घरफिचर्ससारांशपीक विमा योजेनेच्या मर्यादा

पीक विमा योजेनेच्या मर्यादा

Subscribe

शेतीत पिके घेताना शेतकर्‍यांना ज्याप्रमाणे बाजारातील स्पर्धेला तोंड द्यावे लागते त्याचप्रमाणे पिकाच्या आयुष्य कालावधीत विविध प्रकारचे धोके आणि अनिश्चितता यांनादेखील तोंड द्यावे लागते. यापैकी नैसर्गिक संकटांवर मात तर करता येत नाही, पण विमा उतरवून त्या संकटांमुळे झालेल्या नुकसानीमुळे झालेली हाणी थोडीफार कमी करता येते. त्याची भरपाई मिळवता येते या पार्श्वभूमीवर पीक विमा योजना महत्त्वाची आणि आवश्यक ठरते.

–प्रा.डॉ. कृष्णा शंकर शहाणे

शेतकर्‍याने मशागत करून पिकांच्या संगोपनासाठी वेळ, पैसा खर्च करून पीक घेत असताना, पीक कापणीला आलेले असताना अचानक काही संकटांमुळे जसे वादळ, आग, महापूर, दुष्काळ, गारपीट, टोळधाड किंवा इतर गोष्टींमुळे उभे पीक खाण्यायोग्य किंवा वापरण्याजोगे राहत नाही अशा वेळी शेतकर्‍यांचे मोठ्या आर्थिक नुकसान तर होतेच, पण त्याने त्यांचे मनोधैर्यदेखील कमी होते. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून कोणती पावली उचलली जातील? याविषयी सांगता येत नाही अशा वेळी विमा योग्य धोक्यांपासून बचाव करण्यासाठी विमा उतरवलेला असेल, तर त्याची नुकसानभरपाई शेतकर्‍याला भरपाई स्वरूपात मिळते. त्याने शेतकर्‍यांचे पूर्ण नुकसान भरून तर येत नाही, पण त्याच्या कुटुंबाला थोडाफार आर्थिक हातभार लागतो.

- Advertisement -

विविध राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्यामार्फत पीक विमा उतरवला जातो. हा पीक विमा दर वर्षी उतरवला जात असला तरी तो सर्व पिकांसाठी उतरवला जात नाही. काही ठराविक पिकांची निवड असा विमा उतरवण्यासाठी केली जाते. अशावेळी इतर पिकांना हे विम्याचे संरक्षण मिळत नाही. या विमा प्रकारात जमिनीच्या क्षेत्रानुसार विम्याचा हप्ता ठरत असतो. हा हप्ता भरल्यानंतर विम्याचा कालावधी सुरू होतो, पण त्या विम्याच्या नुकसानभरपाईसाठी विमा कंपन्या किंवा बँकांकडून ठराविक मुदत दिली जाते, त्या मुदतीच्या आत पिकाचे विमायोग्य कारणामुळे नुकसान झाले तरच भरपाई मिळते. ही मुदत संपल्यानंतर किंवा विमा कंपनीच्या यादीत नसणार्‍या कारणामुळे नुकसान झाले, तर भरपाई मिळत नाही. त्यामुळे शेतकरी विमा उतरण्यास फारसे उत्सुक दिसत नाहीत.

सर्वसामान्य पीक विमा योजनेप्रमाणेच हवामानावर आधारित पीक विमा हादेखील अलीकडील कालावधीत एक विमा प्रकार होय. हा ठराविक पिकांनाच लागू होतो. पिकांचा विमा उतरवत असताना किंवा त्यांची परतफेड मिळवत असताना अनेक अडचणी शेतकर्‍यांना येतात. विमा उतरवताना सुरुवातीच्या अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागते. विविध कागदपत्रे, दाखले यांची जमावाजमव करावी लागते. त्यामुळे शेतकरी विमा उतरवताना खूश असतातच असे नाही. तसेच विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाईचा अंतिम कालावधी ठरवून दिला जातो. त्या कालावधीनंतर नुकसान झाल्यास त्याचा फायदा विमेदाराला किंवा शेतकर्‍याला मिळत नाही. त्यामुळे विम्याच्या हप्त्यादाखल भरलेले पैसे वाया जातात.

- Advertisement -

या शेतकर्‍यांच्या पिकाचे नुकसान विमा कंपनीने ठरवून दिलेल्या कालावधीत झाल्यास त्याची नुकसानभरपाई मिळवण्यासाठी पिकांचा पंचनामा केला जातो. हा पंचनामा किंवा क्षेत्राची पाहणी करण्यासाठी येणार्‍या अधिकार्‍याची ‘मर्जी’ सांभाळावी लागते. त्यांनी दिलेल्या अहवालावर शेतकर्‍यांच्या पिकांना मिळणारी नुकसानभरपाई अवलंबून असते. अशावेळी विविधप्रकारचे असणारे मानवी स्वभाव तेथे आडवे येतात किंवा ते सांभाळावे लागतात. या सर्व नियमांमध्ये शेतकरी किंवा ज्या शेतकर्‍यांची पिके आटोकाट बसतील त्यांनाच ही नुकसानभरपाई दिली जाते. नुकसान झाल्यावर नुकसानभरपाई मिळताना अनेकदा फार मोठा कालावधी निघून जातो. त्याने अनेक अडचणी निर्माण होतात. पीक विमा काढण्यापासून शेतकर्‍यांना परावृत्त करतो तो त्यांचा अशिक्षितपणा.

शिक्षणाच्या अभावी विम्याचे फायदे काय? याची जाणीव होत नाही तसेच विविध गोष्टींची पूर्तता करण्यात अडथळे येतात. काही शेतकर्‍यांची एक विशिष्ट मानसिकता असते. विमा का उतरवायचा? पिकांवर जर संकट आले नाही, तर आपला विमा हप्ता वाया जाईल या मनोवृत्तीमुळे फारच कमी शेतकरी आपल्या पिकाचा विमा उतरवतात. पीक संकटात सापडल्यानंतर शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते त्यात पीक कर्ज घेऊन मशागत करणार्‍या शेतकर्‍यांचे तर प्रचंड नुकसान होते. तसेच पिकांचा विमा उतरवणे, कृषी कर्ज देणे याबाबतीत अनेक बँका फारशा उत्साही असतातच असे नाही, कारण शासन कोणत्या वेळी शेतकर्‍यांना कर्जमाफी देतील हे सांगता येत नाही.

अशावेळी बँकांच्या व्यवसायाचे काय? या परिस्थितीत बँका कृषी कर्जाला प्रोत्साहन देतातच असे नाही. त्यामुळेदेखील कृषी कर्ज तसेच पीक विमा योजना शेतकर्‍यांमध्ये सर्वदूरपर्यंत पोहोचत नाही. यासाठी विमा उतरवणार्‍या घटकांनी त्याकडे फक्त व्यावसायिक तत्त्वाने पाहू नये, तर मानवतेचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विम्याचा फायदा शेतकर्‍याला कसा होईल याकडे लक्ष द्यावे. अर्थात विमा उतरवल्यामुळे किंवा नुकसानभरपाई मिळाल्याने शेतकरी आनंदात असतो असा भाग नसतो. विम्यामुळे त्याचे झालेले खूप मोठे नुकसान भरून येत नाही, तर त्याला थोड्याफार रकमेची मदत होते. शेतकर्‍यांच्या व्यापक हितासाठी कृषी पीक विमा अधिकाधिक सूत्रबद्ध होऊन या योजनेचा उत्तरोत्तर आणखी प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे.

–(लेखक अर्थतज्ज्ञ आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -