घरफिचर्ससारांशमनसेचे मिशन कोकणातून श्रीगणेशा

मनसेचे मिशन कोकणातून श्रीगणेशा

Subscribe

निवडणुकांची चाहूल लागली की सगळे राजकीय पक्ष खडबडून जागे होतात. प्रत्येकजण आपले नशीब आणि अस्तित्व आजमावण्यासाठी धडपडत असतो. त्यासाठी कधी दहीहंडी, कधी गणेशोत्सव, तर कधी नवरात्री असे सार्वजनिक उत्सव म्हणजे सर्वच राजकारण्यांना पर्वणी असते. अशाच एका राजकीय प्रयोगाचा श्रीगणेशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अर्थात मनसेने कोकणात केलेला दिसतो. एकमेव आमदार असलेला मनसे आणि त्यांची ‘राज’कीय फौज सध्या कोकणात स्वबळावर लोकसभेची चाचपणी करू लागली आहे. एकंदरच श्री गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय आकांक्षांची आभासी आरास सर्वसामान्यांच्या मनात उतरविण्याचा केविलवाणा प्रयोगच पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार असे दिसते...

— विजय बाबर

येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मनसे चाचपणी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे कोकणातील रायगड, रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघांतील राजकीय परिस्थिती आणि पक्षाच्या राजकीय ताकदीचा अंदाज घेण्यास पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवात केली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दौर्‍यात राज ठाकरे यांनी कोकणी माणसाला साद घालत कोकणातील काही मूलभूत प्रश्नांना हात घातला आहे. एकूणच येणारी निवडणूक स्वबळावर लढविण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

- Advertisement -

लोकसभेपूर्वी अन्य कोणत्याही निवडणुका होणार नाहीत, असा अंदाज बांधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांनी संघटनानिहाय काही बदल करतानाच गटबाजी करणार्‍या कार्यकर्त्यांना धारेवर धरले. त्यानुसार लोकसभा मतदारसंघात तालुकानिहाय पदाधिकार्‍यांच्या, कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत. आगामी निवडणुकीत मनसेचे इंजिन एकटेच धावणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यानुसार मनसेने अलिकडेच एक टीझर लाँच केला. या टीझरमध्ये ‘चला हे चित्र बदलूया, आपण महाराष्ट्राला पर्याय देऊया, चला नव्याने स्वप्न पाहूया, महाराष्ट्र घडवूया…’ असे म्हटले होते. या टीझरला ‘महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी घसरली आहे असे वाटते ना? चला तर मग ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ पर्याय द्यायला तयार आहे!’ असे शीर्षक देण्यात आले होते.

मागील सात-आठ महिन्यांचा विचार केल्यास राज ठाकरे यांनी तीन वेळा कोकण दौरा केला. रत्नागिरी, पनवेल येथे जाहीर सभा घेतली, तर मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून रायगड जिल्ह्यातील कोलाड येथून एकप्रकारे निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून राज ठाकरे यांची पनवेलमध्ये सभा पार पडल्यानंतर मनसैनिकांनी कोकणपट्ट्यात तसेच समृद्धी महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे टोलनाक्यांची तोडफोड केली. यावरून राजकारणही तापले. खळ्ळखट्याक झाल्यानंतर मनसेने गांधीगिरीची वाट चोखाळली. महामार्गावरील खड्ड्यांवरून आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामर्गाच्या कामावरून मनसेने कोकण जागर यात्रा काढली.

- Advertisement -

पळस्पे फाटा ते खारपाडादरम्यान काढलेल्या जागर यात्रेत अनेक नेते सहभागी झाले. अमित ठाकरे यांनी या यात्रेचे नेतृत्व केले होते. कोलाड येथील सभेत राज ठाकरे यांनी अनेक वर्षे या महामार्गाचे काम का रखडले याचे कारण स्पष्ट केले. कोकणातील बांधवांच्या जमिनी स्वस्तात विकत घ्यायच्या. पुढे अव्वाच्या सव्वा भावाने व्यापार्‍यांना विकायच्या. हे सर्व आपलेच लोक करत आहेत. माझी कोकणातील बांधवांना हात जोडून विनंती आहे की जमिनी विकू नका. कितीही आमिषे दाखवली, कितीही दबाव आणला तरी जमिनी विकू नका. बाकी व्यापार्‍यांचे काय करायचे ते आम्ही बघून घेतो, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

रत्नागिरीत बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेना आणि आपले बंधू उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला होता. ते म्हणाले होते, सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती अशी झाली आहे कोण कुठे आहे तेच कळत नाही. दुसरीकडे तो राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता, तो संपला. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, पण ते प्रश्न आणि उभे राहण्याची कारण हे तुम्ही आहात. त्याच त्याच पक्षाला निवडून देऊन त्या पक्षाने अख्खा व्यापार कोकणाचा करून ठेवला आहे आणि तुम्ही तिथेच आहात. मुंबई गोवा महामार्गाचे काम २००७ पासून सुरू आहे.

कुठे आहे तुमचा खासदार, कुठे आहे तुमचा आमदार… त्याच त्याच लोकांना तुम्ही सतत निवडून देता. त्यांना माहिती आहे काम केले काय आणि नाही काय… तुमच्याबद्दल या लोकांना आपुलकी शून्य आहे… त्यांना फक्त तुमच्या मतांची किंमत आहे. यापूर्वी दाभोळला एनरॉन प्रकल्प आला त्यावेळेलाही विरोध झाला, पण जमीन विकली कोणी तुम्ही, मग जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प, नाणार व बारसूलाही तेच झाले. तुमच्या जमिनी कोण व्यापारी घेतो. ते फायदा घेतात, निघून जातात आणि तुम्हाला कळत नाही का? असा खडा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी कोकणी माणसाच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न, कोकणी माणसाला साद घालण्याचा प्रयत्न केला.

मनसे नेते संदीप देशपांडे, सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी तर रायगड लोकसभा मतदारसंघात तालुकानिहाय बैठकांचा सपाटा लावला असून योग्य अशा व्यूहरचनेने मनसे स्वबळावर येणारी लोकसभा लढवणार आणि जिंकणार तसेच विधनासभा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतही मनसे लढवणार असल्याचे सूतोवाच संदीप देशपांडे यांनी केले आहे.

सध्या रायगड लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे सुनील तटकरे, तर रत्नागिरीतून उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत खासदार आहेत. मावळमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे श्रीरंग बारणे खासदार आहेत. त्यामुळे सुनील तटकरे, विनायक राऊत आणि श्रीरंग बारणे यांच्यासमोर मनसेचा उमेदवार कोण असणार, हा प्रश्न आणि त्याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत सध्या शिवसेना-शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ‘महाविकास आघाडी’ आणि भाजप-एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी यांची ‘महायुती’ अशी सरळ लढत होण्याचे संकेत आहेत. काही संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार तूर्तास महाविकास आघाडीचे पारडे काहीसे जड असल्याचे बोलले जाते, मात्र भाजपने येणार्‍या लोकसभा निवडणुकीत येनकेन प्रकारे सर्वाधिक जागा निवडून आणून पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधानपदावर बसविण्याचा चंग बांधला आहे.

महाविकास आघाडी आणि महायुती अशी सरळ लढत झाली, तर सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार महायुतीचे रायगड आणि रत्नागिरीतील उमेदवार अडचणीत असल्याचे चित्र दिसते. मोदींना पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान करण्यासाठी महायुती विशेषत: भाजप कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. त्यासाठीच महाआघाडीची विशेषत: सहानुभूतीमुळे उद्धव ठाकरेंना मिळत असलेली शिवसेनेची मते खेचण्यासाठी मनसेचा वापर केला जात आहे का, अशी शंका राजकीय वर्तुळात उपस्थित केली जात आहे.

स्थानिक प्रश्नांची जाण, प्रसंगी प्रशासनाला अंगावर घेण्याची ताकद, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर आंदोलन करण्याची हिंमत आणि गर्दी खेचणारे प्रभावी वक्तृत्व हे गुण राज ठाकरे यांच्याकडे आहेत. परप्रांतीयांचा मुद्दा, नोकरीमध्ये स्थानिकांना प्राधान्य, टोलला विरोध, मराठी भाषेचा मुद्दा यावर मनसेने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. मराठीच्या मुद्याला अधोरेखित करून राज ठाकरे महाराष्ट्र धर्म नावाची एक सेक्युलर संकल्पना मांडत असतात. राजकारणात नेहमीच आक्रमक, रोखठोक भूमिका घेणार्‍या राज ठाकरेंची दुसरी बाजू अत्यंत संवेदनशील कलावंत, हळवा माणूस अशी आहे.

इतिहासाबद्दल प्रेम, वर्तमानातल्या राजकारणाची जाणीव आणि भविष्यात जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे, असे स्वप्न असलेल्या राज ठाकरे यांचे राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तरीही २००९ मध्ये पहिल्यांदाच लढवलेल्या निवडणुकीत निवडून आलेले १३ आमदार, नाशिक महापालिकेतील सत्ता आणि पुण्यात प्रमुख विरोधी पक्ष वगळता मनसेला फारसे यश मिळवता आले नाही. विशेषत: राज ठाकरे यांच्या सभेला होत असलेली गर्दी मतांमध्ये परावर्तीत होऊ शकलेली नाही किंवा त्यांना जनतेने मनापासून स्वीकारलेले नाही, त्यांची वृत्ती धरसोड आहे, असाच अर्थ राजकीय वर्तुळात काढला जातो.

त्याचे कारण म्हणजे जनतेमध्ये राज ठाकरे आपली विश्वासार्हता निर्माण करण्यात अपयशी ठरल्याची टीका होत आहे. ‘लाव रे तो व्हीडिओ’द्वारे नेत्यांची पोलखोल केल्यानंतर त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसल्यामुळे राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे जनतेसाठी करमणुकीचे साधन झाल्याची चर्चा आहे. ‘ईडी’कडून चौकशी झाल्यानंतर मात्र राज ठाकरे यांचे भूमिका ही भाजप समर्थक अशीच तयार झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आता ‘एकला चलो रे’चा नारा दिला असला तरी त्यामागे भाजपचा ‘गनिमा कावा’ अर्थात फूस असल्याचीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेला कोकणी माणूस, शिवसेनेचा पारंपरिक मतदार किती साथ देणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल. मुख्य गोष्ट म्हणजे शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर त्याचा फायदा मनसेला होईल का? मनसेची रणनीती नेमकी काय असेल? राज ठाकरे कोकणी माणसाला आपलेसे करण्यात यशस्वी होतील का? यासारखे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत, पण येणार्‍या निवडणुका आणि त्यांचे निकाल लागल्यानंतरच याचे उत्तर मिळेल हे मात्र नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -