशी मिळून त्रिवेणी संगम घडवते अशी धारणा आहे. या धारणेची पुष्टी महाभारत काळातील काही घटनांच्या आधारे केली जाऊ शकते. बलरामाने द्वारकेहून मथुरेची यात्रा सरस्वती नदीच्या सहाय्याने केल्याचा उल्लेख महाभारतात आढळतो. याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर यादव सैन्याचे पार्थिव देह सरस्वती नदीत विसर्जित केल्याचाही उल्लेख येतो. यावरून सरस्वती नदी ही एक विशाल आणि प्रचंड जलप्रवाह असलेली नदी असल्याचे दृष्टिपथास येते. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातून सरस्वती नदी वाहत असल्याचे ठोस प्रमाण केंद्रीय जल बोर्डाच्या शास्त्रज्ञांना मिळाले आहेत.

दोन हजार वर्षांपूर्वी झालेल्या भूगर्भीय परिवर्तनामुळे ज्या एका नदीचा प्रवाह विलुप्त झाला ती नदी म्हणजे सरस्वती नदी होती असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भूगर्भीय बदलांमुळे सरस्वतीचा बराचसा प्रवाह यमुनेत सामील झाला. त्यामुळे यमुनेसोबतच सरस्वती विलुप्त स्वरूपात वाहते. यमुनेबरोबर वाहत येऊन प्रयागला या तिन्ही नद्यांचा संगम होतो. तोच प्रयागराजचा त्रिवेणी संगम आहे.

विलुप्त सरस्वतीचा संदेश – आज भारतीय नद्यांची दुर्दशा कोणापासून लपून राहिलेली नाही. नद्या ह्या फक्त गावे आणि शहरांचा मैला समुद्राला वाहून नेण्याचे साधन बनल्या आहेत. दिवसेंदिवस नद्यांची परिस्थिती विक्राल होत चालली आहे आणि बर्‍याचशा तर शेवटच्या घटका मोजत आहेत. भारतवर्षात वाहणार्‍या लहान मोठ्या २०० नद्यांपैकी अधिकतर नद्या आज मरणासन्न अवस्थेत आहेत.

मानवी कुकर्मांनी वेढलेल्या आणि ग्रासित झालेल्या या सर्व नद्यांनी सरस्वतीचा पंथ धरला तर पृथ्वीवर काय अवस्था निर्माण होईल हा मोठाच विचारणीय प्रश्न आहे. नद्यांना जगण्यासारखी परिस्थिती माणसांनी राहू दिली नाही हे ज्वलंत वास्तव आहे. अशा परिस्थितीत भारतातल्या सर्व नद्यांनी उद्या आत्महत्या करण्याचा विचार केला तर? प्रश्न भयावह आणि अस्तित्वाला कापरे भरवणारा आहे. सोबत विलुप्त सरस्वतीचे उदाहरण आपल्यासमोर आहेच.

समाधान – वर्तमान परिस्थिती निकराची आहे. मग आपण या नद्या वाचवण्यासाठी काय करणार आहोत? मित्रांनो, ही अटीतटीची वेळ आहे. सर्व नद्यांच्या आणि पर्यायाने आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. नद्या निर्मळ वाहतील तर जीवन राहील हे साधेसरळ गणित आहे. सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि राजकीय नेते आणि पक्षांना जाब विचारण्याची हीच नेमकी वेळ आहे.

अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांनी त्यांच्या घोषणापत्रात त्या त्या भागातील नदीच्या पर्यावरणाचा आणि प्रवाहाचा मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर घेतला आहे की नाही हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे, नव्हे राजकीय नेत्यांकडे जनतेची ही प्रमुख मागणी हवी. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच निरोगी, सदनिरा नदी असली तरच अस्तित्वाची ग्वाही दिली जाऊ शकते अन्यथा कल्पनाच केलेली बरी. त्यामुळे जनतेने नद्यांबाबत सतर्क होऊन आता सरकारलाही कामाला लावायला हवं. हीच ती वेळ आहे.

चिंघाड रही है विलुप्त सरस्वती
इस पृथ्वी को बचावो रे
कलकल बहती नदिया खातिर
कुछ तो कदम उठावो रे
मेरे जैसी विलुप्त कहानी
अब तो मत दोहराओ रे
देख रही हुं नदियो कि हालत
इतना मत सताओ रे
नदीया का जमी से विलुप्त हो जाना
मतलब है सब लुप्त हो जाना
अस्तित्व तुम्हारा बचा रहे इसलिये
अपनी अपनी नदिया संभालो रे
चाहे जो कुछ भी हो जाये
अपनी नदीया को मत गवाओ रे
चट्टानो से आवाजे आ रही
नादियो को मत सताओ रे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -