घरफिचर्ससारांशअविवाहित महिलांचा पेच!

अविवाहित महिलांचा पेच!

Subscribe

अविवाहित राहणार्‍या अनेक महिलांना समाजाकडून उपेक्षित वागणूक मिळते हे वेगळे सांगायला नको. समाजातील मुख्य प्रवाहात त्यांना सामील करून घेतले जात नाही. अविवाहित महिला कितीही सुशिक्षित, समंजस, श्रीमंत असली तरीही तिला योग्य तो आदर, मानपान समाजात मिळत नाही हे दुर्दैव आहे. लग्न करून पती आणि मूलबाळ आयुष्यात असल्याशिवाय स्त्री परीपूर्ण होऊच शकत नाही. नवर्‍याच्या घरी नांदल्याशिवाय स्त्रीजन्म सार्थकी लागूच शकत नाही हीच आपल्या समाजाची आजही मानसिकता आहे. या मानसिकतेचा या महिलांना उपद्रव होत राहतो. त्यामुळे सगळं काही असूनही एक वेगळा पेच त्यांच्यासमोर असतो.

खरंतर निसर्ग नियमाच्या विरुद्ध जाऊन, समाज रचनेच्या पलीकडे जाऊन आपण कोणतीही कृती जेव्हा करतो तेव्हा त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. दुर्दैवाने का होईना पण अविवाहित राहिलेल्या महिलांच्या बाबतीत हेच घडताना दिसते. तरुण वयात नोकरी अथवा उद्योग व्यवसाय करत असल्यास आर्थिक स्वातंत्र्य असल्यामुळे या महिलांना एकटं राहताना विशेष काही वाटतं नाही. कुटुंबापासून दूर, अन्य शहरात किंवा स्वतःच अथवा भाड्याने घरं घेऊनदेखील अनेक अविवाहित महिला राहत असतात. तरुण वयात मित्र, मैत्रिणी, नोकरी यात मन रमून जाते, वेळ निघून जातो. उच्चशिक्षण घेणे, मोठ्या पदावर पोहचणे, नावलौकिक मिळवणे, अमाप पैसा मिळवणे, स्वतःच्या हक्काची, मालकीची स्थावर मालमत्ता बनवणे, आपलं भविष्य आर्थिक दृष्टीने सुरक्षित करणे यांसारख्या ध्येयाने झापटलेल्या महिलांनासुद्धा योग्य वयात लग्न करणे, वेळेवर मूलबाळ होणे वगैरे विचार पटत नसतात. घरातल्या लोकांनी कितीही समजावलं तरी त्या हट्टीपणा सोडत नाहीत आणि कालांतराने कंटाळून घरातलेदेखील याबाबत विचारणा करणे, प्रयत्न करणे सोडून देतात.

एकदा का योग्य वय मागे पडले आणि मग स्थळ बघायला सुरुवात जरी केली तरी तुम्ही कितीही शिकलेल्या असा, कमावत्या असा येणारी स्थळे हीदेखील वय वाढलेली, विदुर अथवा घटस्फोटित पुरुषांचीच येतात. एका ठरावीक वयापर्यंत आपला स्वभाव लवचिक असतो, कुठेही जुळवून घेण्यासाठी तयार असतो, पण जसजसं व्यक्तिमत्त्व घडत जातं, तसतसं आपण आपल्या मतांना, विचारांना बदलणे, स्वभाव, सवयी बदलणे अशक्य होत जाते आणि उशिरा लग्न ठरताना कराव्या लागणार्‍या, स्वीकाराव्या लागणार्‍या तडजोडीला मन आणि बुद्धी तयार होत नाही. त्यामुळे अनेकदा लग्न करण्याची इच्छा असूनसुद्धा वाढत्या वयात योग्य जोडीदार न मिळाल्यामुळे जन्मभर अविवाहित राहण्याची परिस्थिती ओढवते.

- Advertisement -

पद, पैसा, बुद्धिमत्ता, प्रतिष्ठा, उच्च राहणीमान असूनसुद्धा या महिलांना एकाकी जीवनाला सामोरं जाताना भरपूर आव्हाने, त्रास, समाजाचा चुकीचा दृष्टिकोन याला तोंड द्यावे लागते. त्यातूनसुद्धा अनेक जणी वाट काढत, स्वतःला सावरत भक्कम उभ्या राहतात. त्यांच्याच चुकीच्या निर्णयामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती आली असं म्हणून कुटुंबीयसुद्धा बरेच लांब जातात. आपल्या हक्काचं, प्रेमाचं, काळजी करणारं, माया करणारं कोणीही नसल्याने या महिला जसजसं वय वाढतं तसं उद्विग्न होताना दिसतात. या परिस्थितीमध्येसुद्धा मी कशी सुखी, समाधानी आहे, आनंदी आहे, मला किती स्वातंत्र्य आहे, मी आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण आहे हे दाखविण्यासाठी प्रचंड धडपड करतात.

अतिशय उचभ्रू वस्तीत स्वतःचे घर, बंगले असणार्‍या अशा दोन-तीन महिलांबद्दल तक्रार घेऊन तेथील ज्येष्ठ नागरिक आले असता त्यांची समस्या ऐकून खरंच धक्का बसला.

- Advertisement -

या ज्येष्ठ नागरिकांच्या परिसरात राहणार्‍या दोन-तीन अविवाहित परंतु चाळीशी पार केलेल्या उत्तम शिक्षण, नोकरी असणार्‍या आणि सुंदर दिसणार्‍या तसेच कमालीची फॅशन करणार्‍या, नटून थटून वावरणार्‍या महिलांचा तेथील पुरुषांनी अक्षरशः धसका घेतला होता. पुरुषांना आमंत्रण देतील अशा स्वरूपाचे कपडे, वेशभूषा, मेकअप करून या महिला पुरुषांना आकर्षित करायचा प्रयत्न करतात, अशी ज्येष्ठ नागरिकांची तक्रार होती. सर्वसामान्य घरातील पुरुषांना या महिला आपल्या आजूबाजूलादेखील फिरकल्या, बोलायला आल्या तरी नकोसं वाटतं होतं. अचानक कोणाच्याही घरात जाणे, एकदम बिनधास्त वावरणं, कोणत्याही विषयावर गप्पा मारायला सुरुवात करणे, रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरत राहणे, सिगारेट पिणे, मोठमोठ्याने हसणे-बोलणे, आपल्याकडे लक्ष वेधून घेणे या त्यांच्या वागणुकीला परिसरातील लोक कंटाळून गेले होते.

सर्वसामान्य विवाहित कुटुंब त्यांना मुलंमुली असल्यामुळे या महिलांमुळे आपल्यावर काही चुकीची वेळ तर येणार नाही ना, आपल्याला व्यक्तिगत काही त्रास तर होणार नाही ना, या विचाराने त्यांना ग्रासले होते. बरं त्या महिलांबद्दल कुठे काही रीतसर तक्रार करण्यासारखा त्यांचा काही गुन्हा किंवा त्रासही नव्हता. त्यांची स्वमालकीची घरं होती. त्यामुळे त्यांच्याकडे कोण येतं, कोण जातं यावर आजूबाजूचे लोक काहीही शंका घेऊ शकत नव्हते अथवा जाब विचारू शकत नव्हते. समाजाच्या लेखी या महिला अविवाहित असल्यामुळे या विकृत आहेत, मनोरुग्ण आहेत, अ‍ॅबनॉर्मल आहेत अशी त्यांची प्रतिमा तयार करण्यात आली होती.

अविवाहित राहणार्‍या अनेक महिलांना समाजाकडून उपेक्षित वागणूक मिळते हे वेगळे सांगायला नको. समाजातील मुख्य प्रवाहात त्यांना सामील करून घेतले जात नाही. अविवाहित महिला कितीही सुशिक्षित, समंजस, श्रीमंत असली तरीही तिला योग्य तो आदर, मानपान समाजात मिळत नाही हे दुर्दैव आहे. लग्न करून पती आणि मूलबाळ आयुष्यात असल्याशिवाय स्त्री परीपूर्ण होऊच शकत नाही. नवर्‍याच्या घरी नांदल्याशिवाय स्त्रीजन्म सार्थकी लागूच शकतं नाही हीच आपल्या समाजाची आजही मानसिकता आहे. या मानसिकतेचा या महिलांना उपद्रव होत राहतो. त्यामुळे सगळं काही असूनही एक वेगळा पेच त्यांच्यासमोर असतो.

अशा महिला कोणत्याही पुरुषासोबत कोणत्याही कारणास्तव जरी दिसल्या तरी तिच्या चारित्र्याबाबत बेधडकपणे बोलले जाते. या महिलांनी स्वतःच्या भावनिक, शारीरिक गरजा भागवण्यासाठी रिलेशनशिप जरी स्वीकारली तरी तिच्या भावनांना समोरून योग्य न्याय कधीच मिळत नाही. ती फक्त एक पर्याय आणि गरज भागवण्याचे साधन बनून राहते. त्यातूनही एखादीने या सर्व गरजा, अपेक्षा पूर्ण मारून जगायचं ठरवलं तरी त्यामुळे वाढत्या वयात तिची मानसिकता बिघडत जाते.

आयुष्यभर एकाकी राहून, समाजाकडून मिळालेली दुय्यम वागणूक सहन करून, कुटुंबातील लोकांनी दूर केल्यामुळे त्या जरी कमावत्या असल्या तरी स्वतःला खूप असुरक्षित समजत असतात. मायेची ऊब आणि प्रेमाचा ओलावा यापासून सातत्याने वंचित राहिल्यामुळे आपल्या दुःखाला त्या इतरांना अथवा परिस्थितीला जबाबदार धरत राहतात. सातत्याने अतिविचार, नैराश्य, चिंता, काळजी अथवा वयोमानाने येणारे आजारपण यामुळे त्या त्रस्त होताना दिसतात आणि त्यातूनच त्यांना मानसिक आजारदेखील जडताना दिसतात. कदाचित वर नमूद केलेल्या महिलांना अशाच प्रकारे मानसिक क्लेश होत असावेत आणि त्यातून त्यांची वागणूक सैरभैर झालेली असावी.

अविवाहित महिला जर गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील असेल तर तिची शारीरिक, मानसिक पिळवणूकदेखील केली जाते. तिला कोणत्याही स्वरूपाची मदत करताना तिच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवल्याच जातात आणि तिचं अविवाहित असणं शाप आहे असं तिला वाटायला लागतं. एकदा अशी मानसिकता तयार झाली की या महिला बेरड होणं, त्यांना कशाचेही काहीही वाटेनासं होणं, त्यांच्या भावना मरून जाणं, समाजाबद्दल त्यांचं मत नकारात्मक होतं जाणं यांसारख्या मानसिक समस्या तयार होऊ लागतात. सतत मन मारून जगल्यामुळे त्यांना स्वतःबद्दलदेखील राग येऊ लागतो. त्यांचा आत्मविश्वास नाहीसा होऊ लागतो. यासाठी आपल्या सर्वांचेच, सर्व कुटुंबाचे, समाजाचे हे कर्तव्य आहे की आपला दृष्टिकोन विशाल करून, मनातील कटुता, जुनाट विचार, संकुचित विचारसरणी बाजूला सारून अविवाहित महिलांनादेखील आपल्यात सामावून घ्यावे. त्यांनादेखील योग्य ती जागा आपल्या मनात द्यावी आणि अशा आपल्या असंख्य भगिनींना जगण्याची उमेद आणि बळ देण्यासाठी कार्यतत्पर राहावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -