घरफिचर्ससारांशमाहितीचे रूपांतर ज्ञानात व्हायला हवे! 

माहितीचे रूपांतर ज्ञानात व्हायला हवे! 

Subscribe

शिक्षणाची वाट आजही पुस्तककेंद्रित स्वरूपातच कायम आहे. पुस्तकात केवळ माहिती साठवलेली आहे. त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर होण्यासाठीची वाट चालावी लागते. ती वाट आपण चालू शकलो नाही हे वास्तव आहे. ज्ञानाची वाट निर्माण झाल्याशिवाय आपण विवेकाची वाट चालू शकणार नाही. शिक्षणातून विवेकीवृत्ती पेरण्यात आपल्याला अपयश आले तर विवेकशील समाज कसा निर्माण करता येईल. मुळात विवेकाची वाट चालणारा समाज निर्माण करणे आपण मानतो तितके सोपे नाही. शिक्षणातून विवेकपूर्ण निर्णयाची अपेक्षा आहे. समाज शिक्षित आणि विवेकी बनला तरच विवेकी निर्णयाची अपेक्षा करता येईल.

-संदीप वाकचौरे
शिक्षण नेमके कशासाठी दिले जाते, असा प्रश्न विचारला गेला तर बरीच उत्तरे मिळतील. शिक्षणाचा मूलभूत अर्थच गेल्या काही वर्षांत बदलत चालला आहे. कधीकाळी शिक्षणातून माणूस घडवणे, मूल्यांची पेरणी करणे, जागतिक नागरिक घडवणे अपेक्षित आहे, असे म्हटले जात होते. आज हे शब्द शिक्षणाच्या प्रवासात कानी पडणे कठीण झाले आहे. शिकणे म्हणजे केवळ पदवीच्या प्रमाणपत्रावर मार्क मिळवणे झाले आहे. पदवीस जे मार्क मिळाले आहेत त्या मार्कांइतक्या क्षमता प्राप्त करण्याचा विचारही हरवत चालला आहे.
आज ज्या विषयात सर्वाधिक मार्क मिळाले आहेत त्या विषयातील काही घटकांवरील प्रश्न परीक्षेनंतर अवघ्या काही महिन्यात विचारले तर पुन्हा त्याची उत्तरे सांगता येत नाहीत. चांगले काय आणि वाईट काय? सत्य काय आणि असत्य काय? उत्तम काय आणि दर्जाहीन काय? मूल्य, कौशल्य, ज्ञान, माहिती, संकल्पना, गाभाघटक यांचाही विचार वर्तमानात दिसत नाही. शिक्षणातील मूळ गाभाच हरवत चालल्याचे दिसत आहे. शिक्षण म्हणजे केवळ साक्षरता इतकाच काय तो अर्थ उरला आहे. त्यामुळे एकीकडे मार्कांचा आलेख उंचावलेला विद्यार्थी आणि दुसरीकडे शिक्षणाचा अर्थ हरवत चाललेली व्यवस्था असे विषम चित्र आपल्याला अनुभवास येत आहे.
शिक्षणाविषयी सातत्याने विविध आयोग येतात, धोरणे येतात. त्यात उच्चतम अपेक्षा केलेल्या असतात. त्यातील तत्त्व आणि मूल्यांचा विचार तर केवळ कागदावरच उमटलेला दिसतो. कागदावरील अपेक्षा मस्तकातून प्रत्यक्ष कृतीद्वारे केव्हा उमटताना दिसतील? शिक्षणासंदर्भाने केलेल्या अपेक्षा पूर्णत्वाला कधी जाणार, हा खरा प्रश्न आहे. वर्तमानातील समाजात दिसणारे प्रश्न आणि असलेल्या स्थितीचा विचार करता त्यामागे आपल्या शिक्षणाचे अपयश हेच कारण आहे.
त्यामुळे शिक्षणातून मूलभूत स्वरूपाच्या अपेक्षा पूर्णत्वाला गेल्याशिवाय आपण उत्तम समाज व राष्ट्र निर्माण करू शकणार नाही. त्या दृष्टीने नुकताच प्रकाशित झालेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात काही मुख्य तत्त्वांचा विचार मांडण्यात आला आहे. त्या तत्त्वांच्या दिशेची वाट चालण्याची अपेक्षा आहे, मात्र गेली ७५ वर्षे ती वाट आपण चालू शकलो नाही हेही यानिमित्ताने समोर येत आहे. शिक्षणाची वाट आजही पुस्तककेंद्रित स्वरूपातच कायम आहे.
पुस्तकात केवळ माहिती साठवलेली आहे. त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर होण्यासाठीची वाट चालावी लागते. ती वाट आपण चालू शकलो नाही हे वास्तव आहे. ज्ञानाची वाट निर्माण झाल्याशिवाय आपण विवेकाची वाट चालू शकणार नाही. शिक्षणातून विवेकीवृत्ती पेरण्यात आपल्याला अपयश आले तर विवेकशील समाज कसा निर्माण करता येईल. मुळात विवेकाची वाट चालणारा समाज निर्माण करणे आपण मानतो तितके सोपे नाही. शिक्षणातून विवेकपूर्ण निर्णयाची अपेक्षा आहे.
समाज शिक्षित आणि विवेकी बनला तरच विवेकी निर्णयाची अपेक्षा करता येईल. दुर्दैवाने विवेकी विचाराची वृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न शिक्षणातून करण्यात आला असला तरी ती वाट चालणारा समाज निर्माण करण्यात शिक्षण प्रक्रियेला अपयश आले आहे. समाजात विवेक, शहाणपणाची निर्मिती होऊ शकली नाही. कदाचित हुशारीचे दर्शन निश्चित घडत आहे, मात्र विवेकाची वाट ही प्रामाणिकता, सत्य, शहाणपणाची असते. आज या वाटा दुर्मीळ होत चालल्या आहेत. जेव्हा या वाटा दुर्मीळ होतात तेव्हा समाजाचा र्‍हासाचा मार्ग निर्माण झाला आहे असे समजावे.
 विवेक असलेली माणसं सृजनाच्या वाटा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. विवेकी माणसं नवनिर्मिती करण्यासाठी पावले टाकत असतात. नवविचार महत्त्वाचा मानला जात असतो. खरंतर सृजनाची वाट ही अधिक महत्त्वाची आहे. माणूस शिक्षित आहे म्हणजे त्याला नववाटांची आस आहे असे घडायला हवे. वर्तमानात शिक्षण घेतलेली माणसं मळलेल्या वाटेने चालण्याचा सर्वाधिक प्रयत्नच करीत आहेत. दुर्दैवाने अनुकरणप्रियता हीच आपल्या समाजाची वाट बनत चालली आहे.
शिक्षणातून अपेक्षा करताना समस्या निराकरणाची शक्ती प्रदान करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे वर्तमानात समस्या निराकरणाचा विचारही महत्त्वाचा ठरतो. आज शिक्षणातही समस्या आहेतच. त्याही निराकरणाचा विचार केला जात असला तरी त्याही दूर सारता आल्या नाहीत. व्यवस्थेत तर समस्यांचा महापूर आहे. व्यक्तिगत जीवनातही अनेक समस्या आहेत, मात्र त्यावर मात करण्याऐवजी त्या निराकरणासाठी प्रयत्न करण्याची दृष्टी पेरण्यात आपल्याला पुरेसे यश मिळू शकले नाही. समस्या आहेत, त्या सोडवल्या जाऊ शकतात.
त्यामुळे त्याचे निराकरण करायचे असेल तर त्यावर विचार करण्याची गरज आहे. मुळात विचार करायला शिकवण्याच्या दृष्टीने शिक्षणातील पेरणी महत्त्वाची आहे. शिक्षणात काय शिकायचे यापेक्षा कसे शिकायचे हा विचार रूजण्याची गरज आहे. आज शिकण्यावर भर आहे, पण कसे शिकायचे या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे विचार करण्याची सवय नाही. कोणीतरी सांगते ते ऐकायचे आणि त्यानुसार पुढे चालायचे. त्यामुळे समस्या निर्माण झाली तरी
त्यासंदर्भाने विचार करावासा वाटत नाही. प्रत्येक वेळी समस्येवर मात करण्यासाठी स्वत: विचार करण्याचा प्रयत्न होत नाही. त्यासाठी आहे त्या समस्येकडे अनेकदा दुर्लक्ष करण्याचा पर्याय स्वीकारणे घडते. मुळात समस्या निराकरण करण्याबरोबर समस्येशी दोन हात करण्यासाठीचा विचारही केला जात नाही. समस्यांवर मात करण्याबरोबर संघर्षाची शक्तीदेखील गमावून बसले आहे. शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत.
दिवसेंदिवस हे प्रमाण कमी होण्याची गरज असताना त्यात वाढ होताना दिसत आहे. शिक्षणाने समस्या दूर करण्याची शक्ती मिळणार नसेल तर ते शिक्षण कुचकामी आहे, असेच म्हणावे लागेल. राष्ट्रीय शिक्षण धोरणात समस्या निराकरण करण्याची शक्ती शिक्षणातून मिळण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. खरंतर शिक्षण प्रक्रियेत या स्वरूपातील अपेक्षा ही शिक्षणाच्या पहिल्या पावलापासूनच अपेक्षित आहे आणि ती काही चुकीची नाही.
शिक्षणात संकल्पना आधारित अध्यापनाची गरज गेली अनेक वर्षे व्यक्त होत आहे. शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आला तेव्हाच ज्ञानरचनावादाचा विचार प्रतिपादन करण्यात आला होता. तेव्हापासून माहितीसंपन्न अध्यापनाकडून संकल्पनाधारित अध्यापनाकडील प्रवासाची अपेक्षा करण्यात आली आहे. ती वाट चालण्याचा प्रयत्न करण्याबरोबर संकल्पनात्मक आकलनाचा विचार करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे, मात्र त्या दृष्टीने आपला प्रवास होताना दिसत नाही. तो व्हायला हवा.
आपला प्रवास बौद्धिक विकासाच्या दिशेने होत असला तरी मूल्यांचा विचारही महत्त्वाचा ठरतो. नैतिकता आणि मानवी मूल्यांचा विचार वर्तमानात महत्त्वाचा ठरत आहे. वर्तमानात मूल्याचा विचार सापेक्ष ठरू लागला आहे. तो धोक्याचा इशारा मानायला हवा. मूल्य हे स्थल, कालपरत्वे बदलत नाही. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, सहकार्य, संवेदनशीलता या मूल्यांचा विचार महत्त्वाचा आहे, पण सत्य आणि अहिंसेचा विचार जर सोयीने ठरणार असेल तर त्याचा उपयोग नाही. हिंसा कोणतीही असली तरी निषेधार्हच असायला हवी.
जेव्हा मूल्यसापेक्ष ठरू लागतात तेव्हा त्याचा परिणाम समाजमनावर होत नाही. संविधानिक मूल्यांचा विचार वर्तमानात गरजेचा वाटू लागला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय ही मूल्ये लोकशाहीचा विचार आबाधित ठेवण्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर इतरांबद्दल आदर, स्वच्छता, सौजन्य, लोकशाहीची भावना, सेवेची भावना, सार्वजनिक मालमत्तेचा आदर, विज्ञानाची ओढ, स्वातंत्र्य, जबाबदारी, विविधता, समानता आणि न्याय रुजवणे या गोष्टी महत्त्वाच्याच आहेत. हे जेव्हा घडेल तेव्हाच उत्तम समाजाच्या दिशेने प्रवास घडेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -