घरफिचर्ससारांशअंतरंग मूर्तींचे!

अंतरंग मूर्तींचे!

Subscribe

१४ विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती श्री गणेश यंदा १९ सप्टेंबरला आपल्या सर्वांच्या घराघरात मुक्कामाला येणार आहे. ही आपल्यासाठी आनंदाची आणि समाधानाची पर्वणी असणार आहे. आपण सर्व यंदा जी श्री गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित करणार आहात. ती मूर्ती कशी घडते किंवा त्याची निर्मिती प्रक्रिया ही कशी असते हे आपण आणि आपल्यातील खूपशा लोकांना माहीत नसते. आज आपण त्या मूर्ती घडवण्यामागील आणि कलाकाराच्या भावनेचे अंतरंग जाणून घेऊयात.

–शांताराम मोरे

पार्थिव श्री गणेश पूजन हे शास्त्रानुसार पंचतत्वाने निर्मित असलेले पाहिजे आणि पूजन झाल्यानंतरच पुन्हा ती पंचतत्त्वात विलीन झाली पाहिजे, असे शास्त्र म्हणते. पर्यावरणीय दृष्टीने विचार केल्यास श्री गणेशमूर्ती पूजनाबाबत बदलत्या काळाची नोंद घेतली असता मूर्तीही मातीपासून निर्मित अथवा तत्सम पर्यावरणात सहजपणे विरघळणार्‍या घटकांपासून निर्मित झाली पाहिजे. या सर्व प्रक्रियेत धार्मिक भावनांसह निसर्गालाही हानी होऊ न देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

- Advertisement -

पूर्वीच्या काळी मूर्ती मातीच्या (काळ्या किंवा शाडूच्या) असत. त्यांचे पाण्यात सहज विघटन होई. मूर्ती नैसर्गिक रंगांनी रंगवत असत. हे रंग वनस्पतींपासून बनवत असत. (उदा. लाखेचे रंग व इतर नैसर्गिक उपलब्धतेनुसार) मूर्ती लहान होत्या पूर्वीच्या. ज्या नद्यांमध्ये अथवा पाण्याच्या स्त्रोतात विसर्जित केल्या जात. त्या वर्षांतून बराच काळ वाहत असत. विहिरी आणि तळी यांना मुबलक पाणी होते. लोकसंख्या कमी होती. यामुळे गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित करण्याचा सहजसोपा मार्ग अमलात आणता येत होता. सध्याच्या काळातील मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात. प्लास्टर ऑफ पॅरिसचे पाण्यात विघटन होत नाही. मूर्तींची संख्या वाढली आहे. नद्या पावसाळ्यातदेखील फार कमी कालावधीसाठी प्रवाहीत असतात.

महाराष्ट्रात सर्वसाधारपणे एक कोटी कुटुंबात गणपतीची प्रतिष्ठापना होते. एका घरगुती दीड फुटाच्या मूर्तीचे वजन सुमारे ३ किलो असते. म्हणजे सरासरी ३ कोटी किलो प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्याच्या स्त्रोतांमध्ये टाकले जाते. त्यामुळे प्रचंड गाळ साचतो. जिवंत झरे बुजले जातात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या मूर्तींना शेकडो टन रासायनिक रंग लावले जातात.

- Advertisement -

अशा अनैसर्गिक व शास्त्रविरुद्ध होत असलेल्या धार्मिक प्रदूषणाबाबत कोणताच कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे समाजाने आणि भाविकांनीच याबाबत पुढाकार घ्यायला हवा. मूर्तीसाठी वापरले जाणारे शेकडो टन रंग रासायनिक असतात. रंगांचा पक्केपणा राहावा म्हणून केसीण वापरले जाते. ते कमी हानीकारक आहे, मात्र ते लवकर सडते. त्यामुळे त्यात सोडियम ट्रायक्लोरोफायनेट टाकतात. ते फारच घातक आहे. कुठल्याही रंगछटा बनवताना कॅटलिस्ट म्हणून अत्यंत विषारी पोटॅशियम सायनाईड वापरावे लागते. पेंटा ट्रायथ्रीटॉल यासारखे इतर पदार्थही वापरलेले असतात. रंग लवकर सुकावेत यासाठी विविध प्रकारचे पदार्थ वापरलेले असतात. त्यामध्ये शिसे आणि पारा असतोच. हे सर्व रंग फार मोठ्या प्रमाणात मूर्ती एकाचवेळी पाण्यात विसर्जित झाल्यामुळे धोकादायक प्रमाणात पाण्यात मिसळले जातात. नद्यांमध्ये सांडपाणीही मिसळत असते, मात्र त्यामधील सेंद्रिय द्रव्यांचे पाण्यातील जीवाणूंमुळे विघटन होते.

प्रवाहाच्या १० किलोमीटर वाहत्या पाण्यात बर्‍याच अंशी या प्रक्रियेने पाणी स्वच्छ होते. रासायनिक द्रव्ये जीवाणूंचाही नाश करतात आणि गंभीर प्रदूषण होते. त्यातच हे जलस्त्रोतामधील पाणी पाझरून तलाव व विहिरींनी येते व विहिरींचे पाणीही प्रदूषित होते. ही रसायने त्वचारोगापासून ते मतिमंदत्व, कर्करोग अशा अनेक अरिष्टांना जन्म देऊ शकतात. पाणी पिणारे प्राणी, त्यावर येणारा भाजीपाला या सगळ्यांनाच हे पाणी घातक असते. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात खर्‍या अर्थाने पर्यावरणपूरक आणि त्याचसोबत खर्‍या जाणत्या व जातीवंत कलाकाराकडून श्री गणेशाची मूर्ती घेऊन त्यांना व त्यांच्या पिढीजात कलेला आपण सन्मान का देऊ नये? मला असे वाटते की अशा आपापल्या परिसरातील विविध पिढीजात कलाकारांकडून आपण श्री गणेशाची मातीची मूर्ती बनवून घेण्याने त्यांच्या कलेला वाव मिळेल आणि त्याचसोबत अनेक वर्षे घेतलेल्या कलेच्या साधनेचा त्यांना खरोखरच अभिमान वाटेल.

आज बाजारातील काही मूर्ती विक्रेते स्वतःला मूर्तिकार म्हणवून घेतात. बाजारात आर्थिक नफा कमवण्यासाठी मूर्ती विक्रीची दुकाने लावतात. ते भाबड्या भक्तांची फसवणूक करतात. आमचा आक्षेप फक्त याच गोष्टीला आहे की, जो पिढीजात मूर्तिकार जेव्हा पीओपी अस्तित्वात नव्हते, तेव्हा फक्त मातीच्या मूर्ती घडवत होता. आजही तो बक्कळ पैसा कमवून देणार्‍या पीओपी मूर्तींच्या मागे न पळता आपल्या कसबी आणि जिवंत, जातीवंत व्यवसायाने आपले उदरभरण करू पाहत आहे. त्या प्रामाणिक कलाकार व्यक्तीची व परिवारांची ही चेष्टा आहे आणि हे फारच निंदनीय आहे. आपण हे थांबवायला हवे. याचा एकमेव मार्ग म्हणजे आपण अशा व्यक्तींचा, कलाकारांचा शोध घ्यायला हवा. नैसर्गिक रंग देऊन बनविलेल्या मातीच्या मूर्ती खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.

आज कुप्रसिद्ध असणारे पीओपी हे औद्योगिक क्रांतीमुळे जगभरात पोहोचले. जिप्सम हे मुख्य द्रव्यघटक असलेले पीओपी गृहसजावटीसाठी विविध औद्योगिक वस्तूंमध्ये आणि ज्या वस्तू अति दीर्घकाळापर्यंत आपल्याला ठेवायच्या आहेत, त्यासाठी याचा वापर केला जातो, मात्र फक्त पैशांच्या हव्यासामुळेच हा विषारी व अनैसर्गिक घटक मंगलमय गणेशोत्सवात वापरला जाऊ लागला. त्यामुळे हे क्षेत्र फार कमी कालावधीत अधिक पैशांची आवक होणारा व्यवसाय झाला. हे होताना आम्ही फार जवळून बघितले आहे.

या पीओपीच्या मूर्ती सध्या अक्षरशः फॅक्टरीमध्ये तयार होताना दिसून येतात. त्यासाठी पूर्वी मातीच्या गणपतीसाठी प्रसिद्ध असणारे पेण हे आता पीओपीच्या विनारंगकाम केलेल्या गणेशमूर्ती (कच्चा माल) निर्मिती करणारे एक मोठे केंद्र झाले आहे. पेण जवळील हमरापूर, जोहे ही ग्रामीण खेडी आता या पीओपीच्या मूर्तींचे ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ म्हणून अलीकडच्या काळात उदयास आले. आज बाजारात विक्रीसाठी येणार्‍या जवळपास ८५ टक्के मूर्ती या तेथे तयार केलेल्या असतात. बाजारात मिळणारी दीड ते तीन फुटांपर्यंतची मूर्ती हमरापूर येथे साधारण प्रवासासह ३०० ते ५५० रुपयांपर्यंत मिळते. त्यामुळे आज सर्व विक्रेते आणि स्वतःला मूर्तिकार म्हणवून घेणारे सर्रास तिकडून गाडी भरून घेऊन येतात आणि ग्राहक भाविकांची फसवणूक करतात आणि तीच मूर्ती येथील बाजारात २८०० ते ३००० रुपयांपर्यंत नफा कमवून (लुबाडतात) विकतात.

त्याचमुळे आपल्याला विक्रेते किंमत कमी करण्याचे (बाजारात) आमिष देतात आणि १०,००० रुपये सांगून पीओपीची मूर्ती २५०० रुपयाला देणारे विक्रेते मी स्वतः बघितले आहेत. कारण की २५०० रुपये विकून त्यांना अंदाजे २००० ते १५०० रुपये निव्वळ नफा मिळतो.

या उलट जे कलाकार वर्षानुवर्षे मातीच्या श्रीगणेश मूर्तींची निर्मिती करतात. ज्यांच्या अंगी हे कौशल्य आहे. त्यांची श्री गणेश निर्मितीची प्रक्रिया फारच क्लिष्ट आहे आणि वैचारिक आहे. मूर्ती घडवण्यासाठी मातीची योग्य प्रकारे तयारी करणे त्याला काही वेळासाठी स्थिर होऊ देणे, जेणेकरून त्यामध्ये पाणी व्यवस्थित मिसळले जाऊन त्याला योग्य तो चिकटपणा आणि घट्टपणा मिळतो. त्यानंतर मूर्ती पूर्ण हातीव असल्यास त्याबाबतचे चित्र अथवा कल्पनेने तयार केलेले रेखाचित्र समोर ठेवून मूर्ती घडवायला सुरुवात केली जाते. बघता बघता अखंड श्री गणेशमूर्ती आपल्यासमोर साकारते. त्यासोबत त्या मूर्तीमध्ये जो भाव जपला जातो, तो फारच निर्मळ असतो आणि त्या भावनेतूनच मूर्तीत सात्विकता जपली जाते. पंचत्त्वाने निर्मित होणे म्हणजेच पंचेंद्रिय, पाच बोटे, यांचा उपयोग करून तयार झालेली असे आपण म्हणू शकतो. बहुतेक वेेळेस अशी तक्रार कानी येते की, मातीच्या मूर्ती तुलनेत पीओपीपेक्षा महाग असतात, मात्र त्यामागील कारण आपण समजून घेत नाही.

साधारण पीओपी हे कोणत्याही स्थानिक दुकानांवर उपलब्ध असते. त्यामानाने शाडूची माती ही विशिष्ट खाणीतून आयात करावी लागते. ती महाग असते. पीओपी ही १३० रुपये गोणी असते, तर शाडूमाती ही भेसळमुक्त आणि शुद्ध ९०० रुपये गोणी मिळते. पीओपीच्या मूर्तीसाठी साधारण मजूर असले तरीही चालतात, मात्र शाडूमातीसाठी फक्त तांत्रिकदृष्ठ्या सक्षम व कसबी कारागीर गरजेचा असतो. पीओपीला रबरी मोल्ड सहज बनवून मिळतात. ते स्वस्त असतात. त्यामानाने शाडूमातीचे योग्य व तंत्रशुद्ध मोल्ड व साधनसामुग्री साहित्य हे तुलनेने अधिक खर्चिक असते. परिणामी पीओपीच्या मूर्तीचे उत्पादन दिवसाला साधारण दोन मजुरांमार्फत प्रतिदिन ३० ते ५० मूर्ती तयार केल्या जातात. याउलट मातीच्या मूर्ती साधारण (एक फुटाची उंची असलेल्या) ४ ते ६ मूर्ती तयार होतात.

वरील तुलनेतून आपल्याला या दोन्ही प्रकारच्या मूर्तीची निर्मिती, खर्चाची कल्पना आली असेल. त्यामुळे मातीची मूर्ती ही थोडी महाग मिळणे साहजिक आहे. त्याचमुळे अधिक कलाकुसर, कलात्मकता वापरून शुचिर्भूत, सुंदर व सुबक वैशिष्ठ्याने नटलेल्या मूर्तीसाठी जर थोडे जास्त पैसे मोजावे लागले, तर त्यात काही वावगे वाटण्याचे कारण नाही. वरील सर्व मुद्दे आपल्यासमोर मांडण्याचे प्रयोजन फक्त एवढेच होते की, ज्या स्थानिक कलाकारांनी, कुटुंबांनी पिढीजात आपला वारसा जपून पर्यावरणपूरक मूर्ती निर्मितीचा ध्यास घेतला आहे, त्यांचा सन्मान करणे सध्या काळाची गरज आहे. कारण त्यांची नवीन पिढी आता या मातीच्या मूर्ती घडवण्याच्या कामात सहभाग घ्यायला कचरते. कारण की एवढ्या मेहनतीत त्यांना अन्य क्षेत्रामध्ये जास्त मोबदला मिळत आहे, परंतु त्याहीपेक्षा गंभीर परिस्थिती म्हणजे जे बनावट विक्रेते स्वतःला कारखानदार म्हणवतात त्यांच्याकडील मूर्ती खरेदी थांबवून त्यांना आळा घातला पाहिजे.

यामध्ये समाधानाची बाब म्हणजे, माझे पणजोबा कै. हरिभाऊ त्र्यंबक मोरे यांनी १९३४ साली मातीच्या मूर्ती निर्मितीचा छोटेखानी कारखाना सुरू केला. त्यांनी तो वारसा त्यांचे सुपुत्र शंकरराव हरीभाऊ मोरे यांच्या हाती सोपवला. माझे आजोबा कै. शंकरराव यांनी तहहयात पर्यावरण रक्षणाची गरज ओळखून बक्कळ कमाई देणार्‍या पीओपीच्या मागे न लागता अत्यंत सचोटीने हा वारसा वृद्धिंगत केला. शाडूमातीचे गणपती मिळण्याचे एकमेव ठिकाण शंकरराव मोरे असे जणू समीकरण झाले. १९३४ पासून सुरू झालेला हा कलात्मक प्रवास माझ्या वडिलांसह आम्ही मोरे बंधू समर्थपणे सांभाळत आहोत. पुढे नेत आहोत.

–(लेखक प्रसिद्ध मूर्तिकार आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -