घरफिचर्ससारांशपितृपक्षातील हाडपक्या गणपती उत्सव

पितृपक्षातील हाडपक्या गणपती उत्सव

Subscribe

पितृपक्षामध्ये धार्मिक कार्यक्रमासह पारिवारिक कार्यक्रम किंवा शुभकार्य करणे टाळले जाते, परंतु पितृपक्षाच्या काळातही प्रामुख्याने विदर्भात २६८ वर्षांपासून हाडपक्या (मस्कर्‍या) गणपती उत्सव साजरा करण्यात येतो. यामागेसुद्धा ऐतिहासिक परंपरा व संस्कृती आहे. नागपुरातील प्राचीन परंपरेतील ऐतिहासिक उत्सव म्हणजे ‘हाडपक्या गणपती’. हा उत्सव गणेशोत्सव संपल्यानंतर सुरू होतो. नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत हाडपक्या गणपती उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. हा गणपती उत्सव घरघुती स्वरूपाचा नसून सार्वजनिक स्वरूपाचा असतो. पूर्वी मोठ्या प्रमाणात सार्वजानिकरीत्या हा उत्सव साजरा होत असत, परंतु कालांतराने आता काही मोजक्याच ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. विदर्भात पितृपक्षाला ‘हाडपक’ असेही म्हणतात. म्हणून हाडपकात बसविलेल्या गणपतीला ‘हाडपक्या गणपती’ असेही संबोधले जाते.

–रमेश लांजेवार

राजे भोसले यांचे नागपुरात आगमन झाल्यानंतर अनेक प्रथा व परंपरांची सुरुवात झाली. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरगुती गणेशोत्सवाला सुरुवात होते व याला मोठे सार्वजनिक स्वरूपसुद्धा दिले जाते आणि हा उत्सव १० दिवस चालतो. घरगुती गणेश विसर्जन झाल्यानंतर जी पितृपक्षातील चतुर्थी येते, त्या कृष्णपक्ष संकष्ट चतुर्थीला हाडपक्या गणपतीची स्थापना केली जाते. इ. स. १७५५ मध्ये नागपुरातील भोसले घराण्यातील तत्कालीन राजे श्रीमंत खंडोजी महाराज भोसले उर्फ चिमनाबापू हे बंगालच्या स्वारीवर होते.

- Advertisement -

बंगालवर ऐतिहासिक विजय मिळवून परत येत असताना कुळाचारी गणपतीचे विसर्जन झाले होते. त्यामुळे श्रीमंत खंडोजी महाराज भोसले गणपती उत्सव साजरा करू शकले नाही. त्यावेळी राजपुरोहित व अन्य विद्वानांसोबत चर्चा करून पितृपक्षातील भाद्रपद कृष्ण चतुर्थी (भाद्रपद संकष्टी चतुर्थी)ला गणपती उत्सव साजरा करण्याचे ठरविले आणि त्यासोबत बंगालवर ऐतिहासिक विजय मिळविण्याचा आनंदोत्सवसुद्धा सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याचे ठरविले. तेव्हापासून हाडपक्या गणपतीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे याला विजयोत्सवसुद्धा म्हणता येईल.

याकाळात लावण्या, नकला, भारूड, खडीगंमत इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असे. यावेळी अनेक गमतीजमतीचे कार्यक्रम होत असत त्यात थट्टा, मस्करी, नाटक खडी गंमत इत्यादींचा भडीमार होत असत म्हणजेच कार्यक्रमाच्या माध्यमातून मस्करी व्हायची यातूनच यातूनच ‘मस्कर्‍या’ हे स्थानीय बोलीभाषेतील नाव प्रचलित झाले आणि पितृपक्षातील गणपतीला ‘मस्कर्‍या गणपती’ नावाने प्रसिद्ध मिळाल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

असे म्हणतात की लोकमान्य टिळकांनी याच गणपती उत्सवाची प्रेरणा घेऊन भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीला गणपती उत्सव सार्वजानिक स्वरूपात साजरा करण्याचे ठरविले आणि यातूनच त्यांनी स्वातंत्र्याचा लढा उभा केला. हाडपक्या गणपती उत्सवाचा मुख्य सोहळा नागपुरातील भोसले राजवाडा, महाल येथे आयोजित करण्यात येतो. या उत्सवाला आज २६८ वर्षे पूर्ण होत आहेत म्हणजेच ही ऐतिहासिक परंपरा आहे. श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले यांच्या काळात हाडपक्या गणपतीची स्थापन केली जात होती. तीच परंपरा आजही आपल्याला पहायला मिळते. त्याच प्रकारची मूर्ती स्थापन करण्यात येते.

त्याकाळी लावण्या, पोवाडे, खडी गंमत इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जायचे, परंतु आता कालांतराने वेगवेगळे मनोरंजनात्मक कार्यक्रम आले. यात आर्केस्ट्रा, सुगम संगीत, नाटक, नवीन पिढीला आनंद देणार्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. हा उत्सव सलग १० दिवस साजरा करण्यात येतो. यादरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो व भाद्रपद कृष्ण द्वादशीला गणपती उत्सवाची सांगता होते आणि हाडपक्या गणपतीचे विसर्जन करण्यात येते. यामुळे लक्षात येते की भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सणाला व उत्सवाला अत्यंत महत्व असते. मग तो कोणत्याही धर्माचा उत्सव असो. यातूनच आपली जडणघडण व विविधता दिसून येते, आपण परीपक्व होतो व आपल्या परिवाराला संस्कृतीतून चांगली चालना मिळते. यामुळेच आज संपूर्ण जग भारतीय संस्कृतीकडे आकर्षित झाल्याचे दिसून येते. ही भारतासाठी गौरवास्पद बाब आहे. गणपती बाप्पा मोरया!

–(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -