घरफिचर्ससारांशधर्मसंस्थापक आणि महापुरुषांच्या दृष्टिकोनातून स्त्री

धर्मसंस्थापक आणि महापुरुषांच्या दृष्टिकोनातून स्त्री

Subscribe

डॉ. मंगला आठलेकर यांनी लिहिलेलं आणि मेनका प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेलं ‘महापुरुषांच्या नजरेतून स्त्री’ हे पुस्तक ऑगस्ट २००९ मध्ये प्रसिद्ध झालं. या पुस्तकात एकूण अकरा प्रकरणे आहेत. त्यातल्या चार प्रकरणांतून हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लीम या धर्मातलं स्त्रीचं स्थान आणि या धर्माच्या धर्मसंस्थापकांचे स्त्रीविषयक विचार याची सविस्तर चर्चा केली आहे. उर्वरित सात प्रकरणांत समाजसुधारक व महापुरुषांच्या नजरेतून दिसून येणारी स्त्री चित्रीत केली आहे. हे थोर पुरुष म्हणजे महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, महर्षी कर्वे, महात्मा गांधी, महर्षी वि. रा. शिंदे, रघुनाथ धोंडो कर्वे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. पुस्तकाला दस्तुरखुद्द लेखिकेनेच दीर्घ आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. या पुस्तकातले लेख मेनका प्रकाशनाच्याच ‘माहेर’ या मासिकातल्या सदरात प्रसिद्ध झाले आहेत.

–डॉ. प्रवीण घोडेस्वार

‘स्त्रीची दुय्यमता, तिचं कनिष्ठपण हे शतकानुशतकं समाजाच्या मनावर इतकं खोलवर, जोरदारपणे आणि तेही पापपुण्याची भाषा करत नोंदवलं गेलं की स्त्रीला त्या दुय्यम स्थानावरून बाहेर यायला अजून काही काळ जावा लागेल. ‘स्त्री कनिष्ठ’ हा भाव जगभरातल्या सर्व समाजांच्या रक्तात असा खोलवर भिनवला गेला की पुरुष सोडाच, पण खुद्द स्त्रीही पुरुषाशिवाय जगणं कठीण, तोच आपला आधार आहे, हे घोकत राहिली. म्हणूनच काही घरात स्त्रीचं स्वातंत्र्य, तिचे हक्क, समान स्थान या गोष्टींचा पुरुष आदर करत असले तरी स्त्री आपलं भावनिक आणि शारीरिक अवलंबन सोडायला तयार नाही. शतकानुशतकं तिच्यावर जी सत्ता गाजवली गेली त्या प्रभावातून अजून तिची मुक्तता होत नाही हेच खरं!’ लेखिकेचं हे प्रतिपादन महत्वपूर्ण नि वस्तुस्थिती निदर्शक आहे.

- Advertisement -

स्त्री-पुरुष असा भेद करत, स्त्रीचा जेवढा वापर करणं शक्य आहे तेवढा करत आणि पायातील वहाण पायातच राहिली पाहिजे असं म्हणत सार्‍या धर्मांनी स्त्रीला तुडवता येईल तितकं तुडवलं. सर्व पुरुषजातीला मोक्ष मिळवून देताना सर्व स्त्री जातीचं जगणं अत्यंत हलाखीचं करून टाकण्याचं काम सर्व धर्मांकडून घडलं हे एकाही धर्मसंस्थापकाला, एकाही महापुरुषाला कसं खटकलं नाही? त्याच्या ‘करुणास्वरूपाला’ त्यामुळे लांच्छन कसं लागलं नाही? इतकं जीवघेणं दु:ख स्त्रीच्या पदरात टाकूनसुद्धा हे ‘महापुरुष’ माणुसकीच्या तत्वज्ञानाच्या गप्पा कोणत्या अधिकाराने करीत राहिले? की ‘माणसा’च्या कल्याणाचा विचार करताना स्त्री त्यांच्या हिशेबातच नव्हती? असे थेट नि धारदार प्रश्न लेखिकेने विचारले आहेत.

हिंदू धर्माविषयीच्या प्रकरणात भगवद्गीता, कृष्ण, मनू आणि मनुस्मृती याबाबत सविस्तर विवेचन केलंय. तसेच वेद, उपनिषद, श्रुती, पुराणे यांच्या आधारे समाजात असणार्‍या स्त्रीच्या स्थानाची चर्चा केली आहे. हिंदू धर्मशास्त्रावरला एक महत्वाचा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. इतर कोणत्याही स्मृतीपेक्षा मनुस्मृतीची योग्यता अधिक समजली जाते. यामुळे समाजात ‘पुरुष प्रधान आणि स्त्री दुय्यम’ ही धारणा विकसित झाली आहे. मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं ‘न स्त्रीस्वातंत्र्यम अर्हति’ हे वचन सर्वज्ञात आहेच. केवळ मनुस्मृतीच नव्हे, तर हिंदू धर्मातल्या आपस्तंभ धर्मसूत्र, गृह्यसूत्र, मैत्रायणी संहिता, वसिष्ठ धर्मसूत्र, बृहदारण्यक उपनिषद आणि इतरही वैदिक साहित्यातही स्त्रियांची निंदानालस्ती करण्यात आली असल्याचं लेखिकेने सोदाहरण स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

तथागत गौतम बुद्ध यांचे स्त्रियांविषयी काय विचार होते, बौद्ध धर्माचा महत्वपूर्ण ग्रंथ ‘त्रिपिटक’ यात स्त्रियांच्या संदर्भात काय मांडणी केलेली आहे, याची चर्चा बौद्ध धर्मावरील प्रकरणात केली आहे. बुद्धाने भिक्षूंना, स्त्रीची पाच दु:खे आहेत. ते फक्त स्त्रीच अनुभव करीत असते, असं सांगितलं होतं. स्त्री आपल्या लहान वयातच पतीच्या घरी जात असते. स्त्री ऋतुमती होत असते. स्त्री गर्भिणी होत असते. स्त्री बाळंत होत असते. स्त्रीला आपल्या पतीची सेवा करावी लागते. ही ती पाच दु:खे बुद्धाने सांगितली.

स्त्रीजातीबद्दल अशा शब्दांत बुद्धाने कणव व्यक्त केलेली दिसून येते. स्त्रीला संन्यास घेण्यास आणि स्त्री संघ स्थापन करण्यास परवानगी देणारा बुद्ध हा जगातल्या इतिहासातला पुरुष होता, हे विशेष! बुद्ध स्त्री मुक्तीचा उद्गाता होता. त्याने स्त्री-पुरुष समानतेचा उद्घोष केलेला असूनही बुद्ध स्त्री विरोधी होता, अशी चुकीची मांडणी काहीजण करतात. समाजाच्या विविध स्तरातून स्त्रिया बुद्धाच्या भिक्षुणीसंघात आल्या. बुद्धाच्या उपदेशाने त्यांनी निर्वाणाची आस धरली. त्या स्त्रियांनी लिहिलेली वचनं म्हणजे ‘थेरीगाथा.’ संघर्ष करत, दु:ख, प्रलोभनं दूर सारत, भावनांच्या पाशातून वेगळ्या होऊ पाहणार्‍या स्त्रियांचे हे उद्गार आहेत, असं ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांनी म्हटलंय.

ख्रिस्ती धर्म, येशू ख्रिस्त, बायबल आणि चर्चचे कायदे याबाबत मांडणी करताना लेखिकेने नवा करार आणि जुना करार म्हणजे बायबलचा आधार घेतलाय. ख्रिस्ती धर्म तत्वज्ञान यात सामावलेलं आहे. ख्रिश्चनांचं बायबल, मुस्लिमांचं कुराण, हिंदूंची गीता यांनी स्त्रीविषयी जे म्हणून ठेवलं त्याला, त्या-त्या धर्मात पुढे होऊन गेलेल्या धर्मगुरू, इमाम आणि स्मृतीकारांनी निर्माण केलेल्या विधीनिषेधांनी विकृत रूप प्राप्त करून दिलं.

साहजिकच ख्रिश्चन धर्मातही स्त्रीचं जगणं इतर धर्मातल्या स्त्रियांप्रमाणेच अत्याचारांनी ग्रासलेलं दिसतं, असं निरीक्षण लेखिकेने नोंदवलय. इस्लाम धर्मात स्त्रीचं स्थान अधोरेखित करण्यासाठी मोहम्मद पैगंबरांचे विचार आणि कुराण, अल हादीस, इज्मा, कियास व शरीयतचा संदर्भ घेतलाय. स्त्री-पुरुषांना समान अधिकार देणार्‍या आयती कुराणात आढळतात, तर स्त्री-पुरुष विषमतेची, पुरुषाच्या अमर्याद अधिकाराची प्रचीती देणारी कुराण व हादीसमधली वचनेही लेखिकेने उद्धृत केली आहेत.

फुले-गांधी-महर्षी शिंदे-रघुनाथ कर्वे आणि डॉ. आंबेडकर यांचे स्त्रीविषयी विचार, त्यांनी केलेलं कार्य गुण-दोषांसह लेखिकेने मांडलंय, तर विवेकानंद यांच्या स्त्रीविषयक विचारांमध्ये असलेली विसंगती योग्य ते संदर्भ देऊन निदर्शनास आणून दिली आहे. या महापुरुषांनी आपल्या विचारांना कृतीची जोड दिली. याशिवाय लोकहितवादी, आगरकर, टिळक आणि ताराबाई शिंदे यांच्या स्त्रीविषयक विचारांचा परामर्शही त्यांनी प्रस्तावनेत घेतलाय. त्या-त्या काळातलं समाजवास्तव यामुळे आपल्या ध्यानात येतं.

सर्व धर्माचे संस्थापक पुरुष होते; त्यामुळे त्यांच्या विचारांची मांडणी आणि दृष्टिकोन पुरुषी/पुरुषधार्जिणा/पुरुषप्रधान असल्याचं मत लेखिका व्यक्त करते. हे अमान्य करता येणारं नाहीये. शिवाय समाजसुधारक आणि महात्मा असले तरी ते शेवटी पुरुषच होते. इतरांपेक्षा ते थोडे संवेदनशील होते, इतकाच काय तो फरक, असं त्यांचं म्हणणं आहे. जगातल्या प्रमुख धर्मात स्त्रियांचं असलेलं स्थान समजून घेण्यासाठी आणि महापुरुषांच्या दृष्टिकोनातून स्त्री जाणून घेण्यासाठी (लेखिकेच्या मांडणीशी काही ठिकाणी सहमत होत येत नसलं तरी) हे अत्यंत मौलिक पुस्तक आहे, यात शंका नाही!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -