घरफिचर्ससारांशगोकुळाष्टमीचे प्रसाद

गोकुळाष्टमीचे प्रसाद

Subscribe

जन्माष्टमीच्या प्रसादांमध्येही ‘सुंठवडा आणि गोपाळकाला’ हे दोन पदार्थ प्रामुख्याने असतात. सुंठवडा खरंतर सूंठ पूड आणि पिठीसाखर मिसळून बनवायचा असतो, पण काही लोक त्यात किंचित तूप, वेलदोडा आणि जायफळ पूडही घालतात. जन्माष्टमीच्या दिवशी बरेच जण उपास करतात. अनेक जण त्यावेळी, दूध, दही किंवा लोणी-साखर एवढेच खातात. या उपासाला धणे चालतात. त्यामुळे उपासाच्या इतर पदार्थांबरोबर धण्याचे पाणी, धण्याचा चहा आणि सुका मेवा घातलेले धण्याचे, डिंक, खारीक, हाळीवाचे लाडू मुद्दाम केले जातात. गोकुळाष्टमीचा दुसरा दिवस म्हणजे दहीहंडी आणि देवाला भोग चढवण्याचा म्हणजे महाप्रसादाचा. जन्माष्टमीचा ‘काला’ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवतात.

आपल्याकडे नुकतीच गोकुळाष्टमी साजरी झाली. सगळ्या ठिकाणी देखणी सजावट, नाना तर्‍हेचे कार्यक्रम आणि त्याहीपेक्षा त्यानिमित्ताने केले जाणारे विविध प्रकारचे प्रसादाचे पदार्थ, सारंच विलोभनीय असतं. श्रीकृष्ण ‘रसराज’ असल्यामुळे ते सर्व प्रसादाचे पदार्थही तसेच रसपूर्ण आणि चविष्ट असायलाच हवेत.

त्या जन्माष्टमीच्या प्रसादांमध्येही ‘सुंठवडा आणि गोपाळकाला’ हे दोन पदार्थ प्रामुख्याने असतात. सुंठवडा खरंतर सूंठ पूड आणि पिठीसाखर मिसळून बनवायचा असतो, पण काही लोक त्यात किंचित तूप, वेलदोडा आणि जायफळ पूडही घालतात. जन्माष्टमीच्या दिवशी बरेच जण उपास करतात. अनेक जण त्यावेळी, दूध, दही किंवा लोणी-साखर एवढेच खातात. या उपासाला धणे चालतात. त्यामुळे उपासाच्या इतर पदार्थांबरोबर धण्याचे पाणी, धण्याचा चहा आणि सुका मेवा घातलेले धण्याचे, डिंक, खारीक, हाळीवाचे लाडू मुद्दाम केले जातात. गोकुळाष्टमीचा दुसरा दिवस म्हणजे दहीहंडी आणि देवाला भोग चढवण्याचा म्हणजे महाप्रसादाचा. काही ठिकाणी मात्र गोकुळ अष्टमीच्याच संध्याकाळी किंवा जन्माच्या वेळी, रात्रीच गोपाळ-काल्याचा नैवेद्य दाखवतात. जन्माष्टमीचा ‘काला’ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवतात.

- Advertisement -

कुठे त्यामध्ये पोहे, लाह्या, चुरमुरे, दूध, दही, लोणी, काकडी, केळी, पेरू, कैरी, लिंबाचे लोणचे आणि भिजवलेली हरभर्‍याची डाळ घालून कालवलेले असते. काल्यावर तुळशीची पाने ठेवलेली असतात. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात काला कोरडाच कालवतात. त्यात लोणचे वगैरे घालत नाहीत. त्या काल्यात ओले खोबरे, डाळिंबाचे दाणे, सफरचंदाच्या फोडी आणि कोथिंबीर घालतात. काही ठिकाणी फक्त फळांचा काला करतात, तर काही ठिकाणी लोणचे, चटणी, कोशिंबीर, पोळी, भाजी, वरण, भात, खीर, वडे, लाडू असे नैवेद्याचे ताट वाढून मग ते सर्व एकत्र कालवतात. काला कालवणारी माणसे निर्मळ मनाची आणि आनंदी वृत्तीची असतील तर काल्याचा प्रसाद देव ग्रहण करतो आणि तो अधिक चवदार लागतो असे समजले जाते. काल्याच्या प्रसादाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिकही महत्त्व आहे.

आमच्या ओळखीच्या एका गुजराथी घरात श्रीकृष्णाचे देऊळ आहे. त्यांच्या घरी गोकुळाष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी करतात. त्या दिवशी त्यांचे देऊळ पांढर्‍या शुभ्र आणि सुगंधी फुलांनी सजवतात. त्यावर पांढर्‍या रंगाच्या, चिमुकल्या दिव्यांच्या माळा सोडलेल्या असतात. राधाकृष्णासाठी केशरी जरीकाठाचे पांढरे रेशमी कपडे आणि जाईच्या फुलांचे दागिने बनवलेले असतात. त्यांच्याकडचा कृष्णाचा शिसवी पाळणाही पांढर्‍या फुलांच्या गजर्‍यांनी सजवतात आणि त्यात चिमुकली बालकृष्णाची मूर्ती असते. पाळण्यावरच्या शिंकाळ्यात दही, दूध आणि लोण्यांनी भरलेली मडकी ठेवलेली असतात. त्या दिवशीच्या प्रसादासाठी त्यांच्याकडे फक्त पांढरे आणि किंचित केशरी रंगांचे पदार्थ करायची पद्धत आहे.

- Advertisement -

त्यामध्ये सुंठवडा, खडीसाखर विरघळवलेले लोणी, दहीभात, मलई पेढे, बत्तासे, खीर, तुपात तळलेला, काजू आणि बदाम घातलेला पांढरा पोह्याचा चिवडा, मखाणा मिश्री, रवा ढोकळा, पांढर्‍या शुभ्र करंज्या आणि कचोर्‍या अशा प्रकारचे जवळजवळ छप्पन्न भोग (पदार्थ) असतात. यापैकी मखाणा मिश्री फारच चवदार असते. मखाणा तळून घेतात आणि त्यामध्ये वेलदोडा, पिठीसाखर, भाजलेल्या बदाम-काजूची पूड आणि बेदाणे मिसळलेले असतात. त्यांच्या सुगरण सुना दरवर्षी त्या प्रसादाच्या पदार्थांमध्ये नवी भर घालतात. त्यांच्या पूजेच्या वेळी जमलेले सर्वजण विष्णू सहस्त्रनाम पठण करतात आणि कृष्णाची गाणी म्हणून गरबा खेळतात आणि भरपूर प्रसाद खाऊन तृप्त होतात.

बहुसंख्य वैष्णव गुजराथी आणि राजस्थानी लोकांच्या घरी साधारण अशाच प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो. उत्तर भारतात सर्व ठिकाणी या वेळच्या नैवेद्यात पंजरी असतेच. त्यासाठी काही ठिकाणी कणिक आणि रवा खरपूस भाजून घेतात. त्यात तुपात तळलेला डिंक, मखाणा, खोबरे, बदाम, पिस्ते, बेदाणे, वेलदोड्याची पूड, खसखस, धण्याची पूड आणि त्यात पिठीसाखर घालून छान मिसळतात. काही ठिकाणी मात्र रवा, कणिक न घालता त्याऐवजी तळलेला सुका मेवा आणि तुपात भाजलेली धण्याची जाडसर पूड आणि मखाणा एकत्र करतात. पंजरी कोरडीही खाता येते. काही जण त्या मिश्रणात थोडा खवा आणि दूध मिसळून त्याचे लाडू किंवा बर्फीही बनवतात.

ओरीसातल्या जगन्नाथ पुरीजवळही मोठ्या प्रमाणात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होतो. तिथेही देवासाठी नाना प्रकारचे भोग चढवतात. तिथला प्रमुख पदार्थ म्हणजे चंद्रकांती पीठा. नावाप्रमाणेच हा छान दिसतो आणि लागतोही तसाच. त्यासाठी तांदूळ आणि मूगडाळ एकास चार या प्रमाणात भिजवून वाटतात. मग ते वाटप साखरेच्या, खजूर गुळाच्या कच्च्या पाकात शिजवतात. शिजलेला गोळा ताटात पसरतात. मग त्याच्या चौकोनी वड्या पाडून त्या तुपात तळतात. त्या गरम असताना त्यावर पिठीसाखर पखरली जाते. काही ठिकाणी त्यावर मलई आणि पिठीसाखर पसरतात.

भारताच्या ईशान्येकडील राज्यात विशेषतः आसाममध्ये यावेळी केसा मिठोई बनवतात. केसा मिठोई म्हणजे तुपात भाजलेले तांदळाचे पीठ, ओले खोबरे, खायचा कापूर आणि गूळ घालून बांधलेले लाडू. जबलपूरकडे यावेळी खव्याची, शिंगाड्याची जिलेबी बनवतात. बर्‍याच ठिकाणी देवांसाठी दुधात दही, मध, तूप, केळी, साखर, केवडा, तुळशीच्या मंजिर्‍या, पाने, केशर आणि बदाम पिस्त्याची बारीक पूड घालून देवांसाठी चरणामृतही बनवतात. ते आपल्या पंचामृतासारखेच असते, पण थोडे पातळ असते आणि जास्त छान लागते.

उत्तर भारतात मालपूवा, रंगबिरंगी बुंदीचे लाडू, मखाणा खीर, केवड्याचे अत्तर घातलेल्या पाकातल्या गुंजीया (करंज्या) असे बरेच प्रकार जन्माष्टमीच्या प्रसादासाठी करतात. यातला सगळ्यात स्वादिष्ट प्रकार म्हणजे विड्याचे पान घातलेले गुलाबजाम आणि बदाम-पिस्ता बर्फी. एकदा खाल्ले की डोक्यात त्यांची चव रूतून बसते. काही ठिकाणी मात्र हा सण ऐन पावसाळ्यात येत असल्यामुळे या दिवसात पोटाला बरे आणि खिशाला परवडणारे असेच नैवेद्य केले जातात. कोकणातल्या विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बहुतेक ठिकाणी यावेळी शेवग्याच्या पानांची डाळ घालून भाजी, तांदळाची घावने (काही ठिकाणी खापूर्लाही करतात),(हे लिहितानाही माझ्या डोळ्यासमोर पांढरी शुभ्र जाळीदार घावने आलेली आहेत), त्याबरोबर काळ्या वाटाण्याची उसळ आणि चिबूड (काकडीसारखे पण थोडे जाड आणि किंचित गोड फळ) त्याच्या साखर पसरलेल्या फोडी किंवा धोंडस हा पदार्थ करतात.

धोंडस म्हणजे काकडी घातलेल्या खांतोळ्याच. त्याबरोबर भोपळ्याचे घारगेही करतात. कारवार उडपीच्या पट्ट्यात जन्माष्टमीचे पदार्थ म्हणजे रवा उंडे, तांदळाच्या लोण्यातल्या चकल्या, कडबोळी, म्हैसूर बोंडे (तांदूळ आणि उडदाचे पीठ आणि रवा, कणिक, ताकात भिजवून त्यात मिरची व आले वाटून घातलेले किंचित चामट पण अधिक कुरकुरीत वडे) आणि कोट्टिगे इडली म्हणजे फणसाच्या पानात वाफवलेली इडली आणि खोबर्‍याची चटणी करतात. त्याबरोबर कडसर चवीची गरमागरम फेसाळ फिल्टर कॉफीही आवर्जून दिली जाते.

माझ्या सुदैवाने अगदी स्वप्नातले वाटावेत अशी काही ठिकाणे आणि प्रसंग माझ्या नशिबात असतात. त्याचप्रमाणे एका गोकुळाष्टमीच्या रात्री मी छत्तीसगडमधल्या अगदी दूरच्या एका बांगो नावाच्या गावाजवळच्या आदिवासी पाड्यात पोहचलेले होते. पाड्याच्या प्रमुखाच्या घरी नीळ, गेरू, पानांचे रंग आणि पिवडीने रंगवलेली कृष्णाची मातीची मूर्ती आणि तसेच गोकूळ उभे केलेले होते. गोकुळात कालिया मर्दन, गोवर्धन, यमुनेकाठचे गोपांचे खेळ अशी सगळी कृष्णाची बाललीला साकारलेली होती. पिवळ्या केशरी फुलांच्या वेलींमध्ये दोर्‍यांचा पाळणा बांधलेला होता. गावातल्या मुलांनी पावसातही भरपूर रानफुले-पाने गोळा करून त्यांची तोरणे आणि हार बनवून मनमोहक सजावट केली होती.

संध्याकाळी त्यांनी ते संपूर्ण गोकूळ आणि पाळणाही रानफुलांनी सजवला. पाळण्यात सावरीच्या कापसाची मऊ गादी आणि छोटे लोड ठेवले. बालकृष्णाला मजा यावी म्हणून पाळण्यावर वार्‍याबरोबर झुलणारे गवताचे तुरे आणि गवताची बनवलेली फुले आणि भेंडांचे पक्षी लावलेले होते. संध्याकाळ संपता संपता गावातले सगळे लोक पाडा प्रमुखांच्या घरी जमले. लहान मुले राधाकृष्णाच्या वेषात आलेली होती. सर्व जमल्यावर गाणी, भजने सुरू झाली. कुणी कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या. रात्र चढायला लागली तशी डमरू वाजवत त्या नादावर सगळी नृत्य करायला लागली. रात्री तिथे अक्षरश: एकच मोठी पणती लावली होती. लाईट तर नव्हतेच. पाऊस आणि वारा भन्नाट होता. बरोबर रात्री १२ वाजता

कृष्णजन्माच्या वेळी बाहेरून पावसात भिजत आलेल्या झिक्या नावाच्या मुलाने बांबूच्या टोपलीतून रांगणारा चिमुकला निळ्या रंगाने रंगवलेला आणि फुलांनी सजवलेला बाळकृष्ण आणला. त्या बाळकृष्णाला तिथल्या बायकांनी सजवलेल्या पाळण्यात ठेवल्यावर सर्वांनी त्यावर फुले उधळली. बाळाचा पाळणा म्हटला. देवांची आरती झाल्यावर जमलेल्या सर्वांना सूंठ-साखर, थोडी थोडी दहीसाखर आणि तिखूर सरबत दिले. तिखूर म्हणजे एक प्रकारच्या हळदीचा कंद. त्याची पावडर करून ठेवतात आणि पाण्यात विरघळले की ते दुधासारखे दिसते. ते सरबत चवीलाही छान असून औषधीही असते. दुसर्‍या दिवशी दहीहंडी झाल्यावर नैवेद्यासाठी साधा देवधानाचा भात, डाळ, अंबाड्यांचे लोणचे, खेड्याची आणि फणसाची भाजी, रानमुगाचा शिरा आणि तुळशीच्या बिया घातलेले कुटकीचे लाडू असा बेत होता. पाड्यावरची सगळी माणसे येऊन समाधानाने पोटभर जेवली. आजवर मी अनेक ठिकाणी गोकुळाष्टमीचे उत्सव पाहिले आहेत, पण बांगोतल्या जन्माष्टमीच्या वेळेस जाणवलेला अनाकलनीय आनंद परत कधी अनुभवाला आला नाही.

–मंजूषा देशपांडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -