Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश खणखणीत ’टाळी’.....

खणखणीत ’टाळी’…..

Subscribe

एका अत्यंत महत्त्वाच्या पण धाडसी विषयाला हात घालून तो उत्तम पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणण्याचे धाडस ‘टाळी’ या वेबसिरीजमधून दिसून येते.‘ट्रान्सजेंडर’ म्हणून लेबल लावण्यापेक्षा एक माणूस म्हणून त्यांच्याकडे आपण पहायला शिकलो तरी ‘टाळी’ ने खूप काही साध्य केलं असं म्हणता येईल!

— आशिष निनगुरकर

रोज ट्रेनने ये जा करताना ही नॉर्मल आपल्यासारखी व्यक्ती म्हणून असलेली लोकं दिसतात, भेटतात. कधी कधी संवाद करण्याचा प्रयत्न करतात. छोट्याशा संवादातूनही त्यांची सामाजिक, राजकीय समज डोक्याला मुंग्या आणणारी असते. असो, हे लिहिण्याचं कारण म्हणजे ‘टाळी’. रवी जाधवांनी दिग्दर्शित केलेली ‘टाळी’ वेबसिरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. सहा भागातली ही एका समुदायाच्या जगण्याची गोष्ट. सहा भागांमध्ये रवी जाधवांनी बर्‍यापैकी चांगली गोष्ट सांगितलीय. क्षितिज पटवर्धननं कमाल लिहिलंय. कुठेही सिरीज बोअर होत नाही. डोक्यात घुसत जाते. गौरी सावंत यांच्या स्टोरीज आणि मुलाखती वगैरे पाहिल्या वाचल्या होत्या. त्यांनी अशा काळात केलेलं काम आणि उभारलेली चळवळ निश्चितच जबरदस्त आहे. त्यांच्या आयुष्यावर आणि एका ऐतिहासिक लढ्यावर आधारलेली ही वेबसिरीज म्हणजे ‘टाळी’. सुश्मिता सेनच्या आयुष्यातील हा एक मास्टरपीस आहे.तिने जबरदस्त काम केलं आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी एक रील पाहिलं होतं. चार तरुण पोरांनी केलेलं रील.‘तुम्ही नेहमी म्हणत असता ना, ‘चार लोक काय म्हणतील ?’ ‘चार लोक काय म्हणतील .. ?’ आम्हीच ते ‘चार लोक’ आणि आम्ही काहीही म्हणत नाही ! ‘ हा व्हिडीओ/रील त्यांनी गंमत म्हणून ते केलेलं असलं तरी त्यात ते जे म्हणाले आहेत, ते केवळ त्यांनीच नाही तर सर्वांनी मनावर घेऊन अंमलात आणण्याची गरज आहे. आपण म्हणतो माणूस हा ‘समाजशील’ प्राणी आहे. समाज म्हणजे काय? तर, ‘समाज म्हणजे परस्परांशी आंतरक्रिया करणार्‍या व्यक्ती आणि समूहांची मिळून बनलेली एक व्यापक संघटना-व्यवस्था’ किंवा ‘विविध अशा नात्यांनी अथवा संबंधांनी आणि वर्तन विशेषांनी बांधल्या गेलेल्या व्यक्तींच्या संघटनात्मक स्वरूपाला समाज असे म्हणतात.’

अशा व्याख्या आपल्याला आढळतात किंवा सांगितल्या जातात, आणखीही काही व्याख्या असतीलही पण ‘माणूस’ म्हणजे काय याची व्याख्या काय? माणूसपणाची व्याख्या काय? ‘दोन पायावर चालणारा आणि विकसित मेंदूमुळे बोलू-वाचू शकणारा सस्तन प्राणी’ या एका वाक्यात मांडता येऊ शकणार्‍या जीवशास्त्रीय व्याख्येच्या पलीकडे माणसाच्या लक्षणांचा, माणूसपणाच्या व्याप्तीचा, त्याच्या ‘माणूसधर्म आणि कर्तव्यांचा’ अभ्यास कुणी करत असेल का? मुळात त्याची गरज आहे असं तरी कुणाला वाटत असेल का? आपल्या मूलभूत गरजा भागल्या की आपला दिनक्रम संपला एवढ्याच मर्यादित विश्वात वावरणार्‍या ‘माणूस’ प्राण्याला मग विकसित मेंदू मिळाला तो कशासाठी? भेदाभेदातून तेढ निर्माण करण्यासाठी की आपले-आपले गट-तट निर्माण करून आपल्या धारणा बनवून माणूस हा केवळ ‘प्राणी’ आहे, हेच सिद्ध करण्यासाठी की आपल्या आवतीभोवती वावरणार्‍या आपल्याहून वेगळ्या वाटणार्‍या पण आपल्यातल्याच विविध सामाजिक घटकांनाही ‘माणूस’ ही संज्ञा-संकल्पना लागू होते याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यासाठी ?

- Advertisement -

संवेदनशील माणूस असा विचार करेलही, पण माणूस असूनही माणूस म्हणून वागणूक न मिळणार्‍या आपल्याच समाजबांधवांची माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून साधी दखलही घेतली जात नसेल, तर अशा संवेदनशील व्यक्तीनं काय करावं? त्यातही ती एक तृतीयपंथी व्यक्ती असेल तर? रूढ वाटेवरून जाणं तसं सोपं असतं, पण वाट रूढ करणं कठीण! वाट बनवणं आणि वाटाड्याही होणं त्याहून कठीण, पण इथेच काही व्यक्ती विशेष ठरतात, अशीच एक विशेष व्यक्ती म्हणजे श्रीगौरी सावंत ! एका पोलीस अधिकार्‍याच्या घरात मुलगा म्हणून जन्म घेतल्यावर स्त्रीसुलभ भावनांकडे असणारा ओढा, त्यामुळे होणारी प्रचंड मानसिक ओढाताण, वडिलांची घालमेल आणि धाक, आईचं धक्कादायक निधन आणि मानसिक द्वंद्वात सापडलेल्या छोट्या गणेशचं घराबाहेर पडणं किंबहुना तथाकथित ‘समाजाच्या’ नजरेतून पडू नये म्हणून घराबाहेर पाडलं जाणं! गणेशपासून सुरू होऊन ‘श्रीगौरी’ पर्यंतचा खडतर प्रवास आणि तृतीयपंथी म्हणून जगत असताना जगाबरोबरच ज्या उपेक्षित वर्गासाठी लढा देण्याचं ठरवलं त्यानेच मागे खेचण्याचा प्रयत्न करणं, हे सर्व सोसताना झालेली असह्य घुसमट आणि त्यावर जिद्दीने केलेली मात अत्यंत प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहचवण्यात ‘टाळी’ (ताली ) वेबसिरीज यशस्वी झाली आहे.

सुश्मिता सेनचा अफलातून अभिनय, किंबहुना गौरीच्या भावनांशी समरस होत, श्रीगौरीच आपल्यासमोर उभी करणं हे शिवधनुष्य सुश्मिताने उत्तम पेललं आहे. आवजातील मार्दव ते जरब हा बदलही सहजसाध्य केला आहे. कुठेही गौरी नं पाहता सुश्मिता पाहत आहोत असं वाटत नाही इतकं अप्रतिम बेरिंग पकडलं आहे. वडील व गौरी, बहीण व गौरी, नर्गिस व गौरी, मुन्ना व गौरी, अशा वेगवेगळ्या नाते-सबंधांदरम्यान येणारे विविध अनुभव, अपेक्षा आणि अपेक्षाभंग परिणामकारकरित्या टिपण्यात ‘टाळी’ यशस्वी झाली आहे. अंतर्गत संघर्ष आणि बाह्य संघर्ष अशा दोन्ही आघाड्यांवर लढताना होणारी कसरत सुश्मिताने तोल जाऊ न देता यशस्वीपणे पार पाडली आहे.

मराठी कलाकारांनीही बाजी मारली आह. सुव्रत जोशीने मुन्नाची व्यक्तिरेखा अप्रतिमपणे उभी केली आहे. हेमांगी कवीची भूमिका फार मोठी नाही तरीही तिने त्यात चुणूक दाखवली आहे. कृतिका देवने केलेली छोट्या गणूची भूमिका उल्लेखनीय. ऐश्वर्या नारकरही गौरीच्या आईच्या भूमिकेत आहे, पण विशेष लक्षात राहते ती नर्गिसच्या भूमिकेतील शीतल काळे. छोट्या छोट्या प्रसंगांत ती दिसते. कधी गौरीचं मनोधैर्य वाढवताना, कधी तिची काळजी करताना, कधी तिच्यावर होणार्‍या विषप्रयोगातून वाचवताना तर कधी हळवी प्रेमिका म्हणून हळव्या नात्याची स्वप्नं बघताना. ही स्वप्नं तिच्या डोळ्यांत ‘दिसतात’. तृतीयपंथी व्यक्तींमध्ये एक लकब, एक नजरफेक आणि एक बेफिकिरी असते ती नर्गिस म्हणून हुबेहूब उतरवण्यात शीतल काळे कमालीची यशस्वी ठरली आहे.

रवी जाधव यांचं दिग्दर्शन उत्तम आहेच पण कौतुक आहे ते क्षितिज पटवर्धन, अमोल उदगीरकर या मित्रांचं. उत्तम पटकथा आणि लेखन त्यांनी खुबीने केले आहे. एका अत्यंत महत्त्वाच्या पण धाडसी विषयाला हात घालून तो उत्तम पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणला आहे. यामुळे समाजाचे डोळे उघडतील अशी आशा आहे. ‘ट्रान्सजेंडर’ म्हणून लेबल लावण्यापेक्षा एक माणूस म्हणून त्यांच्याकडे पहायला शिकलो तरी ‘टाळी’ ने खूप काही साध्य केलं असं म्हणता येईल! कायदेशीर लढाईपर्यंतचा गौरीचा हा प्रवास म्हणजे तृतीयपंथीयांच्या आयुष्यातला एक ठिपका आहे. हा ठिपका रवी जाधवांनी गडद रुपात ठेवलाय. अजून यांच्या समस्यांची भलीमोठी रांगोळी तशीच आहे.

यांनी ज्ञानाच्या बळावर काही गोष्टी जरूर बदलल्यात मात्र अजूनही शिक्षण, आरोग्य आणि प्रतिष्ठा या गोष्टीसाठी मोठा संघर्ष सुरूय. काही नकारात्मक गोष्टींवर लोकं बोलत असतात, त्या गोष्टी आपल्यासारख्या सो कॉल्ड नॉर्मल समाजात नाहीत का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारुयात. असो, आपण आपलं अबनॉर्मल असणं सोडून या नॉर्मल व्यक्तींना नॉर्मल म्हणून जेव्हा पाहू तेव्हाच आपणही नॉर्मल होऊ.‘इस ताली की गूँज दूर दूर तक जाने के बजाए अपने दिल में उतर जाए तो बेहतर होगा’ व ‘ताली बजाऊँगी नही, बजवाऊँगी’.जमल्यास आवर्जून ‘टाळी’ वेबसिरीज नक्की पहा, जिओ सिनेमावर उपलब्ध आहे.

-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)

- Advertisment -